नाशिक : राष्ट्रवादीच्या स्वाभिमानाची लक्तरे; रोहित पवारांपासून छगन भुजबळांच्या सगळेच विषय भाजपच्या फांदीला लटकलेले!!, हेच राजकीय चित्र राज्यसभा निवडणुकीच्या राष्ट्रवादीच्या उमेदवारीच्या निमित्ताने समोर आले.
शरद पवारांनी भले स्वाभिमानाच्या मुद्द्यावर राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली असली तरी प्रत्यक्षात त्यांचे राजकारण चालवताना त्यांना काँग्रेसचा आश्रय घ्यावा लागला आणि सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रवादीला आता भाजपचा आश्रय घ्यावा लागतोय. याचेच प्रत्यंतर राज्यसभा पोटनिवडणुकीच्या निमित्ताने आले.
– छगन भुजबळांच्या अटी शर्ती
सुनेत्रा पवारांनी उपमुख्यमंत्री झाल्यानंतर राज्यसभेच्या जागेचा राजीनामा दिला त्यामुळे तिथे पोटनिवडणूक लागली या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीकडून कुणाला उभे करायचे यावर मंथन सुरू झाले त्यामध्ये छगन भुजबळांचे नाव पुढे आले पण छगन भुजबळ यांनी राष्ट्रवादीच्या नेतृत्व समोर अटी शर्ती लादून सुनेत्र पवारांची कोंडी केली. समीर भुजबळला राज्यात मंत्री करा तरच मी राज्यसभेची उमेदवारी करेन, असे छगन भुजबळ म्हणाले त्यामुळे छगन भुजबळांच्या इच्छेचा बॉल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कोर्टात गेला. देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांचे आणि भुजबळांचे म्हणणे ऐकून घेतले आणि दिल्लीशी बोलून कळवतो असे त्यांना सांगितले. त्यामुळे छगन भुजबळ यांच्या राज्यसभेचा विषय भाजपच्या दिल्लीतल्या फांदीला लटकला. इकडे छगन भुजबळ वाट पाहत राहिले पण दिल्लीतून कुठला निर्णय अजून तरी आला नाही.
– रोहित पवारांची लुडबुड
त्याचवेळी रोहित पवारांनी सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये लुडबुड करून छगन भुजबळ यांना उमेदवारी दिली नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस भाजप पुढे शरण गेली असे चित्र निर्माण होईल, असा दावा केला.
– रोहित पवारांचा विषय भाजपच्या फांदीला लटकलेला
सुनील तटकरे यांनी रोहित पवारांना जोरदार प्रत्युत्तर दिले. रोहित पवारांचा आम्हाला सल्ला द्यायचा अधिकारच काय??, त्यांचा सल्ला कुणी मागितलाय??, त्यामुळे त्यांनी सहकारी सांभाळावेत. रोहित पवार हडपसर मधून भाजपची उमेदवारी मिळवण्यासाठी वर्षा बंगल्याचे उंबरठे कसे झिजवत होते, रोहित पवारांना महाविकास आघाडीच्या मंत्रिमंडळात घेतले नाही म्हणून कर्जत विधानसभेचा राजीनामा देऊन भाजपची उमेदवारी मिळवण्यासाठी ते कुणाकुणाला घेऊन कुणाकुणाकडे गेले होते, याची साद्यांत माहिती माझ्याकडे आहे. त्यामुळे त्यांनी उगाच आपल्याला राजकारणातले फार कळते असा आव आणू नये, असा टोला सुनील तटकरे यांनी रोहित पवारांना हाणला.
– राष्ट्रवादीच्या स्वाभिमानाची लक्तरे
त्यामुळे आज जरी रोहित पवार भाजपच्या विरोधात आदळआपट करणारी विधाने करत असले, तरी काहीच वर्षांपूर्वी त्यांनी भाजपची उमेदवारी मिळवण्यासाठी भाजपच्या नेत्यांचे उंबरठे झिजविले होते, हेच राजकीय सत्य सुनील तटकरे यांच्या वक्तव्यामुळे बाहेर आले. याचा अर्थच छगन भुजबळ ते रोहित पवार हे सगळेच विषय भाजपच्या फांदीला लटकून राहिलेत. राष्ट्रवादीच्या स्वाभिमानाची लक्तरे निघालीत, हेच राजकीय वास्तव पुन्हा एकदा सिद्ध झाले.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App