विशेष प्रतिनिधी
मुंबई : Amit Shah भाजपचे ज्येष्ठ नेते तथा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राज्यसभेच्या महाराष्ट्रातील सर्व 7 जागांसाठी महायुतीचे उमेदवार उतरवण्याची सूचना केली आहे. त्यामुळे राज्यातील सत्ताधारी महायुतीच्या नेत्यांनी अतिरिक्त 20 मतांची जुळवाजुळव सुरू केली आहे. परिणामी, विरोधी बाकावरील महाविकास आघाडीच्या घटकपक्षांच्या हाती 7 पैकी एकही जागा न लागण्याची शक्यता आहे.Amit Shah
राज्यसभेच्या महाराष्ट्रातील 7 जागांसाठी येत्या 16 तारखेला मतदान होणार आहे. मतदान संपल्यानंतर त्याच दिवशी मतमोजणी होऊन विजयी उमेदवारांच्या नावांची घोषणा केली जाणार आहे. सध्याच्या संख्याबळानुसार, 7 जागांपैकी 4 जागा या भाजपला, तर सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेला प्रत्येकी 1 जागा मिळण्याची शक्यता आहे. पण केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राज्यातील महायुतीच्या नेत्यांना राज्यसभेच्या 7 व्या जागेसाठीही उमेदवार उतरवण्याची सूचना केल्याची माहिती आहे. भाजपला आपला 7 वा उमेदवार निवडून आणायचा असेल, तर त्यांना अतिरिक्त 20 मतांची जुळवाजुळव करावी लागेल.Amit Shah
मविआला सातवी जागा मिळण्याची शक्यता कमी
सूत्रांच्या माहितीनुसार, महाविकास आघाडीला सातवी जागा मिळण्याची फार कमी शक्यता आहे. कारण, महायुतीने अतिरिक्त 20 मते मिळवण्यासाठी तत्काळ पाऊले उचलण्यास सुरुवात केली आहे. सद्यस्थितीनुसार मविआतील तिन्ही घटकपक्ष एकत्र येऊन संयुक्त उमेदवार देण्याची शक्यता फार कमी आहे. विशेषतः काँग्रेस व शिवसेनेच्या ठाकरे गटाने राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाला बाजूला ठेवून आपला संयुक्त उमेदवार दिला, तर त्याला 36 मतांचे काठावरचे बहुमत मिळेल. पण या स्थितीत शरद पवार गट कोणती भूमिका घेतो हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
भाजपकडून नव्या चेहऱ्यांना संधी
दुसरीकडे, राज्यसभेच्या 3 ते 4 जागा जिंकण्याचे संख्याबळ असणाऱ्या भाजपकडून या निवडणुकीत काही नव्या चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. भाजप केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांना आपल्या कोट्यातून राज्यसभेवर पाठवेल. पण त्याव्यतिरिक्त भाजप महाराष्ट्रातून एका अमराठी व्यक्तीलाही संसदेच्या वरिष्ठ सभागृहात पाठवण्याची शक्यता आहे. या प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी भाजपच्या राज्य सुकाणू समितीची नुकतीच बैठक झाली. त्यात निश्चित झालेल्या नावांवर भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण व इतर नेते भाजप अध्यक्ष नितीन नबीन यांच्याशी चर्चा करण्याची शक्यात आहे. त्यानंतर पुढील एक-दोन दिवसांत भाजपच्या उमेदवारांची नावे जाहीर केली जातील.
भागवत कराड यंदा अपवाद ठरणार का?
भाजपने परराष्ट्र मंत्री एस जयशंकर, अर्थमंत्री निर्मला सीतारामन, रामदास आठवले या ज्येष्ठ मंत्र्यांचे अपवाद वगळता इतर कोणत्याही नेत्याला दुसऱ्यांदा राज्यसभेची संधी दिली नाही. विशेषतः महाराष्ट्र, गुजरात, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेशासारख्या राज्यांविषयी भाजपने हेच धोरण ठरवल्याचा इतिहास आहे. पण माजी अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यावेळी याला अपवाद ठरतात का? असा प्रश्न भाजपच्या गोटात चर्चिला जात आहे. सूत्रांच्या मते, भाजप यावेळी भागवत कराड यांच्यासह रावसाहेब दानवे व धैर्यशील पाटील यांना राज्यात काम करण्याची सूचना करू शकते.
विनोद तावडे अन् विजया रहाटकरांना संधी!
भाजपकडून राज्यसभेसाठी विनोद तावडे व राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांची नावे चर्चेत आहेत. तावडे स्वतः महाराष्ट्रातून राज्यसभेवर जाण्यास कितपत उत्सुक आहेत हा ही या प्रकरणी प्रश्न आहे. पण भाजच्या वरिष्ठ पातळीवर पक्षाच्या उमेदवारांची नावे निश्चित झाल्याची माहिती आहे. त्यात एका अमराठी नेत्याचेही नाव असल्याची चर्चा आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App