नाशिक : देशातल्या प्रादेशिक नेत्यांनी त्यांचे पक्ष फुटल्याने हतबल होणे पसंत केले; पण त्यांनी काँग्रेसचा पर्याय पर्याय का नाही स्वीकारला??, असा सवाल विचारायची वेळ प्रादेशिक नेत्यांच्या आणि काँग्रेसच्या नेत्यांच्या राजकीय वर्तणुकीतून आली.Regional leaders accepted splits, but avoid merger in Congress!!
– तीन पक्ष फुटण्याच्या तीन कहाण्या
पश्चिम बंगाल आणि तामिळनाडू विधानसभा निवडणुकीच्या आधी आणि नंतर आम आदमी पार्टी, तृणमूळ काँग्रेस आणि शिवसेना हे तीन प्रादेशिक पक्ष फुटले. राघव चढ्ढांच्या नेतृत्वाखाली आम आदमी पार्टीच्या राज्यसभेच्या सात खासदारांनी स्वतंत्र मार्ग अवलंबून मोदी सरकारला पाठिंबा दिला. ते अरविंद केजरीवाल यांच्यापासून बाजूला झाले आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या गोटात आले. पण अरविंद केजरीवाल आणि राघव चढ्ढा या दोघांनीही काँग्रेसचा पर्याय स्वीकारला नाही. अरविंद केजरीवाल हे मूळातच काँग्रेसी संस्कृतीतले राजकीय नेते नसल्याने त्यांनी त्यांची आम आदमी पार्टी काँग्रेसमध्ये विलीन करायचा प्रश्नच उद्भवला नाही. राघव चढ्ढांनी काँग्रेसचा पर्याय स्वीकारण्याचे कारणच नव्हते कारण काँग्रेसकडे राघवला देण्यासारखे काहीच शिल्लक नव्हते. त्यामुळे आम आदमी पार्टी आणि काँग्रेस यांचे राजकीय सूत कधी जुळणेच शक्य नव्हते. त्यात पंजाब मधल्या काँग्रेस विरुद्ध आम आदमी पार्टी या लढ्याची पूरक भर पडली, पण या सगळ्याचा परिणाम काँग्रेसच्या केंद्रीय राजकारणावर झाला. अरविंद केजरीवाल यांना आम आदमी पार्टी फुटल्याचा राजकीय पर्याय नाईलाजाने स्वीकारावा लागला, पण त्यांनी काँग्रेसचा पर्याय निवडला नाही.
– ममता आणि काँग्रेस यांच्यातले द्वैत
पण त्या पलीकडे जाऊन पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींनी सुद्धा तृणमूळ काँग्रेस तुटणे आणि फुटणे हे राजकीय अपरिहार्यता म्हणून स्वीकारले, पण त्यांनी काँग्रेस पक्षात आपला पक्ष आधीच विलीन करून राजकीय सुरक्षिततेचा मार्ग स्वीकारला नाही. वास्तविक ममता बॅनर्जी या काँग्रेसी संस्कृतीतून राजकारणात आल्या आणि वाढल्या. पण त्यांनी सुद्धा तृणमूळ काँग्रेस पक्ष मूळ काँग्रेसमध्ये विलीन करण्याचा पर्याय काँग्रेसच्या नेतृत्वाला सुचविला नाही किंवा काँग्रेसच्या नेतृत्वाने सुद्धा त्यांना म्हणजेच ममता बॅनर्जींना विलीनीकरणाचा प्रस्ताव दिला नाही. वास्तविक ममता बॅनर्जी यांनी पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या नंतर लगेच ठराव करून अख्खाच्या अख्खा तृणमूळ काँग्रेस पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करून टाकला असता, तर तृणमूळ काँग्रेसचे 59 आमदार आणि २० खासदार फुटणे अवघड झाले असते. त्यांना आज जी कायदेशीर पळवाट मिळाली, ती मिळू शकली नसती. विशेषतः 20 खासदारांच्या बाबतीत तर कायदेशीर आणि राजकीय कोंडी तयार झाली असती. कारण काँग्रेसचे 99 अधिक 20 बरोबर 119 खासदारांमधून दोन तृतीयांश फूट पाडणे भाजपला कदापि शक्य झाले नसते.
– गांधी परिवाराच्या वर्तणुकीचा इतिहास
पण तरीसुद्धा ममता बॅनर्जींनी काँग्रेसचा पर्याय निवडला नाही. त्यांनी स्वतःची तृणमूळ काँग्रेस फुटू दिली, पण त्या काँग्रेसमध्ये गेल्या नाहीत. त्यांनी काँग्रेस बरोबर सहकार्य करण्याची तयारी दाखविली पण ती तयारी दाखवायला त्यांना उशीर झाला. ते सुद्धा त्यांना कबूल झाले, पण तरीही आपले राजकीय स्वातंत्र्य गमवायला त्या तयार झाल्या नाहीत, याचे कारण काँग्रेस हायकमांडच्या राजकीय वर्तणुकीच्या इतिहासात दडलेय. काँग्रेसने कधी प्रादेशिक अस्मिता असलेल्या नेत्यांना राजकीयदृष्ट्या फुलूच दिले नाही. काँग्रेस हायकमांडने म्हणजेच गांधी परिवाराने प्रादेशिक नेत्यांच्या अस्मिता पुरेशा समभावाने किंवा सन्मानाने कधी जपल्याच नाहीत. काँग्रेसच्या हायकमांडने प्रादेशिक नेत्यांना नेहमीच दुय्यम स्थान दिले. प्रादेशिक बळकट नेत्यांच्या राजकारणात काड्या घातल्या. त्यांच्या वाटचालीत कोलदांडे घातले. प्रादेशिक नेतृत्वात झुंज लावली. त्याचे फटके काँग्रेस मधल्या बऱ्याच प्रादेशिक नेत्यांना बसले. ममता बॅनर्जी आणि शरद पवार ही त्याची हयात उदाहरणे ठरली. काँग्रेस हायकमांडच्या राजकीय वर्तणुकीची सगळीकडे एवढी बदनामी झाली, एक वेळ भाजप, मोदी आणि शहा परवडले पण काँग्रेस आणि गांधी परिवार नको अशी देशातल्या सर्वच प्रादेशिक नेत्यांची मनोभूमिका तयार झाली.
– मोदी + शाहांची राजकीय वर्तणूक
राजकीय स्वार्थ तर नेहमी सगळ्यांनी साधून घेतलाच, अगदी त्यात मोदी + शाहांचा भाजप सुद्धा कुठे कमी पडला नाही, उलट तो इतरांपेक्षा त्यात भारी ठरला. पण मोदी आणि शाह यांनी प्रादेशिक नेत्यांना वैयक्तिक पातळीवर ते दुखावले जातील, अशी वर्तणूक दिल्याचे उदाहरण नाही. मोदी + शाहांनी कुठल्या कारणाशिवाय प्रादेशिक नेत्यांचे अहंकार दुखावल्याचे सुद्धा उदाहरण नाही, क्वचितच असले तर एखाद दुसरे असेल. पण मोदी आणि शाहांनी गांधी परिवारातल्या सदस्यांसारखी प्रादेशिक नेत्यांना हीन वर्तणूक दिल्याचे दिसले नाही. याचाच दीर्घकालीन परिणाम म्हणून प्रादेशिक नेत्यांनी स्वतःचे पक्ष फुटणे राजकीय हतबलता म्हणून स्वीकारले, पण त्यांनी गांधी परिवाराच्या काँग्रेसमध्ये विलीन होणे स्वीकारले नाही!!
– ठाकरेंनी नाकारला काँग्रेसचा पर्याय
उद्धव ठाकरेंनी काँग्रेस बरोबर स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी आघाडी केली. अगदी त्यासाठी शरद पवारांच्या राजकीय आग्रहाला सुद्धा बळी पडले, पण वेळ येताच त्यांनी शरद पवारांकडे सुद्धा पाठ फिरवली आणि त्यांनी काँग्रेसकडे सुद्धा ढुंकून पाहिले नाही. कारण मूळातच उद्धव ठाकरे यांचे शिवसेनेच्या पठडीतले राजकारण काँग्रेस विरोधातलेच होते. त्यांनी त्याच राजकारणाला चिकटून राहणे पसंत केले पण त्यांनी काँग्रेसचा पर्याय स्वीकारला नाही.
– पवार आणि काँग्रेसचा trust deficit
शरद पवारांच्या बाबतीमध्ये काँग्रेस हायकमांड म्हणजेच गांधी परिवार आणि शरद पवार यांच्यातला trust deficit एवढा मोठा आहे, की तो सांधला जाणे शक्य नाही. गांधी परिवाराचा शरद पवारांवर विश्वास नाही आणि शरद पवारांचा गांधी परिवाराच्या वर्चस्ववादावर विश्वास नाही. त्यामुळे मुळातच गांधी परिवाराने शरद पवारांना त्यांची राष्ट्रवादी काँग्रेस मूळ काँग्रेसमध्ये विलीन करायचा पर्याय दिला नाही आणि गांधी परिवाराची राजकीय सवय लक्षात घेता शरद पवारांनी सुद्धा इच्छा असून किंवा नसून राष्ट्रवादी काँग्रेस मूळ काँग्रेसमध्ये विलीन करायचा विचार केला नाही. यात गांधी परिवार आणि शरद पवार यांनी राजकीय सोयीने एकमेकांना स्वीकारले, पण काही पेक्षा अधिक त्यांनी एकमेकांना नाकारल्याचेच वास्तव समोर दिसले. म्हणूनच शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आठ खासदार असूनही दिल्लीत राजकीय दृष्ट्या त्रिशंकू अवस्थेत लटकलेली दिसते.
Regional leaders accepted splits, but avoid merger in Congress!!
महत्वाच्या बातम्या
- jio Reaches : जागतिक पेटंट क्रमवारीत टॉप-20 मध्ये पोहोचले जिओ:असे करणारी एकमेव भारतीय टेक कंपनी बनली; 320 स्थानांची झेप घेतली
- Patna Coaching Row : रोशन आनंद यांचा दावा- खान सरांनी भावाला मारले:खान सर म्हणाले- नेपाळमध्ये आजाराने मृत्यू झाला
- RSS : नोंदणीच्या राजकीय वादात आयकर विभागाने आणि न्यायालयाने कोणते निर्णय दिले होते??; वाचा सविस्तर!!
- महाराष्ट्राचे ग्रामीण पेय जल धोरण जाहीर; पाणीपुरवठ्याच्या दीर्घकालीन नियोजनावर भर; दुष्काळ मुक्तीसाठी आणखी एक पाऊल!!