विशेष प्रतिनिधी
पुणे : “आखाती देशांतील युद्धजन्य परिस्थितीमुळे जगभरात ऊर्जा संकटाची टांगती तलवार आहे. भारताकडे सध्या ६५ दिवस पुरेल इतका धोरणात्मक ऊर्जासाठा उपलब्ध आहे. मात्र, सध्या देशाला बाह्य संकटापेक्षा अंतर्गत दुष्प्रचार आणि अपप्रचाराचा धोका अधिक आहे. त्यामुळे आगामी काळातील ऊर्जा सुरक्षेच्या युद्धात प्रत्येक भारतीयाने सजग राहून लढायला हवे,” असे आवाहन संरक्षण तज्ज्ञ ब्रिगेडीअर (निवृत्त) हेमंत महाजन यांनी केले. Hemant Mahajan
एरंडवणे परिसरातील सेवा भवन येथे आयोजित ‘भारत आणि मध्यपूर्व संघर्ष’ या विशेष व्याख्यानात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर तेल आणि वायू क्षेत्रातील जागतिक तज्ज्ञ कल्याण कुलकर्णी, प्रबोधन मंचाचे अध्यक्ष विद्याधर कुलकर्णी आणि विश्व संवाद केंद्राचे अध्यक्ष अभय कुलकर्णी उपस्थित होते.
महाजन म्हणाले, “जगाच्या तुलनेत भारत अधिक सुरक्षित स्थितीत आहे. आपली तेल शुद्धीकरण क्षमता तिप्पट असून आपण युरोपलाही शुद्ध तेलाची निर्यात करतो. गरज पडल्यास आपण निर्यात थांबवून देशांतर्गत पुरवठा सुरळीत करू शकतो. नागरिकांनी ऊर्जा बचतीसाठी पुढाकार घेण्याची गरज आहे. घाबरून जाण्याचे कारण नाही, मात्र ‘देश प्रथम’ ही भावना ठेवून अपप्रचाराला बळी पडू नका.”
– अमेरिकेपेक्षा इजरायल फोकस्ड
अमेरिकेची स्थिती सांगताना महाजन म्हणाले की, अमेरिका या युद्धातून बाहेर पडण्यासाठी पळवाट शोधत आहे. त्यांची वायूसेनेची ताकद मोठ्या प्रमाणावर खर्ची पडली आहे. दुसरीकडे, इराणच्या सॅटलाईट गायडन्स आणि एअर डिफेन्स सिस्टीममध्ये चीनचा हस्तक्षेप वाढत आहे. इस्रायल अत्यंत फोकस्ड असून हिजबुल्ला आणि हुतींचे अस्तित्व संपवण्यासाठी प्रयत्नशील आहे. राष्ट्रीय हिताच्या रक्षणासाठी विक्षिप्त राज्यकर्त्यांशी कसे वागायचे, हे आपण शिकले पाहिजे आणि त्यासाठी आपला अभ्यासक्रमही वेगाने बदलायला हवा.
– इराण लढाऊ वृत्तीचा देश
कल्याण कुलकर्णी यांनी इराणच्या ऐतिहासिक वारशावर प्रकाश टाकला. ते म्हणाले, “इराणचा इतिहास लढाऊ वृत्तीचा आहे. झोराष्ट्रीयन धर्म हा सनातन धर्मातून प्रभावित होता. इस्लामसोबतच्या लढाईतही त्यांनी सहजासहजी शरणागती पत्करली नाही. त्यांची भाषा आणि संस्कृतीचा प्रभाव खलिफांवरही राहिला आहे. इराणने नेहमीच योद्ध्यांची भूमिका बजावली आहे.” व्हीएसके पुणे फाउंडेशन आणि प्रज्ञा प्रवाह यांच्या वतीने हे आयोजन करण्यात आले. सुवर्णा ढमढेरे यांनी सूत्रसंचालन केले, तर अजय महाजन यांनी आभार मानले.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App