नाशिक : राष्ट्रवादी काँग्रेसचे (शप) अध्यक्ष खासदार शरद पवार हे महायुतीमध्ये असते तर आत्ता राष्ट्रपती झाले असते, असे वक्तव्य रामदास आठवलेंनी परत करून शरद पवारांच्या जुन्या जखमांवरल्या खपल्या पुन्हा एकदा काढल्या. वास्तविक रामदास आठवले यांचे हे वक्तव्य अजिबात नवे नाही. आज सांगलीत त्यांनी हे वक्तव्य केले. पण यापूर्वी किमान दोन वेळा तरी त्यांनी शरद पवार राष्ट्रपती झाले असते, असे वक्तव्य केले होते.
अलीकडे रामदास आठवले यांना शरद पवारांच्या राजवटीची फार आठवण होत असल्याची ही चिन्हे दिसत आहेत. शरद पवारांच्या अखंड काँग्रेसच्या राजवटीत रिपब्लिकन पक्षाला सत्तेचा मोठा वाटा मिळला होता. सहा ते सात जण विधान परिषदेवर आमदार झाले होते. मी, शेगावकर आणि दयानंद म्हस्के हे मंत्री झालो होतो. मुंबईत रिपब्लिकन पक्षाचा महापौर झाला होता पुण्यातही उपमहापौर झाला होता, पण आता भाजपचा राजवटीत रिपब्लिकन पक्षाला सत्तेतला तेवढा वाटा मिळत नाही, अशी खंत रामदास आठवले यांनी व्यक्त केली. पण त्याच वेळी शरद पवार महायुतीमध्ये असते, तर आत्ता राष्ट्रपती झाले असते, असे सांगून शरद पवारांच्या जुन्या जखमांवरची खपली त्यांनी पुन्हा एकदा काढली.
मंत्रीपद जाण्याची आठवलेंना भीती??
वास्तविक रामदास आठवले यांनी व्यक्त केलेली खंत आणि शरद पवार यांच्या जखमांवरली काढलेली खपली यामध्ये एक “कॉमन फॅक्टर” आहे, तो म्हणजे रामदास आठवलेंची सत्तेची वळचण. त्यावेळी शरद पवारांनी रामदास आठवले यांना सत्तेच्या वळचणीला घेतले होते. यावेळी भाजपने विशेषतः पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सत्तेच्या वळचणीला घेतले म्हणून आठवलेंना मंत्रिपदाची संधी मिळाली. पण मोदी सरकारमध्ये राहून त्यांना शरद पवारांची आठवण येण्याचे खरे कारण मोदी मंत्रिमंडळातल्या संभाव्य फेरबदलात आठवणींच्या खुर्चीला धोका तर निर्माण झाला नाही ना??, यात असू शकते. रिपब्लिकन पक्षाच्या सत्तेचा वाटा त्यात आगामी महापालिका निवडणुकांच्या जागा वाटपात मिळायची कमी अधिक संधी या दृष्टीने चलाखीने रामदास आठवलेंनी शरद पवार यांची आठवण काढली. पण ती आठवण रिपब्लिकन पक्षाच्या सत्तेच्या वाट्यापुरतीच मर्यादित राहिली असती, तर त्यामध्ये आठवलेंच्या राजकीय हेतूंविषयी फारशी शंका राहिली नसती.
पवारांच्या राष्ट्रपती पदाच्या बातम्यांच्या पुड्या
पण त्यांनी शरद पवारांना महायुतीतून थेट राष्ट्रपतीपदाची संधी मिळाली असती, असे धाडसी वक्तव्य केल्याने आठवलेंच्या राजकीय हेतूंविषयी शंका निर्माण झाली. वास्तविक शरद पवारांचे राष्ट्रपती पद हा काही ताजा विषय नाही. तो पवार बुद्धीच्या मराठी माध्यमांनी 2017 पासून गाजवत ठेवला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शरद पवारांना “राजकीय गुरू” मानतात त्यामुळे पवारांना राष्ट्रपती करून मोदी त्यांना गुरुदक्षिणा देते अशा बातम्यांच्या पुड्या पवार बुद्धीच्या मराठी पत्रकारांनी सोडल्या होत्या. पवारांचे दिल्लीतले राजकारण किती मोठे आहे, याची महाराष्ट्रात वातावरण निर्मिती करायचा तो प्रयत्न होता. पण पवारांसारख्या उपद्रवी नेत्याला राष्ट्रपतीपदासारख्या घटनात्मक पदावर बसवून स्वतःच्या डोक्याला ताप करून घेण्याइतके मोदी हे अपरिपक्व राजकीय नेते नाहीत, हे माहिती असूनही पवार बुद्धीच्या मराठी माध्यमांनी पवारांच्या राष्ट्रपतीपदाच्या बातम्यांच्या पुड्या सोडणे थांबविले नव्हते.
पराभवाच्या भीतीने पवारांनी उमेदवारी टाळली
पण 2022 मध्ये काँग्रेस सकट सर्व विरोधी पक्षांनी एकत्र पवारांना येऊन राष्ट्रपती पदाची उमेदवारी देऊ केली होती. त्यावेळी भाजप आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांच्या विरोधात निवडणूक लढवायची संधी शरद पवारांना आली होती. परंतु, आकडे आपल्याला अनुकूल नाहीत. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत आपला पराभव होईल, याची खात्री पटल्यानंतर पवारांनी त्या निवडणुकीत उतरायचेच नाकारले होते. आपल्याला active politics मध्ये जास्त रस आहे. राष्ट्रपती पदावर बसलो तर ते active politics आपल्याला करता येणार नाही, असे कारण शरद पवारांनी त्यावेळी सांगितले होते. अर्थातच पवार राष्ट्रपती झाले नाहीत.
तरीदेखील रामदास आठवले यांनी पवारांच्या राष्ट्रपती पदाचा मुद्दा काढून त्यांच्या जुन्या जखमांवरील खपली काढली. पण पवारांना राष्ट्रपती पदाची निवडणूक लढवायची संधी आली होती, पण पराभवाच्या भीतीने पवारांनी ती संधी नाकारली, या बातमीची आठवण रामदास आठवले यांनी काढली नाही.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App