नाशिक : महाराष्ट्राच्या निवडणूक आयोगाने वेगवेगळी कायदेशीर कारणे देऊन महाराष्ट्रातल्या 22 नगराध्यक्षांच्या हाय प्रोफाईल निवडणुका अचानक पुढे ढकलल्या. या निवडणुकांचा नवीन कार्यक्रम आणि प्रक्रिया सुद्धा जाहीर केली त्यानुसार 20 डिसेंबरला मतदान होऊन 21 डिसेंबरला निकाल जाहीर होईल. पण निवडणूक आयोगाने आधीच जाहीर केलेल्या निवडणुकांचा प्रचार संपण्याच्या आदल्या दिवशी अचानक निवडणूक रद्द करायचा निर्णय घेतल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली पण विरोधकांनी मात्र साधा आवाजही काढला नाही.
निवडणूक आयोगाने आरक्षण मर्यादा ओलांडल्याचे कारण देऊन बारामती, अनगर, कोपरगाव, पाथर्डी, महाबळेश्वर, फलटण, नेवासा, मंगळवेढा, फुरसुंगी, फुलंब्री धर्माबाद वसमत रेणापूर, अंबरनाथ, यवतमाळ, बाळापूर, अंजनगाव सुर्जी आणि देऊळगाव राजा या गावांमधल्या नगराध्यक्ष पदांच्या निवडणुका आणि काही नगरसेवकांच्या निवडणुका पुढे ढकलल्या. हे सगळे मतदारसंघ आणि गावे महाराष्ट्रातल्या हाय प्रोफाईल नेत्यांचे बालेकिल्ले मानले जातात. आपापले गड राखण्यासाठी आणि गडाला खिंडार पाडण्यासाठी इथे सगळे मेहनत घेतात. पण याच बालेकिल्ल्यांच्या नगराध्यक्ष पदाची निवडणूक पुढे ढकलल्यानंतर विरोधी पक्षांपैकी कुणीही निवडणूक आयोगावर आवाज टाकला नाही.
अनगरची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी राजन पाटलांनी जंग जंग पछाडले. विरोधातले सगळे आवाज दाबले पण त्यांच्या या “मेहनतीवर” सगळे पाणी फेरले. अनगरच्या नगराध्यक्ष पदाची निवडणूक रद्द झाली. त्यामुळे राजन पाटलांची सून अनगरची पहिली नगराध्यक्षा होऊ शकली नाही.
– फडणवीसांनी घेतला आक्षेप
निवडणूक आयोगाच्या या निर्णयामुळे कार्यकर्त्यांची मेहनत वाया गेली. खर्च वाया गेला. निवडणुका आयोगाने कायद्याचा चुकीचा अर्थ लावून या निवडणुका अचानक पुढे ढकलल्या. या संदर्भात आम्ही निवडणूक आयोगासमोर प्रेझेंटेशन करू असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
– सुप्रिया सुळे वरातीत नाचल्या
पण विरोधकांनी मात्र कुठलाच आवाज टाकला नाही. एरवी निवडणूक आयोगाच्या प्रत्येक निर्णयावर टीका टिपणी करून त्याला धारेवर धरणाऱ्या विरोधकांनी नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुकीत आधीच नांगी टाकली. शरद पवारांचे राष्ट्रवादी काँग्रेस उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि काँग्रेस त्याचबरोबर मनसे यांनी या निवडणुकीकडे पूर्ण दुर्लक्ष केले. कुठलेही बडे नेते प्रचारात उतरले नाहीत. इतकेच काय, पण कार्यकर्त्यांची निवडणूक असते, असे सांगणाऱ्या खासदार सुप्रिया सुळे सुद्धा बारामती सारख्या बालेकिल्ल्यात आपल्या कार्यकर्त्यांच्या प्रचारात उतरल्या नाहीत. प्रचार करण्याच्या ऐवजी त्या युगेंद्र पवारच्या लग्नाच्या वरातीत नाचल्या.
उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्यांनी सुद्धा प्रचारात फारसा कुठे भाग घेतला नव्हता. काँग्रेस नेत्यांनी विदर्भात तुरळक ठिकाणी प्रचारात भाग घेतला, पण पश्चिम महाराष्ट्रात ते कुठेच दिसले नाहीत. पवारांसाठी वयोवृद्ध ज्येष्ठ नेत्याने प्रचारात भाग घेण्याचा प्रश्नच उद्भवला नाही. पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मात्र प्रचाराचे फड गाजविले. पण एवढ्या हाय प्रोफाईल निवडणुका पुढे ढकलल्याबद्दल विरोधकांनी कुठलाच आवाज टाकला नाही.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App