विशेष प्रतिनिधी
गडचिरोली : Naxal Mastermind भारतीय सुरक्षा यंत्रणांना गेल्या चार दशकांपासून हुलकावणी देणारा आणि देशातील नक्षलवादी चळवळीचा ‘मास्टरमाईंड’ समजला जाणारा माओवादी संघटनेचा सर्वोच्च नेता प्रमुख देवजी उर्फ तीपिरी तिरुपती ने 16 माओवाद्यांसह तेलंगणा पोलिसांसमोर आत्मसमर्पण केल्याची माहिती आहे. देवजीसह त्याचा खंदा समर्थक आणि केंद्रीय समिती सदस्य (CCM) मल्लाराजी रेड्डी ऊर्फ ‘संग्राम’ यानेही तेलंगणा पोलिसांसमोर गुडघे टेकले आहेत.Naxal Mastermind
मे २०२५ मध्ये नंबाला केशव राव उर्फ बसवा राजू याच्या खात्म्यानंतर देवजी नक्षल संघटनेचा महासचिव बनला होता. छत्तीसगडमधील ७६ जवानांच्या बलिदानाला कारणीभूत ठरलेल्या दंतेवाडा हल्ल्याचा तो मुख्य सूत्रधार होता. देवजी याच्यावर १.५ कोटींचे बक्षीस होते. तर १९७५ पासून चळवळीत सक्रिय असलेला संग्राम ओडिशा राज्याचा सचिव होता. संग्रामवर १ कोटींचे बक्षीस होते. या दोघांच्या आत्मसमर्पणामुळे माओवादी संघटना नेतृत्वहीन होण्याच्या मार्गावर आहे. देवजीच्या आत्मसमर्पणावर येत्या दोन दिवसात अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे.Naxal Mastermind
कोण आहे ‘देवजी’?
देवजी हा तेलंगणातील जगतियाल जिल्ह्याचा रहिवासी आहे. ६४ वर्षीय देवजीने १९८३ मध्ये पीपल्स वॉर ग्रुपमधून प्रवासाला सुरुवात केली होती. गडचिरोलीत दलम कमांडर म्हणून काम केलेल्या देवजीने गोव्यापासून केरळपर्यंत नक्षलवादाचा विस्तार करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. ‘अवामी जंग’ या नियतकालिकाद्वारे तो नक्षली विचारसरणीचा प्रसार करायचा. त्याच्या शरणागतीने नक्षल्यांच्या वैचारिक आणि लष्करी दोन्ही बाजू कोसळल्या आहेत.
मल्लाराजी रेड्डी ऊर्फ ‘संग्राम’: मृत्यूच्या अफवांना पूर्णविराम
मल्लाराजी रेड्डी (संग्राम) हा नक्षल चळवळीतील एक अत्यंत अनुभवी आणि विश्वासू चेहरा मानला जातो. तेलंगणातील पेदापल्ली जिल्ह्यातील शतरंजपल्ली येथील मूळ रहिवासी असलेला मल्लाराजी १९७५ पासून माओवादी चळवळीत सक्रिय होता. २०२३ पर्यंत तो ओरिसा स्टेट कमिटीचा सचिव म्हणून काम पाहत होता. त्यानंतर त्याची रवानगी नक्षल्यांचा गड असलेल्या बस्तर भागात करण्यात आली होती. त्याची पहिली पत्नी रथनम्मा १९९८ मध्ये चकमकीत ठार झाली होती, त्यानंतर त्याने छत्तीसगडमधील सगुणा हिच्याशी विवाह केला होता. २०२३ मध्ये मल्लाराजीचा आजारपणामुळे मृत्यू झाल्याच्या बातम्या सर्वत्र पसरल्या होत्या. मात्र, आज त्याने पोलिसांसमोर प्रत्यक्ष हजर होऊन सर्व अफवांना पूर्णविराम दिला आहे.
दीड वर्षातील मोठ्या कारवायांचा परिणाम
सुरक्षा यंत्रणांनी गेल्या वर्षभरात राबवलेल्या ‘ऑपरेशन’मुळे नक्षल चळवळ पूर्णपणे बॅकफूटवर आली होती. २१ मे २०२५ बसवा राजूचा छत्तीसगडमधील चकमकीत खात्मा झाला. दुसऱ्या क्रमांकाचा नेता भूपती याने १५ ऑक्टोबर २०२५ रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आत्मसमर्पण केले होते. मिलिटरी कमांडर माडवी हिडमा हा १८ नोव्हेंबर २०२५ रोजी चकमकीत ठार झाला. त्यानंतर सर्वोच्च नेता थिप्परी तिरुपती उर्फ देवजी हा आत्मसमर्पण करणार अशा बातम्या येत होत्या. अखेर आज देवजीने आत्मसमर्पण केल्याची माहिती समोर आली आहे.
‘नक्षलमुक्त भारत’ संकल्पाकडे वाटचाल
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी ३१ मार्च २०२६ पर्यंत देशातून नक्षलवादाचा समूळ नायनाट करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. या पार्श्वभूमीवर, संघटनेच्या सर्वोच्च प्रमुखांनीच शरणागती पत्करल्याने नक्षल चळवळ आता केवळ कागदावर उरण्याची चिन्हे आहेत. या नेत्यांनी आत्मसमर्पणावेळी मोठ्या प्रमाणात एके-४७ आणि इंसास रायफली पोलिसांकडे सुपूर्द केल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App