नॅशनल हेराल्डप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) अधिकाऱ्यांच्या प्रश्नांना तोंड देत असलेले काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांना विरोधकांचा पाठिंबा मिळाला नसल्याचे दिसून आले. सोमवारी राहुल यांची चौकशी सुरू असताना त्यांची भगिनी आणि पक्षाच्या सरचिटणीस प्रियांका गांधी त्यांच्या काँग्रेस नेत्यांची विचारपूस करण्यासाठी पोलीस ठाणे गाठले होते. दुपारी दोन वाजेपर्यंत देशातील डझनभर पक्षांच्या प्रमुख नेत्यांनीही राहुल यांच्या समर्थनार्थ ट्विट करणे टाळले होते.The Focus Explainer National Herald case Congress prince Rahul Gandhi lonely
यावरून काँग्रेस पक्ष सोडला तर राहुल एकटे पडल्याचे दिसून आले. राहुल गांधी ईडी कार्यालयात पोहोचण्यापूर्वी पक्षाचे सरचिटणीस रणदीप सुरजेवाला यांनी पत्रकार परिषदेत मोदी सरकारविरोधात टीका केली होती. राहुल यांची चौकशी सुरू होताच काँग्रेस पक्ष एकाकी पडल्याचे दिसले.
अखिलेश यांना दिली होती साथ
2019 मध्ये जेव्हा कथित खाण घोटाळ्यात सपा प्रमुख अखिलेश यादव यांचे नाव आले, तेव्हा काँग्रेस पक्षाच्या अनेक नेत्यांनी त्यांच्या समर्थनार्थ वक्तव्ये जारी केली होती. याप्रकरणी विरोधी पक्षांनी सीबीआयवर ताशेरे ओढले होते. अखिलेश यांनी स्वत: ट्विट करून लिहिले की, ‘या बातमीत माझा उल्लेख का करण्यात आला आहे, हे जगाला माहीत आहे की यात वाईट हेतू आहे.’
बसपाचे सतीश मिश्रा म्हणाले, केंद्र सरकार सीबीआयला उद्ध्वस्त करत आहे. हमीरपूरमध्ये घडलेल्या प्रकाराला मुख्यमंत्री कसे जबाबदार असू शकतात. सरकार सीबीआयचा पोपटासारखा वापर करत आहे. काँग्रेसनेही या मुद्द्यावर अखिलेश यादव यांच्यासोबत उभे राहण्याची घोषणा केली होती. काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद त्यावेळी म्हणाले होते की, नरेंद्र मोदी सरकार सीबीआयसारख्या संस्थांच्या माध्यमातून राजकीय पक्षांवर दबाव टाकण्याचे काम करते. पश्चिम बंगालमध्ये सीबीआयच्या टीमला ओलिस धरले असतानाही देशातील प्रमुख विरोधी पक्षांनी केंद्र सरकारवरच टीका केली होती.
विरोधी पक्षाच्या कोणत्याही नेत्याचे ट्विट नाही
राहुल गांधींच्या चौकशीदरम्यान सपा प्रमुख अखिलेश यादव यांचे एकही ट्विट समोर आले नाही. त्यांच्या पक्षानेही या प्रकरणावर भाष्य करण्याचे टाळले. बसपा प्रमुख मायावती याही दुपारपर्यंत या विषयावर काहीही बोलल्या नाहीत. सोमवारी शिवसेनेकडून अधिकृत वक्तव्य आले नाही. आरजेडी नेते आणि माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांचा मुलगा तेजस्वी यादव यांनीही राहुल गांधींबद्दल ट्विट केले नाही. TMC प्रमुख आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही राहुल यांच्या समर्थनार्थ ट्विट केले नाही. शिरोमणी अकाली दलाचे नेते सुखबीर बादल यांनीही याप्रकरणी मौन बाळगले आहे. राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत विरोधी ऐक्यासाठी प्रयत्नशील असलेले राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनीही राहुल गांधींच्या समर्थनार्थ भाष्य केले नाही. केरळच्या मुख्यमंत्र्यांची कुठेच प्रतिक्रिया दिसली नाही.
तेलंगणात टीआरएसकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. डीएमके नेते आणि तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी ईडी आणि राहुल यांच्या हजेरीबद्दल ट्विट केले नाही. जेडीयूचे नेते आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनाही याप्रकरणी मौन बाळगणेच बरे वाटले. शरद यादव यांच्या ट्विटरवरही राहुल यांचे समर्थन दिसून आले नाही. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वायएस जगन मोहन रेड्डी यांनीही राहुल गांधी किंवा काँग्रेसबद्दल ट्विट केले नाही. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, ज्यांचे मंत्री सत्येंद्र जैन ईडीच्या ताब्यात आहेत, त्यांनीही राहुल गांधींबद्दल ट्विट केले नाही.
भाजपचा मार्ग सुकर
राहुल गांधी यांची ईडीकडून चौकशी केली जात असून विरोधी पक्ष गप्प आहेत, यात आश्चर्यकारक काहीही नसल्याचे राजकीय जाणकारांचे म्हणणे आहे. काँग्रेसने आजवर विरोधकांना एकत्र करण्यासाठी काहीही केलेले नाही. त्यांच्याच संघटनेत फूट पडली आहे. सोनिया गांधी, राहुल गांधी की प्रियंका गांधी, कार्यकर्त्यांनी कोणाशी बोलावे? अशा स्थितीत विरोधी पक्ष काँग्रेसवर विश्वास कसा ठेवतील. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत विरोधक एकला चलोचा मार्ग शोधत राहण्याची शक्यता आहे.
राजकीय जाणकारांच्या मते, प्रभावी रणनीती आखण्यात काँग्रेस पक्ष मागे पडते. विरोधी पक्षांमध्ये ऐक्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत, मात्र काही काळानंतर ते वेगळे होण्याच्या मार्गावर आहेत. इतर विरोधी पक्षांना विश्वासात घेण्यात काँग्रेस पक्ष चुकतो. राहुल गांधींच्या चौकशीदरम्यान अनेक पक्षांच्या नेत्यांचे मौन भाजपला राष्ट्रपतिपदाच्याच नव्हे, तर 2024च्या लोकसभा निवडणुकीतही सोपे करत आहे.
The Focus Explainer National Herald case Congress prince Rahul Gandhi lonely
महत्वाच्या बातम्या
- नॅशनल हेराल्ड केस : “झुकेगा नही” म्हणणारा काँग्रेसचा “पुष्पा” पोलिसांना घाबरून पळाला!!
- ओबीसी एम्पिरिकल डाटा : फडणवीसांच्या शंकेला भुजबळ, वडेट्टीवार यांचा दुजोरा!!; प्रकरणाचे नेमके गंभीर्य काय??
- राऊतांना जोकर म्हणणार नाही, पण जोकरसारखी विधाने ते नेहमीच करतात; फडणवीसांचा टोला
- राष्ट्रपती निवडणूक : सर्व विरोधकांचे शरद पवारांच्या नावावर एकमताची बातमी; पण खुद्द पवारांचे मत गुलदस्त्यात!!