विशेष प्रतिनिधी
मुंबई : Nana Patole काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नाना पटोले यांनी भोंदू अशोक खरात हा सरकारचाच माणूस असल्याचा आरोप केला आहे. अशोक खरात हा सरकारचा माणूस आहे. या प्रकरणाच्या चौकशीसाठी सरकारने स्थापन केलेल्या एसआयटी अर्थात विशेष तपास पथकाने अद्याप कुणावरही ठोस कारवाई केली नाही. त्यामुळे या प्रकरणात काही बडे राजकारणी व अधिकाऱ्यांना वाचवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे स्पष्ट होते, असे ते म्हणालेत.Nana Patole
भोंदू अशोक खरात प्रकरणात दररोज नवनवे खुलासे होते आहेत. खरातशी संबंध आल्यामुळे रुपाली चाकणकर यांना आतापर्यंत राज्य महिला आयोगाचे अध्यक्षपद व सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीचे प्रदेशाध्यक्षपद सोडावे लागले आहे. आता त्यांच्यामागे एसआयटी चौकशीचा ससेमिरा लागण्याचीही शक्यता आहे. या प्रकरणात राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सत्ताधारी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यासह अनेक नेत्यांची नावे आली आहेत. पण तूर्त तरी एसआयटीने या प्रकरणी एकाही नेत्याला चौकशीसाठी बोलावले नाही. या पार्श्वभूमीवर काँग्रेस आमदार नाना पटोले यांनी उपरोक्त आरोप करत या प्रकरणाच्या एकूण चौकशीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.Nana Patole
सरकार अन् एसआयटीकडून अजून ठोस कारवाई नाही
नाना पटोले रविवारी म्हणाले, अशोक खरात हा सरकारचाच माणूस आहे. या प्रकरणात SIT चौकशी लावण्यात आली होती, मात्र त्या SIT कडून अद्याप कोणावरही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही. भोंदू अशोक खरात तसेच त्याच्यासोबत असलेल्या काही राजकारणी आणि अधिकाऱ्यांना वाचवण्याचा प्रयत्न महाराष्ट्रात सुरू असल्याचे दिसून येत आहे. दररोज या प्रकरणाशी संबंधित नवनवीन माहिती समोर येत आहे. अशोक खरात प्रकरणात सरकार राजकारण करत आहे. नाशिकसारख्या पवित्र स्थळी ही घटना घडली, परंतु सरकारकडून अद्याप ठोस कारवाई करण्यात आलेली नाही, ही चिंतेची बाब आहे.
खरातविरोधात एसआयटीकडे भक्कम पुरावे
एसआयटीने शुक्रवारी अशोक खरातच्या कार्यालयाची पुन्हा एकदा झडती घेतली. त्यात अधिकाऱ्यांनी अनेक गोष्टी जप्त केल्यात. यात अशोक खरात आपल्या भक्तांना देत असलेल्या विशिष्ठ औषधाची बाटली, कुजलेले पेढे, सॅनेटायझरची बाटली आदींचा समावेश आहे. या सर्व वस्तूंसह कार्यालयाच्या दरवाजाच्या आतील कडीवर खरातच्या हातांचे ठसे आढळले आहेत. खरात याच वस्तूंचा वापर करून पीडित महिलांना आपण सांगू ते करण्यास भाग पाडत होता, असा संशय आहे. या वस्तूंवर पीडित महिलांच्या हातांचे ठसे आढळले नाहीत. पण खरातने पीडितांवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याचे अन्य काही पुरावे एसआयटीच्या हाती लागलेत. हेच पुरावे अशोक खरातला दोषी ठरवण्यासाठी महत्त्वाचे ठरतील असा दावा केला जात आहे.
खरातवर तब्बल 16 गुन्हे, पैकी 8 बलात्काराचे
उल्लेखनीय बाब म्हणजे भोंदू अशोक खरातवर शिर्डी, सिन्नर, नाशिक आदी वेगवेगळ्या भागांत तब्बल 16 गुन्हे दाखल झालेत. यात लैंगिक अत्याचाराशी संबंधित तब्बल 8 गुन्ह्यांचा समावेश आहे. सध्या खरात पोलिस कोठडीत आहे. त्याची कोठडी सोमवारी संपणार असल्यामुळे त्याला उद्या पुन्हा कोर्टात हजर केले जाणार आहे. त्याचे काळे कारनामे पाहता त्याच्याभोवती चौकशीचा फास घट्टपणे आवळला जावा, यासाठी तपास यंत्रणेने अधिक खबरदारी घेतली आहे.
अशोक खरातची पत्नी कल्पना अद्याप फरार
दुसरीकडे, अशोक खरातची पत्नी कल्पना अद्याप फरार आहे. गत 10 दिवसांपासून पोलिस तिचा शोध घेत आहेत. पण अद्याप ती हाती लागली नाही. पोलिसांनी या प्रकरणी कल्पनाच्या माहेरी जाऊन विचारपूस केली. तसेच तिच्या नातलगांचीही झाडाझडती घेतली. पण तिचा कोणताही थांगपत्ता अजून लागला नाही. त्यामुळे फरार कल्पना कुठे आहे? हे अद्याप स्पष्ट झाले नाही.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App