प्रेरणा कोणती आणि कोणाची असेल…??
विशेष प्रतिनिधी
मुंबई – ज्येष्ठ नेते शरद पवारांचा ८० वाढदिवस मराठी माध्यमे जोमात साजरा करत आहेत. मराठी चॅनेलचे विशेष कार्यक्रम, मराठी वृत्तपत्रांची विशेष पाने पवारांच्या वाढदिवसाने सजली आहेत. याचे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये पवारांची स्वाभाविक स्तुती तर त्याचवेळी काँग्रेस नेतृत्वावर टीकेचे बोट ठेवले गेले आहे. sharad pawar birthday news
महाराष्ट्र टाइम्सने काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उल्हासदादा पवारांचा शरद पवारांना काँग्रेसमध्ये या आणि नेतृत्व करा, असा लेख प्रसिध्द केला आहे. त्यात उल्हासदादांनी शरद पवारांचा उज्ज्वल राजकीय प्रवास उलगडून दाखविला आहेच त्याच बरोबरीने आपण काँग्रेसमध्ये परत यावे आणि नेतृत्व करावे, असे कळकळीचे आवाहनही केले आहे. या ज्येष्ठ नेते असलेल्या उल्हासदादांच्या आवाहनाला शरद पवार कसा प्रतिसाद देतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.
यूपीए चेअरमनपदी सोनियांच्या जागी शरद पवार?; पंतप्रधानपदाच्या आशा पुन्हा पल्लवित
सामनातून पवारांच्या उज्ज्वल राजकीय कारकिर्दीचा विशेष गुणगौरव करण्यात आला आहे. पवारांची राजकीय झेप दिल्लीपर्यंत कशी गेली याचे सामनाकारांनी यथार्थ आणि अतिशय समर्पक वर्णन केले आहे. पण त्याचवेळी सामनाकारांनी काँग्रेस नेतृत्वावर तडाखेबंद टीकेची झोड उठवली आहे. पवारांचे तेज, राजकीय वेग दिल्लीला झेपला नाही. म्हणून त्यांना काँग्रेस नेतृत्वाने कधी मोठ्या नेतृत्वाची संधी दिली नाही, अशी टीका सामनात करण्यात आली आहे.
१९९९ मध्ये वाजपेयी सरकार १ मताने पडले ते पवारांच्या राजकीय मुत्सद्देगिरीतून. त्यावेळी सोनिया गांधी यांनी पवारांना विश्वासात न घेता सरकार स्थापनेचा दावा केला म्हणून त्यांना अपयश आले असा दावाही सामनात करण्यात आला आहे. पण या दाव्याची तथ्यता नजीकच्या इतिहासात जाऊन तपासली पाहिजे.
sharad pawar birthday news
त्याचवेळी पवारांच्या वाढदिवशी एबीपी माझा वाहिनीने माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या प्रेसिडेन्शियल इयर्स या जानेवारीत प्रसिद्ध होणाऱ्या पुस्तकाचा हवाला देऊन सोनिया गांधी आणि डॉ. मनमोहन सिंग यांच्यामुळे २०१४ मध्ये काँग्रेसचा पराभव झाल्याची बातमी दाखवली आहे आणि वेबसाइटवर प्रसिद्ध केली आहे. पवारांच्या वाढदिवसाचे राजकीय औचित्य ही बातमी प्रसिद्ध करताना दाखविण्यात आले आहे.
एकीकडे पवारांच्या राजकीय कारकिर्दीची स्तुती तर त्याचवेळी काँग्रेस नेतृत्त्वाच्या उणीवांवर टीकेचे बोट अशी औचित्यपूर्ण राजकीय मुत्सद्देगिरी मराठी माध्यमांनी दाखविली आहे. या मागे प्रेरणा कोणती आणि कोणाची असेल…??