उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणूकीचे पडघम वाजू लागल्याबरोबर सर्व पक्षांनी आपापले रंग दाखवायला सुरूवात केली आहे. पण यातले दोन महत्त्वाचे जुने खेळाडू अजून थंड बसलेत. तिसऱ्या खेळाडूला तर या सामन्याशी काही देणे – घेणच नाही, अशी स्थिती आहे. तुलनेने दोन नव्या दमाचे खेळाडूंचा मात्र उत्साह मात्र वाहायला लागला आहे. up Elections, yogi – mamata enthusiastic; akhilesh – mayawati yet remain cool; rahul out!!
उत्तर प्रदेश निवडणूकीचे पडघम वाजू लागल्याबरोबर वेगवेगळ्या राजकीय पक्षांनी आपापले रंग दाखवायला सुरूवात केली आहे. राज्यात भाजप सत्ताधारी असल्याने त्याला घेरण्यासाठी सगळे पक्ष एकत्र येऊन काही ठोस पर्याय देण्याची शक्यता कमी असताना सगळ्यांनी आव मात्र भाजपला चारीमुंड्या चीत करण्याचाच आणला आहे.
यामध्ये ममता बॅनर्जींच्या रूपाने नव्या दमाच्या खेळाडूची एंट्री झाली आहे . नव्या या अर्थाने की अखिलेश यादव आणि मायावती हे जुने खेळाडू आहेत. त्यांची एक एक इनिंग खेळून झाली आहे. योगींचीही एक इनिंग संपत आली आहे. पण ममता बॅनर्जी या मात्र त्यांच्यात सगळ्यात ताज्या दमाच्या खेळाडू ठरल्या आहेत.
अर्थात त्यांनी स्वतःच्या तोंडाने तशी काही महत्त्वाकांक्षा जाहीररित्या बोलून दाखविलेली नाही. पण त्यांच्या राजकीय हालचाली त्याच दिशेने सुरू असल्याचे बोलले जाते आहे. पश्चिम बंगाल थंपिंग मेजॉरिटीने जिंकल्यानंतर ममतांनी स्वतःला राष्ट्रीय पातळीवरील नेतृत्वस्थानी प्रस्थापित करण्याचा चंग बांधलेला दिसतो. कारण खरोखर मोदींना तगडे आव्हान देणाऱ्या नेतृत्वाचा राष्ट्रीय पातळीवर अभावच आहे. अशा स्थितीत ममतांनी स्वतःला मोदींचे पर्यायी नेतृत्व समजणे आणि प्रस्थापित करणे यात गैर काहीच नाही.
या प्रयत्नांचा एक भाग म्हणून त्यांनी शेतकरी नेते राकेश टिकैत यांच्याशी संधान साधले आहे. मायावतींचे एकेकाळचे विश्वासू रणनीतीकार आणि दलित – ब्राह्मण समीकरणातले ब्राह्मण नेते सतीशचंद्र मिश्रा हे ममतांच्या गळाला लागल्याची जोरदार चर्चा उत्तर प्रदेशात रंगली आहे.
ममता आपल्या तृणमूळ काँग्रेस पक्षाला नवे राष्ट्रीय नाव देऊन राष्ट्रीय मैदानात उतरण्याची शक्यता देखील बोलून दाखविली जात आहे. अर्थात एरवी वाचाळ वीरांगना म्हणून प्रसिध्द असलेल्या ममतांनी स्वतःहून यातले काहीच बोलून दाखविलेले नाही. म्हणूनच त्यांच्या राजकीय हालचालींमध्ये गांभीर्य असल्याचे जाणवते आहे.
राजकारणात कोणीही कोणतीही महत्त्वाकांक्षा बोलून दाखविणे, म्हणजे हात दाखवून अवलक्षण करणे मानले जाते. याचा अनुभव महाराष्ट्र लिमिटेड चाणक्यांनी दिल्लीत घेतला आहे. म्हणून ममता स्वतः काहीच आपल्या महत्त्वाकांक्षेबाबत बोलत नाहीत. पण राकेश टिकैत आणि सतीशचंद्र मिश्रा यांच्या निमित्ताने राजकीय चाचपणी मात्र, नक्की करताना दिसतात.
इकडे भाजपमध्ये संघ – भाजप स्टाइलने बैठकांचा धडाका सुरू आहे. योगी मंत्रिमंडळातील बदलापासून ते योगींनाच बदलण्यात येईल, असे हवेत मीडियाने पतंग उडवून झाले आहेत. त्यातच #ModiVsYogi ट्रेंड चालवून यूपीतल्या राजकारणाला फोडणी देण्याचा नवा फंडा विरोधकांनी काढला आहे. त्यामध्ये मीडियाचा विशिष्ट वर्गही सामील झाला.
पण भाजपला यामुळे काहीच फरक पडणार नाही. त्यांची त्यांच्या पध्दतीने वाटचाल सुरू आहे. आजच जितीन प्रसाद यांना गळाला लावून भाजपने काँग्रेसला धक्का दिलेला आहे. आणखी धक्के वेळोवेळी देण्याची व्यवस्था करण्यात येईल, असे भाजपच्या वरिष्ठ गोटातून सांगण्यातही आले आहे. त्यामुळे मीडिया कितीही #ModiVsYogi हा ट्रेंड चालवत राहिला तरी भाजप आपल्या इतर पक्ष फोडण्याच्या अजेंड्यावरून ढासळण्याची शक्यता नाही.
ममता आणि भाजप असे निवडणूकीच्या तयारीला लागले असताना अखिलेश यादव आणि मायावती मात्र अजून थंड आहेत. काँग्रेसची मात्र मरगळ जाता जायला तयार नाही. मधूनच तेवढी सोनियांचे जावई आणि प्रियांका गांधींचे पती रॉबर्ट वड्रा हे योग्य वेळ येताच राजकारणात एंट्री घेणार असल्याच्या बातम्या येत आहेत.
पण काँग्रेस मात्र सध्या पंजाबमधला पक्षातला राजकीय वणवा आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करते आहे. काँग्रेसचे बरेचसे केंद्रीय नेते त्यासाठी कामाला लागले आहेत. कारण वणवा मोठा आहे. काँग्रेसच्या २० – २५ आमदारांचा गट नाराज आहे. हा गट पंजाब काँग्रेसमध्ये उभी फूट पाडण्याची ताकद राखून आहे. मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांच्या विरोधात त्यांची मोर्चेबांधणी आहे. काँग्रेसश्रेष्ठींनी निकाल कोणत्याही बाजूने दिला तरी फूट अटळ आहे आणि त्याचा फायदा भाजपला होण्याचीच शक्यता आहे.
अशा स्थितीत काँग्रेसचे अतिवरिष्ठ नेतृत्व मात्र शेतकरी आंदोलनाच्या ५०० व्या दिवशी त्यांना शुभेच्छा देणारे ट्विट करून गप्प बसले आहे…!!
up Elections, yogi – mamata enthusiastic; akhilesh – mayawati yet remain cool; rahul out!!
महत्त्वाच्या बातम्या
- पन्नास दिवसांत 53 हजार कोरोना रुग्ण बरे; पुण्यात रुग्णांच्या संख्येमध्ये विक्रमी घट
- दिल्लीतल्या सत्तेचा सारीपाट उलगडून दाखविणारा दूवा निखळला; नरसिंह रावांचे विश्वासू सचिव राम खांडेकर यांचे निधन
- Accident! उत्तर प्रदेशमध्ये बस आणि रिक्षाचा भीषण अपघात ;१७ जणांचा मृत्यू ; मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांची तत्काळ मदत जाहीर
- Corona Vaccination : घराजवळ नक्कीच लसीकरण करू ; केंद्र सरकारचे मुंबई उच्च न्यायालयात स्पष्टीकरण