- तीन आयपीएस अधिकाऱ्यांची दिल्लीला प्रतिनियुक्तीवर बदली
वृत्तसंस्था
कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये भाजपा अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी केंद्रीय गृहमंत्रालयाने तीन आयपीएस अधिकाऱ्यांवर कारवाई करताच मुख्यमंत्री ममता बॅनर्जींचा तृणमूळ काँग्रेस पक्ष चिडला. तिन्ही आयपीएस अधिकाऱ्यांना पश्चिम बंगालमधून दिल्लीत प्रतिनियुक्तीवर बोलावण्यात आले आहे. नड्डा यांच्या सुरक्षा व्यवस्थेतील बेजबाबदारपणामुळे गृह मंत्रालयाने ही कारवाई केली.
गृह मंत्रालयाने केलेल्या कारवाईवर तृणमूल काँग्रेसने चिडून प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. गृहमंत्रालय पश्चिम बंगालच्या आयएएस आणि आयपीएस अधिकाऱ्यांमध्ये दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करतेय. अधिकाऱ्यांना प्रतिनियुक्तीवर दिल्लीत बोलवून घेऊन गृह मंत्रालयाने त्यांच्यावर दबाव आणण्याचाच प्रकार आहे. अशा दबावातून केंद्र सरकार राज्यात आणीबाणीसारखी परिस्थिती निर्माण करत आहे, असा आरोप टीएमसी खासदार कल्याण बॅनर्जी यांनी केला.
राज्याच्या पोलिसांनी याप्रकरणी आतापर्यंत तीन एफआयआरची नोंद करून सात जणांना अटक केली आहे. दुसरीकडे भाजपाचे पश्चिम बंगालचे प्रभारी कैलाश विजवर्गीय यांनी ममता बॅनर्जींवर निशाणा साधला आहे.
सोशल मीडियावर त्यांनी या संदर्भात केलेल्या एका पोस्टमध्ये त्यांनी म्हटले आहे की, पश्चिम बंगालमध्ये भाजपा नेत्यांवर विटा फेकल्या. राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्यावरही हल्ल्याचा कट रचला गेला. मात्र भाजपाचे स्वतःचे धोरण आहे. आम्ही आमची सहिष्णुता सोडत नाही. आम्ही दगडाचे उत्तर फुलांनी देऊ. आमचे कमळ राज्याला नवी ओळख देऊ.