पक्ष नेतृत्वाच्या कार्यपद्धतीवर टीका करणारे पत्र २३ बंडखोर काँग्रेस नेत्यांनी सोनिया गांधी यांना ऑगस्टमध्ये पाठवले होते. त्यानंतर पहिल्यांदाच सोनिया यांनी १० जनपथ या निवासस्थानी ज्येष्ठ नेत्यांची बैठक घेतली.
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : कॉंग्रेस नेतृत्वावर लेटरबॉंब टाकणाऱ्या २३ ज्येष्ठ नेत्यांनी आपली मागणी कायम ठेवली आहे. पक्षांतर्गत निवडणुकीच्या मुद्यांवर हे नेते ठाम आहेत. केवळ काँग्रेस अध्यक्षच नव्हे तर, कार्यकारी समिती आणि संसदीय मंडळाच्या सदस्यांच्या नियुक्तीसाठीही निवडणुका झाल्या पाहिजेत, अशी मागणी या नेत्यांनी केली आहे. त्यामुळे कॉंग्रेसमधील मतभेद कायम असल्याचे स्पष्ट झाले आहे.
Rebel Congress leaders call for elections
पक्ष नेतृत्वाच्या कार्यपद्धतीवर टीका करणारे पत्र २३ बंडखोर काँग्रेस नेत्यांनी सोनिया गांधी यांना ऑगस्टमध्ये पाठवले होते. त्यानंतर पहिल्यांदाच सोनिया यांनी १० जनपथ या निवासस्थानी ज्येष्ठ नेत्यांची बैठक घेतली. माजी पक्षाध्यक्ष राहुल गांधी आणि महासचिव प्रियंका गांधी-वढेरा याही उपस्थित होत्या.
पक्षाध्यक्षपदाच्या निवडणुकीची प्रक्रिया निवडणूक समितीने सुरू केली असली, तरी पक्षातील सर्वोच्च निर्णय समिती असलेली कार्यकारी समिती आणि संसदीय मंडळाच्या निवडणुकीबाबत पक्षनेतृत्वाने निर्णय घेतलेला नाही. पक्षाच्या या दोन निर्णय समित्यांवर कार्यकर्त्यांनी निवडून दिलेले सदस्य नियुक्त झाले, तर पक्ष संघटना मजबूत होईल असा मुद्दा बंडखोर नेत्यांनी मांडला.
बंडखोर नेत्यांच्या पत्रात पी. चिदंबरम यांचा समावेश नसला तरी त्यांनी बंडखोर नेत्यांना पाठिंबा दिला आहे. दिल्लीतील अखिल भारतीय काँग्रेस समितीचे मुख्यालय पूर्ण वेळ कार्यरत राहिले पाहिजे, आत्ता तेथे कोणीही नसते, असा मुद्दा चिदंबरम यांनी बैठकीत मांडला. त्यांचा रोख राहुल गांधी यांच्यावर होता. पूर्णवेळ उपलब्ध असणारा पक्षाध्यक्ष निवडण्याची मागणी बंडखोर नेत्यांनी पत्राद्वारे केली होती. त्याचा चिदंबरम यांनी पुनरुच्चार करत काँग्रेसमध्ये महासचिव संस्कृती बळावली असल्याने पक्षाचे नुकसान होत असून बूथ स्तरावर पक्ष मजबूत केला पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.
Rebel Congress leaders call for elections
गुलाम नबी आझाद, आनंद शर्मा, शशी थरूर, पृथ्वीराज चव्हाण, भूपेंद्र सिंह हुडा, मनीष तिवारी आदी बंडखोर नेते तसेच, ए. के. अॅन्टनी, अंबिका सोनी, अशोक गेहलोत, कमलनाथ, हरीश रावत, पवन बन्सल, अजय माकन आदी यावेळी उपस्थित होते. मात्र, राहुल गांधी यांच्या निकटचे मानले जाणारे रणदीप सुरजेवाला, के. सी. वेणुगोपाल गैरहजर होते. बैठकीला उपस्थित १९ नेत्यांनी मांडलेल्या मुद्यांवर चर्चा करण्यात आली.