विशेष प्रतिनिधी
पुणे : Moshi Garbage पिंपरी-चिंचवडमधील मोशी कचरा डेपो येथे झालेल्या भीषण दुर्घटनेत बचाव पथकांना मोठे यश मिळाले आहे. अतिवृष्टीमुळे कचऱ्याच्या महाकाय ढिगाऱ्याखाली कोसळलेल्या ‘वेस्ट टू एनर्जी’ प्रकल्पाच्या प्रशासकीय इमारतीच्या ढिगाऱ्यातून आतापर्यंत ९ जणांची सुखरूप सुटका करण्यात आली आहे. मात्र, अद्यापही ६ ते ७ कर्मचारी ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती कायम असून, त्यांना बाहेर काढण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF), अग्निशमन दल आणि स्थानिक प्रशासन युद्धपातळीवर बचावकार्य करत आहे.Moshi Garbage
कचऱ्याच्या डोंगराचे भूस्खलन अन् इमारत कोसळली
बुधवारी दुपारी सुमारे पावणेदोनच्या सुमारास मोशी कचरा डेपोमध्ये ही दुर्घटना घडली. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे डेपोतील जुन्या कचऱ्याच्या महाकाय ढिगाऱ्याचे भूस्खलन झाले. हा कचऱ्याचा डोंगर थेट महापालिकेच्या ‘वेस्ट टू एनर्जी’ प्रकल्पाच्या प्रशासकीय इमारतीवर कोसळल्याने संपूर्ण इमारत क्षणात जमीनदोस्त झाली. त्यावेळी कार्यालयात अनेक कर्मचारी काम करत असल्याने ते ढिगाऱ्याखाली अडकले.Moshi Garbage
९ जणांना जिवंत बाहेर काढण्यात यश
रात्रभर सुरू असलेल्या बचाव मोहिमेत आतापर्यंत ९ जणांना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करून उपचार सुरू करण्यात आले आहेत. बचाव पथकांकडून अत्याधुनिक उपकरणांच्या साहाय्याने ढिगारा हटविण्याचे काम सुरू असून उर्वरित कर्मचाऱ्यांचा शोध सुरू आहे.
मंत्री गिरीश महाजन घटनास्थळी
राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी घटनास्थळी भेट देऊन बचावकार्याचा आढावा घेतला. त्यांनी सांगितले की, इमारतीत सुमारे २२ जण असल्याची माहिती मिळाली होती. त्यापैकी काही कर्मचारी स्वतः बाहेर पडले, तर अनेकांना बचाव पथकांनी सुरक्षित बाहेर काढले आहे. अद्याप काही कर्मचारी ढिगाऱ्याखाली अडकले असून त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न सुरू आहे.
महाजन यांनी सांगितले की, काही अडकलेल्या व्यक्तींना चहा आणि बिस्किटेही पोहोचवण्यात आली आहेत. मात्र, काहींचे पाय काँक्रीटच्या खांबाखाली अडकल्यामुळे त्यांची सुटका करण्यास अडचणी येत आहेत. सर्वांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी कोणतीही कसर सोडली जाणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
मृत्यूबाबत अद्याप अधिकृत दुजोरा नाही
दुर्घटनेनंतर तीन जणांचा मृत्यू झाल्याच्या चर्चा सुरू असल्या तरी प्रशासनाने अद्याप कोणत्याही मृत्यूची अधिकृत पुष्टी केलेली नाही. पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाने सध्या संपूर्ण लक्ष बचाव मोहिमेवर केंद्रित असल्याचे स्पष्ट केले आहे.
मुसळधार पावसामुळे परिस्थिती गंभीर
पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर धरणांच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस होत असून धरणांतील पाणीसाठ्यात वेगाने वाढ होत आहे. पवना आणि इंद्रायणी नद्यांच्या पाणीपातळीतही वाढ झाली आहे. भारतीय हवामान विभागाने पुढील २४ ते ४८ तासांसाठी ‘ऑरेंज अलर्ट’ जारी केला असून नागरिकांना नदीपात्र, भूस्खलनाचा धोका असलेले भाग आणि जुन्या इमारतींपासून दूर राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
दुर्घटनेच्या कारणांचा तपास होणार
ही प्रशासकीय इमारत अधिकृत होती की अनधिकृत, तसेच केवळ अतिवृष्टीमुळे ही दुर्घटना घडली की त्यामागे बांधकामातील किंवा सुरक्षिततेतील निष्काळजीपणाही कारणीभूत होता, याचा सखोल तपास बचावकार्य पूर्ण झाल्यानंतर करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने सांगितले आहे. स्थानिक आमदार महेश लांडगे यांच्यासह अनेक लोकप्रतिनिधींनी घटनास्थळी भेट देत परिस्थितीचा आढावा घेतला असून, दुर्घटनेतील जबाबदारी निश्चित करण्याची मागणीही जोर धरत आहे.
Moshi Garbage Depot Collapse: 9 Rescued, 6-7 Still Trapped Under Debris
महत्वाच्या बातम्या
- पिनाका लांब पल्ल्याच्या गाईडेड रॉकेटची अचूक माऱ्याची चाचणी यशस्वी; सीमेपार दहशतवाद्यांचे अड्डे टार्गेट करणे सोपे!!
- अमरनाथ यात्रेत घातपाताचा संशय; तीन संशयीतांना फेशियल रेकग्निशन कॅमेऱ्यावरून ओळखून अटक!!
- भाजपची रणनीती : ठाकरेंच्या फुटीर नेत्यांना सत्तेचे गाजर; पण पवारांच्या सगळ्या नेत्यांना सत्तेचे मृगजळ!!
- सशक्त लोकशाहीत संवाद साधण्याखेरीज दुसरे करणार तरी काय??