नाशिक : ज्यांना ठाकरे आणि पवार करायला गेले गारद; तेच फडणवीस ठरले महाराष्ट्राचे धुरंधर!!, हे महापालिका निवडणुकांच्या निकालाने आज संपूर्ण देशाला दाखवून दिले.
एकीकडे सगळ्या माध्यमांनी ठाकरे आणि पवार ब्रँडचा ढोल वाजवला असताना दुसरीकडे फडणवीस यांनी कधीही स्वतःच्या ब्रँडची टिमकी किंवा टाळी वाजवली नव्हती. उलट ठाकरे आणि पवार हे दोन ब्रँड देवेंद्र फडणवीस नावाच्या नेत्याला महाराष्ट्रात गारद करायला निघाले होते. त्यासाठी त्यांनी नाही नाही ते हातखंडे आजमावले होते. ठाकरे आणि पवार कधी काँग्रेस सह एकत्र आले होते, तर कधी वेगवेगळे झाले होते, पण त्यांचे ध्येय देवेंद्र फडणवीस नावाच्या नेत्याला गारद करायचेच होते. त्यापलीकडे दुसरे काहीही त्यांना सुचत नव्हते. म्हणून तर 2019 पासून 2026 पर्यंत 7 वर्षांमध्ये ठाकरे आणि पवारांनी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाने खडे फोडले होते. पवारांनी तर मनोज जरांगे नावाचे राजकीय वादळ देखील उभे करून पाहिले. परंतु, ते वादळ त्यांच्यावरच उलटले. देवेंद्र फडणवीस यांचे राजकीय अस्तित्व मिटवायला निघालेल्या मनोज जरांगे आणि पवार यांचेच तंबू त्या वादळात गारद झाले.
– फडणवीसांचा विकासाचा अजेंडा
ठाकरे आणि पवारांनी ही निवडणूक जशी “पर्सनली” घेतली होती, तशी देवेंद्र फडणवीस यांनी ही निवडणूक “पर्सनली” घेतली नव्हती. त्यांनी ही निवडणूक भाजपच्या संघटनात्मक पातळीवर घेतली. देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःहून ठरवून विकासाचा अजेंडा मुख्य ठेवला होता. त्यांची सगळी भाषणे विकासाच्या अजेंड्याच्या भोवतीच केंद्रित राहिली. ठाकरे बंधूंनी एकत्र येऊन आणि पवार काका – पुतण्यांनी एकत्र येऊन भाजप विरुद्ध जोरदार प्रचार केला होता. अजित पवारांनी तर भाजपच्या सत्तेच्या वळचणीला राहून भाजपवरच आरोपांच्या दुगाण्या झोडल्या होत्या. पण त्या फोल ठरल्या.
– फडणवीसांचा सर्वत्र संचार
पण हेच फडणवीस ठाकरे आणि पवारांना पुरून उरले. त्यांनी 29 महापालिकांच्या परिक्षेत्रांमध्ये सर्वत्र संचार केला. सगळीकडे निवडणुकीच्या नियोजनापासून ते त्या नियोजनाच्या अंमलबजावणी पर्यंत फडणवीस स्वतः आघाडीवर राहिले. त्यांनी आघाडीवर राहून भाजपचे नेतृत्व केले. ठाकरे म्हणजे शिवसेना आणि पवार म्हणजे राष्ट्रवादी या समीकरणाला उत्तर देताना फडणवीस यांनी फडणवीस म्हणजे भाजप असे कधीच म्हटले नाही तर भाजप म्हणजे फडणवीस हे ते त्यांनी जनतेच्या मनावर ठसाविले. ठाकरे आणि पवारांनी स्वतःला मुंबई आणि पुणे पिंपरी चिंचवड पुरते मर्यादित करून घेतले, त्याच वेळी फडणवीसांनी स्वतःला महाराष्ट्रव्यापी नेता म्हणून प्रस्थापित केले. केवळ माध्यमांनी ढोल पिटले म्हणून कोणी ब्रँड होत नाही. त्यासाठी प्रत्यक्ष जमिनीत स्तरावर उतरून काम करावे लागते हे देवेंद्र फडणवीस नावाच्या नेत्याने सिद्ध केले. ठाकरे आणि पवारांनी नुसत्याच कार्यकर्त्यांविषयी गप्पा मारल्या पण देवेंद्र फडणवीस नावाच्या नेत्याने कार्यकर्त्यांच्या बाहूंमध्ये मध्ये “बळ” भरले. म्हणून तर ते ठाकरे आणि पवार नावाच्या पैलवानांना खऱ्या अर्थाने गारद करू शकले.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App