विशेष प्रतिनिधी
मुंबई : Maharashtra-Karnataka महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्नाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी विधानभवनात उच्चाधिकार समितीची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष तथा खासदार शरद पवार, खासदार नारायण राणे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, सीमा भागातील लोकप्रतिनिधी आणि सर्वपक्षीय नेते उपस्थित होते. विशेष म्हणजे, अधिवेशन काळात तब्बल 30 वर्षांनंतर शरद पवार विधानभवनात दाखल झाले.Maharashtra-Karnataka
शरद पवार बैठकीसाठी येणार असल्याने राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे सर्व आमदार विधानभवनात त्यांच्या स्वागतासाठी उपस्थित होते. संसदीय कामकाज मंत्री चंद्रकांत पाटील यांनीही शरद पवार यांचे स्वागत केले. विधानभवन परिसरात त्यांच्या आगमनाची राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली.Maharashtra-Karnataka
सीमा प्रश्नावर न्यायालयीन लढा अधिक ताकदीने लढण्याचा निर्धार
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्नावरील सर्वोच्च न्यायालयातील लढाई अधिक प्रभावीपणे लढण्याबाबत चर्चा झाली. राज्य सरकारने हा खटला अधिक ताकदीने मांडण्याचा निर्धार व्यक्त केला. बैठकीत बेळगाव, कारवार, निपाणीसह मराठीबहुल भाग संयुक्त महाराष्ट्रात यावेत, ही महाराष्ट्राची भूमिका कायम ठेवण्यात आली.
सर्वोच्च न्यायालयात प्रकरण प्रलंबित असल्याने राज्याची कायदेशीर बाजू आणखी मजबूत करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे, ऐतिहासिक पुरावे आणि पुढील रणनीती यावरही चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.
सीमालढ्यात शरद पवारांची सातत्यपूर्ण भूमिका
महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्नावर शरद पवार यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीच्या सुरुवातीपासून सातत्याने भूमिका घेतली आहे. मराठी भाषिक भाग महाराष्ट्रात यावेत, या मागणीसाठी त्यांनी अनेकदा आवाज उठवला आहे. त्यामुळे या महत्त्वाच्या बैठकीत त्यांची उपस्थिती विशेष मानली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, 1996 नंतर प्रथमच अधिवेशन काळात ते विधानभवनात आले. बैठकीत जवळपास अर्धा तास विविध मुद्द्यांवर चर्चा झाली आणि सीमावादाच्या न्यायालयीन लढाईला अधिक गती देण्यावर सर्वपक्षीय नेत्यांमध्ये एकमत झाले.
शरद पवारांची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना सदिच्छा भेट
उच्चाधिकार समितीची बैठक संपल्यानंतर शरद पवार यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विधानभवनातील दालनात सदिच्छा भेट घेतली. त्यावेळी कॅबिनेट बैठकीसाठी रवाना होण्यापूर्वी एकनाथ शिंदे यांनी स्वतः कार्यालयात येऊन शरद पवार यांचे स्वागत केले. शाल आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच त्यांच्या प्रकृतीचीही विचारपूस करण्यात आली.
यानंतर शरद पवार यांनी विधानभवनात राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या आमदारांची स्वतंत्र बैठक घेतल्याची माहिती समोर आली आहे.
शरद पवार विधानभवनात पोहोचताच त्यांच्या पक्षाच्या आमदारांनी आणि नेत्यांनी त्यांचे उत्साहात स्वागत केले. त्यांच्या स्वागतासाठी माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, रोहित पाटील, संदीप क्षीरसागर, उत्तमराव जानकर, अभिजित पाटील, राजू खरे, नारायण पाटील आणि बापू पठारे यांच्यासह अनेक आमदार व पदाधिकारी उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या सर्व आमदारांनी त्यांचे स्वागत करत त्यांना बैठकीसाठी शुभेच्छा दिल्या.
Maharashtra-Karnataka Border Dispute: Sharad Pawar Attends High-Level Meet After 30 Years
महत्वाच्या बातम्या
- पिनाका लांब पल्ल्याच्या गाईडेड रॉकेटची अचूक माऱ्याची चाचणी यशस्वी; सीमेपार दहशतवाद्यांचे अड्डे टार्गेट करणे सोपे!!
- अमरनाथ यात्रेत घातपाताचा संशय; तीन संशयीतांना फेशियल रेकग्निशन कॅमेऱ्यावरून ओळखून अटक!!
- भाजपची रणनीती : ठाकरेंच्या फुटीर नेत्यांना सत्तेचे गाजर; पण पवारांच्या सगळ्या नेत्यांना सत्तेचे मृगजळ!!
- सशक्त लोकशाहीत संवाद साधण्याखेरीज दुसरे करणार तरी काय??