GST : जीएसटी कपातीचा पूर्ण फायदा मिळावा यासाठी सरकारची काटेकोरपणे देखरेख
जीएसटी दरांतील कपातीचा सामान्य माणसाला तत्काळ फायदा मिळणार नाही अशी भीती व्यक्त केली जात असताना केंद्राने स्पष्ट केले की, ग्राहकांना सवलतीचा पूर्ण फायदा मिळेल याची सरकार खातरजमा करेल. शुक्रवारी दोन केंद्रीय मंत्र्यांनी या संदर्भात सरकारची भूमिका मांडली. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, उद्योगांनी करातील संपूर्ण कपात वस्तूंच्या किमतींमध्ये स्पष्टपणे दिसून येईल असे आश्वासन दिले आहे. ते म्हणाले की, केंद्राप्रमाणेच राज्यांनाही दुकानदार आणि कंपन्यांनी करातील कपातीचा पूर्ण फायदा सामान्य ग्राहकांना द्यावा याची खातरजमा करावी लागेल.