वृत्तसंस्था
वॉशिंग्टन – भारताचे परराष्ट्र धोरण हा काही राजकारण खेळण्याचा विषय नाही. तो अधिक गंभीर विषय आहे. इतर लोकांनी तो समजून घेतला पाहिजे, अशा परखड शब्दांमध्ये परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी आज राहुल गांधींना सुनावले. EAM Jaishankar speaks on Rahul Gandhi’s tweet on vaccine diplomacy
वॉशिंग्टनमध्ये अमेरिकन परराष्ट्रमंत्री, अधिकारी यांच्याशी व्यापक चर्चा केल्यानंतर ते भारतीय दूतावासात ते पत्रकारांशी बोलत होते. कोविड प्रतिबंधक लसीसंदर्भातील प्रश्नांना जयशंकर यांनी सविस्तर उत्तरे दिली.
भारताला कोविड प्रतिबंधक लस देण्याचे अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन यांनी आधीच सांगितले आहे. त्या भूमिकेत बदल झालेला नाही. लस उत्पादनासाठी लागणारा कच्चा माल पुरविण्याबाबत भारत आणि अमेरिका यांच्यात सविस्तर वाटाघाटी सुरू आहेत. त्यातून भारताला सकारात्मक प्रतिसाद मिळेल, असा विश्वास जयशंकर यांनी व्यक्त केला. क्वाड देशांशी देखील याच विषयासंदर्भात वाटाघाटी सुरू आहेत. सर्व देशांशी असलेल्या सप्लाय चेन अधिक मजबूत करण्यावर चर्चा होत आहेत. त्या लवकर पूर्ण होऊन भारताला कोविड प्रतिबंधक लसीच्या कच्च्या मालाचा पुरवठा लवकर सुरू होईल, अशी अपेक्षा जयशंकर यांनी व्यक्त केली.
राजनैतिक पातळीवर भारताचे सर्व दूतावास कार्यरत आहेत. प्रत्येक देशाशी तातडीचे संपर्क साधण्यात ते कुठेच कमी पडत नाहीत. मी स्वतः, भारताचे रसायनमंत्री प्रत्येक देशाच्या मंत्र्यांच्या, प्रमुखांच्या, समकक्ष अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहोत. परराष्ट्र धोरण हा राजकारण खेळण्याचा विषय नाही. तो गंभीर विषय आहे. हे प्रत्येकाने समजून घेतले पाहिजे, असे जयशंकर यांनी स्पष्ट केले.
भारताची कोविड डिप्लोमसी फसले असल्याचे ट्विट काँग्रेसचे खासदार राहुल गांधींनी केले होते. त्यावर प्रश्न विचारला असता जयशंकर यांनी वरील उत्तर दिले.