विशेष प्रतिनिधी
मुंबई : CM Fadnavis राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्यांमध्ये विधानभवनाच्या आवारातच जोरदार हाणामारी झाली. या घटनेने राजकीय वर्तुळात खळबळ उडवली असून, वातावरण चांगलेच तापले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( CM Fadnavis ) यांनी देखील या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेतली आहे. त्यांनी विधानसभेचे अध्यक्ष आणि विधानपरिषदेचे सभापती यांना घटनेची चौकशी करून तात्काळ आणि कठोर कारवाई करण्याची विनंती केली आहे.CM Fadnavis
विधिमंडळाचे अधिवेशन चालू असताना आज विधानभवनाच्या परिसरात जितेंद्र आव्हाड आणि गोपीचंद पडळकर यांचे कार्यकर्ते समोरासमोर आले. यावेळी गोपीचंद पडळकर यांचा कार्यकर्ता ऋषिकेश कटले याने जितेंद्र आव्हाड यांचा कार्यकर्ता नितीन देशमुख यांना मारहाण केली असून, शिवीगाळही करण्यात आली. या घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे. दरम्यान, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत घटनेचा अहवाल मागवला आहे. या घटनेची आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील गंभीर दखल घेतली आहे.CM Fadnavis
नेमके काय म्हणाले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस?
घडलेली घटना ही अतिशय चुकीची आहे. विधानभवनात अशा प्रकारची घटना घडणे योग्य नाही. विधानसभेचे अध्यक्ष आणि विधानपरिषदेचे सभापती यांच्या अंतर्गत विधानभवनाचा परिसर येतो. त्यामुळे या दोघांनीही घडलेल्या प्रकाराची गंभीर दखल घ्यावी. तसेच यावर कडक कारवाई करावी, अशी विनंती मी विधानसभा अध्यक्षांना केल्याचे त्यांनी सांगितले. विधानभवनाच्या परिसरात लोक मोठ्या प्रमाणात जमा होतात आणि मारामारी करतात हे विधानभवनाला शोभणारे नाही. म्हणूनच यावर निश्चित कारवाई ही झालीच पाहिजे, अशी भूमिकाही यावेळी फडणवीस यांनी स्पष्ट केली.
विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयाकडे लक्ष
आमदार जितेंद्र आव्हाड यांनी विधानभवनाच्या लॉबीत घडलेला प्रकार मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या लक्षात आणून दिला असून, यासंदर्भात विधानसभा अध्यक्षांनाही या प्रकरणाबाबत सविस्तर माहिती देण्यात आली आहे. दुसरीकडे, मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही घटनेची गंभीर दखल घेत विधानसभा अध्यक्षांनी कठोर कारवाई करावी, अशी स्पष्ट भूमिका घेतली आहे. त्यामुळे आता विधानसभा अध्यक्ष या प्रकरणावर काय निर्णय घेतात? आणि ते कोणत्या पद्धतीने कारवाई करतात? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
हाणामारी करणाऱ्या गुंडांसह त्यांच्या पोषिंद्यांवर कारवाई करा – उद्धव ठाकरे
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही या प्रकरणी तीव्र चिंता व्यक्त केली आहे. हाणामारी करणारे समर्थक होते का गुंड होते? येथे अशी परिस्थिती निर्माण झाली असेल तर विधानभवनाला अर्थ काय? ज्यांनी या लोकांना पास दिले त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. मग तो कोणत्याही पक्षाचा असो. ज्यांनी त्यांना पास दिले त्यांचे नाव पुढे आले पाहिजे. शेवटी हा अधिकार अध्यक्षांचा असतो. अध्यक्षांची दिशाभूल केली गेली का? हा पण विषय आहे. पण अशी मारामारी आमदारांना धक्काबुक्की ही गुंडागर्दी आता विधानभवनापर्यंत पोहोचली असेल तर मग हे फार अवघड आहे. या प्रकरणी मुख्यमंत्री व गृहमंत्र्यांनी सर्व विषय सोडून या गुंडांवर व त्यांच्या पोषिंद्यांवर कडक कारवाई केली पाहिजे. असे झाले तरच तुम्ही मुख्यमंत्री म्हणून जनतेला तोंड दाखवण्याच्या पात्रतेचे आहात असे मी म्हणेन, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
झाला प्रकार अतिशय गंभीर आहे. विधानभवनासारख्या वास्तूचे पावित्र जपले पाहिजे. त्यांचे वाद वैयक्तिक असतील तर ते बाहेर झाले पाहिजे. पण विधानभवनात गुंड आणणाऱ्यांची चौकशी व्हायला हवी. ज्यांनी पास दिली त्यांच्यावरही कारवाई व्हायला हवी, असेही ठाकरे यावेळी आवर्जुन म्हणाले.
CM Fadnavis Urges Action on Awhad-Padalkar Clash at Vidhan Bhavan
महत्वाच्या बातम्या
- Mahayuti Govt : महायुती सरकारची मोठी घोषणा- पंढरपुरातील 213 सफाई कामगारांना 600 चौरस फुटांची घरे
- एकनाथ शिंदेंशी युती करण्यासाठी आर्थिक फायदा मिळालाय का? वंचित बहुजन आघाडीचा आनंदराज आंबेडकर यांना सवाल
- आव्हाड – पडळकर यांच्या कार्यकर्त्यांच्या हाणामारीवर मुख्यमंत्री फडणवीसांचे टीकास्त्र; कठोर कारवाईचे आदेश; पडळकरांकडून दिलगिरी व्यक्त
- Gaza Food Center : गाझात फूड सेंटरमध्ये चेंगराचेंगरी, 43 ठार; जमावाने 15 जणांना चिरडले; इस्रायली सैन्यावर नरसंहाराचा आरोप