- मोदी, आबे आणि मॉरिसन अमेरिकेच्या चीन विरोधी आघाडीतील अग्रेसर
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह जपानचे शिंजो आबे आणि ऑस्ट्रेलियन पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनाही लीजन ऑफ मेरिट या पुरस्काराने सन्मानित केले आहे. अर्थात जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांनी राजीनामा दिल्यानंतर त्यांना हा सन्मान देण्यात आला आहे. अर्थात आबेंचे वारसदार त्यांच्या सारखेच राजकारण निपूण आहेत. modi shinzo abe and scott morrison
- पण मूळात पुरस्कार देण्याचे औचित्य टायमिंगच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. अमेरिकेचा राज्यकर्ता कोणतेही आंतरराष्ट्रीय राजनैतिक कृत्य जाता जाता करत नाही. त्या राज्यकर्त्याचा स्वभाव आणि प्रतिमा कितीही विचित्र असला तरीही. कारण अमेरिकन व्यवस्थेत त्याला स्थानच नाही. उलट काही तरी निश्चित स्वरूपाचे धोरण आखल्याशिवाय अशी कृती होत नाही.
- आत्ताच भारत – जपान आणि ऑस्ट्रेलिया यांच्या पंतप्रधानांना सन्मान देण्यामागे अमेरिकेची चीन विरोधी निश्चित धारणा आणि धोरण आहे. हे तीनही देश चीन विरोधातील अमेरिकेच्या व्यापक धोरणात महत्त्वाचे भागीदार आहेत. भारत आणि जपान तर सर्वांत मोठे भागीदार आहेत. ऑस्ट्रेलिया हिंदी महासागर आणि प्रशांत महासागराच्या अशा जिओपोलिटिकल लोकेशनला वसलेला देश आहे, की चीनला या दोन्ही महासागरांमध्ये रोखण्यात त्या देशाची भूमिकाही महत्त्वाची आहे.
- अशा स्थितीत दीर्घकालीन अमेरिका या तीनही शक्तिशाली देशांशी रणनीती धोरणात्मक मैत्री दीर्घकाळ राखणार हे उघड आहे. आज दिलेले लिजन ऑफ ऑनर हे सन्मान त्याचेच एक प्रतिक आहे. आणि या तीनही देशांच्या पंतप्रधानांना याची पुरेपूर जाणीव आहे.
- अमेरिकेत ट्रम्प प्रशासन जाऊन बायडेन प्रशासन येणार असले तरी चीन विरोधी मूळ धारणेत आणि धोरणात परिवर्तन होण्याची शक्यता नाही. तसेच भविष्यात भारतासह या तीनही देशांमध्ये सत्तांतरे झाली तरी त्यांच्याही चीनविषयक धोरणात बदल होण्याची संभावना नाही कारण चीन तसे होऊ देणार नाही. कारण चीन या तीनही देशांना आपल्या पेक्षा कमी लेखतो आहे. ही या देशांना मान्य होणारी बाब नाही.
- मोदींबरोबरच आबे यांनाही स्वतंत्र आणि मुक्त इंडो-पॅसिफिक धोरणांसाठी हा पुरस्कार देण्यात आला तर मॉरिसन यांना जागतिक आव्हानांना तोंड देत सर्व देशांच्या सुरक्षेला प्राधान्य देण्यासाठी या पुरस्काराने सन्मानित करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. यातच या पुरस्काराचे टायमिंग आणि निवडीचे इंगित दडले आहे.