राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये राजकीय घमासनाच्या पार्श्वभूमीवर नागालँड मधून जी बातमी आली आहे, त्यामुळे शीर्षकात विचारलेला प्रश्न उपस्थित झाला आहे. नागालँड मधले 7 आमदार आता शरद पवारांना सोडून अजितदादांकडे निघून गेले आहेत. शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे “राष्ट्रीय स्वरूप” टिकवण्यासाठी नागालँडच्या 7 आमदारांचा जो वापर केला होता, तो आता फोल ठरला आहे. पण यानिमित्ताने पवारांचा राष्ट्रीय पातळीवरचा विरोधकांमधला देखील घटलेला प्रभाव या निमित्ताने समोर आला आहे. Why sharad pawar reluctant to hand over the NCP reins to supriya sule??, does he fear of her incompetence??
पण राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शरदनिष्ठ विरुद्ध अजितनिष्ठ एवढे सगळे महाभारत सुरू असताना देखील शरद पवार आजही अजित पवारांनी विरुद्धची लढाई स्वतःच्या अंगावर घेऊन का लढत आहेत?? त्यासाठी त्यांना 83 वर्षांचा योद्धा मैदानात हे नॅरेटिव्ह का तयार करावे लागत आहे?? शरद पवारांना एवढ्या सगळ्या मोठ्या राजकीय घडामोडींमध्ये 54 वर्षांच्या खासदार सुप्रिया सुळे यांना आघाडीवर आणून त्यांच्याकडे लढाईची सर्व सूत्रे सोपवाविशी का वाटत नाहीत??, हा मूलभूत प्रश्न आहे.
शरद पवार अतिशय कसलेले अनुभवी नेते आहेत. त्यांना इतरांनी कोणी राजकारण शिकवण्याची अजिबातच गरज नाही. पण तरी देखील शरद पवार स्वतःच अजित पवारांविरुद्धची लढाई आपल्या अंगावर घेऊन एक तर डबल गेम खेळतात किंवा डबल गेम खेळताना देखील सुप्रिया सुळे यांना आपल्या राजकीय कवचात सुरक्षित ठेवत आहेत.
पण असे तरी करायची वेळ पवारांवर का आली?? त्यांच्यासारख्या देशातल्या सर्वात जेष्ठ अनुभवी नेत्याला जानकी रामचंद्रन, एन. टी. रामराव, शशिकला यांच्या आठवणी मनात भीती उत्पन्न करते आहेत का?? त्यांना सुप्रिया सुळे यांची राजकीय अवस्था “जानकी रामचंद्रन”, “शशिकला” किंवा अखेरच्या काळातले “एन. टी. रामाराव” यांच्यासारखी होईल याची भीती वाटते आहे का??, हा त्यापलीकडचा पण अतिशय गंभीर प्रश्न आहे.
हा मुद्दा लिहिताना जानकी रामचंद्रन, शशिकला, एन. टी. रामाराव हीच नावे का आली??, काय आहे त्यांचा राजकीय इतिहास??, यावर थोडी नजर टाकली तर पवारांच्या मनातली खरी भीती काय असू शकते??, यावर प्रकाश पडेल.
जानकी रामचंद्रन
तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री एम. जी. रामचंद्रन यांचा जानकी रामचंद्रन या पत्नी. एम. जी. रामचंद्र यांचे निधन झाल्यानंतर त्या काही काळ तामिळनाडूच्या मुख्यमंत्री होत्या. रामचंद्रन यांच्या निधनानंतर जानकी रामचंद्रन यांनी त्यांच्या अण्णाद्रमुख पक्षावर असा काही ताबा मिळवला होता, की त्यानंतर काही दिवस का होईना, जयललिता यांना पक्षापासून दूर व्हावे लागले होते. किंबहुना जयललिता या एम. जी. रामचंद्रन यांच्या राजकीय वारस ठरूच नयेत यासाठी जानकी रामचंद्रन यांनी अक्षरशः आटापिटा केला होता. त्यासाठी त्यांनी आपल्या समर्थकांकरवी जयललिता यांना अपमानित करून रामचंद्रन यांच्या पार्थिवापासून देखील बाजूला केले होते. पण जानकी रामचंद्रन यांचे राजकीय हुकूमतीचे दिवस फारसे टिकले नाहीत किंबहुना त्या ते दिवस टिकवू शकल्या नाहीत.
जयललिता अधिक कर्तृत्ववान
जयललिता यांच्यापुढे त्या कर्तृत्वात उण्या पडल्या आणि प्रभावहीन होऊन गेल्या. जयललिता आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर पुढे आल्या आणि त्यांनी अण्णाद्रमुक पक्षावर कब्जा करून जानकी रामचंद्रन यांना “पॉलिटिकली नो व्हेअर” करून टाकले. शरद पवारांना देखील सुप्रिया सुळे यांच्या बाबत अशीच भीती वाटते आहे का??
शशिकलांचे उदाहरण
बरं अण्णाद्रमुक मध्ये घडलेले हे एकमेव उदाहरण नाही. जयललितांच्या निधनानंतर त्यांची मैत्रीण शशिकला यांनी अण्णाद्रमुक वर कब्जा मिळवण्याचा प्रयत्न केला. पण त्या त्यांच्या जुन्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणात एवढ्या अडकल्या, की पक्षावरचा संपूर्ण ताबा त्या त्यांनी गमावला आणि सध्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीत एनडीए मध्ये परतलेले तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री ईडापड्डी पलानीस्वामी यांनी अण्णाद्रमुक वर ताबा मिळवला. जयललितांचे ते कट्टर अनुयायी. त्यांनी जयललिता यांच्या निधनानंतर तामिळनाडूवर 4 वर्षे राज्य करून दाखवले.
मग शरद पवारांना सुप्रिया सुळे यांची “शशिकला” होण्याचा धोका वाटतोय का??
चंद्राबाबू नायडूंचे उदाहरण
आंध्र प्रदेशात देखील असेच उदाहरण घडले होते. एन. टी. रामाराव यांच्या अखेरच्या काळात त्यांचे जावई चंद्राबाबू नायडू यांनी तेलगू देशम पक्षावर पूर्ण कब्जा केला. रामाराव यांच्या मुलाने आणि कन्येने हा पक्ष ताब्यात ठेवण्याचा जरूर प्रयत्न केला होता. पण त्यांना ते जमले नाही. चंद्राबाबू नायडू यांनी रामराव यांच्या हयातीत आणि नंतर तेलगू देशम पक्षावर पूर्णपणे कब्जा मिळवून दाखवला आणि अखंड आंध्र प्रदेशावर 10 वर्षे राज्य करून दाखवले.
वर उल्लेख केलेला हा इतिहास फार जुना नाही. तो 1990 च्या दशकानंतरचा आहे. त्यातही शशिकला आणि ईडापड्डी पलानीस्वामी यांचा इतिहास तर 2014 नंतरचा आहे.
शरद पवार अतिशय अनुभवी नेते आहेत. आपली राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांच्या ऐवजी सुप्रिया सुळे यांच्या ताब्यात देण्यात देताना शरद त्या पवारांना तामिळनाडू आणि आंध्र प्रदेश या राज्यांमध्ये घडलेल्या वर उल्लेख केलेल्या घटना अस्वस्थ करत आहेत का??, हा नुसता गंभीर प्रश्न नाही, तर त्यात कळीचा मुद्दाही दडला आहे.
जैविक वारसांपेक्षा कर्तृत्ववान नेते
प्रादेशिक पक्षांच्या संस्थापक नेत्यांच्या जैविक वारसदारांपेक्षा अनुयायी असलेले राजकीय वारसदार जास्त प्रभावी ठरले याची ही ठळक उदाहरणे आहेत.
मग महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाबतीत अजितदादा हे शरद पवारांचे जैविक वारस नसले, तरी पवार घराण्याचे ते देखील वारस आहेत आणि ते अधिक कर्तृत्ववान आहेत याची जाणीव पवारांना झाली आहे का?? त्यामुळेच सुप्रिया सुळे यांना अजूनही “राजकीय कवचात” ठेवून स्वतः पवार अजितदादांच्या विरोधातली लढाई आपल्या अंगावर घेत आहेत का?? हा प्रश्न स्वरूपातला सर्वाधिक कळीचा मुद्दा आहे.
Why sharad pawar reluctant to hand over the NCP reins to supriya sule??, does he fear of her incompetence??
महत्वाच्या बातम्या
- कर्नाटक विधानसभेतून भाजपचे 10 आमदार निलंबित; भाजप आणि जेडीएसने अध्यक्षांविरोधात अविश्वास प्रस्ताव ठेवला
- द फोकस एक्सप्लेनर : 11 पक्षांचे 91 खासदार NDA आणि ‘I.N.D.I.A.’ दोन्हींपासून अंतर राखून, तेच किंगमेकर बनणार? वाचा सविस्तर
- ऑस्ट्रेलियन समुद्रकिनाऱ्यावर सापडलेली ‘त्या’ रहस्यमयी वस्तूबाबत ‘ISRO’ प्रमुख सोमनाथन यांचं मोठं विधान, म्हणाले…
- व्हिडिओ कांडात अडकलेल्या किरीट सोमय्यांच्या मदतीला आले जितेंद्र आव्हाड!!