विशेष प्रतिनिधी
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नवे चिन्ह तुतारीचे अनावरण शरद पवारांनी रायगडावर जाऊन केले. तिथे त्यांच्यासह राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी तुतारी बरोबर फोटोसेशन केले. मात्र, पवार आपल्या राजकीय कारकीर्दीत तब्बल 40 वर्षांनी रायगडावर गेले म्हणून ते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या निशाण्यावर आले.After 40 years, Pawar now remembers Raigad!!; Fadnavis + Raj Thackeray target
शरद पवारांनी निवडणूक आयोगाकडे निवडणूक चिन्हाचे जे तीन पर्याय दिले होते, त्यामध्ये तुतारी चिन्हाचा पर्यायच दिला नव्हता. पण निवडणूक आयोगाने त्यांच्या पक्षाला “तुतारी वाजवणारा माणूस” हे चिन्ह दिले. त्यामुळे पक्षात उत्साह संचारला आणि पक्षाने रायगडावर तुतारी निवडणूक चिन्हाच्या अनावरणाचा कार्यक्रम घेतला. पवार या कार्यक्रमांमध्ये डोलीत बसून पोहोचले. पवार गेल्या 40 वर्षांमध्ये रायगडावर गेलेच नव्हते. ते स्व पक्षाच्या निवडणूक चिन्हाच्या निमित्ताने रायगडावर पोहोचले म्हणून देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांनी वेगवेगळ्या ठिकाणी त्यांच्यावर शरसंधान साधले.
शरद पवार 40 वर्षांनंतर रायगडावर गेले, याचे क्रेडिट अजितदादांना दिले पाहिजे. कारण पवारांना अजितदादा निघून जाईपर्यंत रायगड आठवला नव्हता. तो आत्ता आठवला, असे टीकास्त्र फडणवीस यांनी सोडले. अशाच आशयाचे टीकास्त्र राज ठाकरे यांनी ठाण्यातून सोडले.
भाजपने देखील आपल्या ट्विटर हँडलवर पवारांवर पुढील शब्दांमध्ये शरसंधान साधले :
आता निवडणुका जवळ आल्याने आणि बहुतांश सहकारी अजितदादांसोबत गेल्याने श्री @PawarSpeaks यांना रायगडाची आठवण आली आहे. सहानुभूती निर्माण करून मते मिळवण्याकरता या वयात शरद पवार यांना असे उद्योग करावे लागत आहेत. ४० वर्षांत शरद पवार यांना कधीही रायगडाची आठवण झाली नाही. कधीही दुर्ग संवर्धनासाठी शरद पवार यांनी प्रयत्न केले नाहीत. आजपर्यंत त्यांचे आयुष्य दुसऱ्यांचे घर फोडण्यात गेले आहे. त्यामुळे आजपर्यंत शरद पवारांना रायगडावर यायला वेळ नव्हता.