नाशिक : तामिळनाडूच्या राजकारणात चक्रावणारी गणिते; द्रविडी चौकट मोडून नव्या कोऱ्या विजयच्या हातात दिली सगळी सूत्रे!!, हेच राजकीय चित्र तामिळनाडू विधानसभा निवडणुकीच्या आजच्या निकालानंतर समोर आले.
तामिळनाडूच्याच काय, पण देशाच्या राजकीय इतिहासात असा निवडणूक निकाल लागला नव्हता. साधारण वर्ष दोन वर्षापूर्वी एक पक्ष स्थापन होतो काय आणि त्या पक्षाला थेट सत्तेवर जाण्याएवढे यश मिळते काय, हे कधीच कुठल्या राज्यात घडले नव्हते. शिवाय ज्या व्यक्तीला कुठलीच राजकीय पार्श्वभूमी नाही, घराणेशाहीचा वारसाही नाही, त्या व्यक्तीच्या पक्षाला कुठल्याच राज्यात एवढे यश मिळाले नव्हते, तेवढे यश थलपती विजय या अभिनेत्याच्या तमिळगा वेत्री कळघम पक्षाला मिळाले. ते तमिळ राजकारणाच्या आणि किंबहुना देशाच्या राजकारणाच्या सगळ्या ठोकताळ्यांच्या पलीकडचे निघाले. कारण राजकीय परिभाषेमध्ये किंवा निवडणुकीच्या सर्व ठोकताळ्यांमध्ये बसणारे हे यशच नाही. ते त्या सगळ्या पलीकडचे यश आहे. म्हणूनच कुणाला विजयच्या यशाचा नेमका अंदाज आला नाही आणि यश मिळाल्यानंतर त्याचे नेमके विश्लेषण करता आले नाही.
– सुपरस्टार भोवतीचे राजकारण
तामिळनाडूचे राजकारण कायमच सिनेमा भोवती फिरत राहिले. पण सिनेमा सुपरस्टार गिरी गाजवलेल्या प्रत्येक अभिनेत्याला किंवा अभिनेत्रीला तामिळनाडूच्या जनतेने राजकीय यश दिले, असे बिलकुल घडले नाही. करुणानिधी, एम. जी. रामचंद्रन आणि जयललिता हे तीनच सुपरस्टार तामिळनाडू वर राज्य करू शकले. विजयकांत, रजनीकांत, कमल हसन हे सुपरस्टार तामिळनाडूच्या राजकारणात पुरते अपयशी ठरले. वैको हे सुद्धा तामिळ राजकारणामध्ये पुरता पायरोवा करू शकले नाहीत.
– रामचंद्रन यांच्याशी तुलना
या पार्श्वभूमीवर थलपती विजय याचे यश थोडेसे एम. जी. रामचंद्रन यांना 1986 मिळालेल्या राजकीय यशासारखे ठरले. एम. जी. रामचंद्रन यांनी द्रविड मुन्नेत्र कळघम या पक्षापासून फारकत घेऊन स्वतःचा अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघम हा पक्ष काढला. त्यामध्ये जयललिता यांना सामील करून घेतले. 1986 मध्ये त्यांनी राजीव गांधींशी हातमिळवणी केली. त्यांनी करुणानिधी यांच्या नेतृत्वाखालच्या द्रविड मुन्नेत्र कळघमचा पराभव करून दाखविला. तो ऐतिहासिक विजय होता. एम. जी. रामचंद्रन यांनी तामिळनाडूच्या राजकारणात क्रांती केल्याचे त्यावेळी बोलले गेले.
पण काहीही झाले तरी एम.जी. रामचंद्रन हे आजच्या थलपती विजय एवढे राजकारणात नवखे नक्कीच नव्हते. रामचंद्रन यांना द्रविडी राजकारणाचा वारसा होता. सी. एन. अण्णादुराई यांच्या नेतृत्वाखाली करुणानिधी आणि रामचंद्रन यांनी राजकारणाचे आणि समाजकारणाचे धडे गिरवले होते. स्वतःचा स्वतंत्र पक्ष काढून विजय मिळविण्याआधी एम. जी. रामचंद्रन यांनी तामिळनाडूच्या राजकारणामध्ये विशिष्ट स्थान मिळविले होतेच, फक्त त्याचे रूपांतर विजया मध्ये नंतर झाले. रामचंद्रन यांनी त्यावेळच्या तरुणांवर आणि महिलांवर प्रचंड गारुड केले. त्यांना आपल्याकडे आकर्षित केले. पण द्रविडी राजकारणाच्या चौकटीत राहूनच त्यांनी द्रविड मुन्नेत्र कळघमचा पराभव करून दाखविला. रामचंद्रन यांनी द्रविडी राजकारणाची चौकट मोडली नाही.
– नवख्या विजयच्या हातात सूत्रे
एम. जी. रामचंद्रन यांच्या तुलनेत थलपती विजय हा राजकारणामध्ये फारच नवखा निघाला. विजय हा द्रविडी राजकारणातल्या चौकटीत न बसणारा नेता निघाला. किंबहुना तो पारंपारिक राजकीय दृष्ट्या नेताच नव्हता. त्याच्याकडे द्रविडी राजकारणाचा कुठला वारसा नाही. त्याच्या घरातले कुणी राजकारणात नाही. त्यामुळे त्याने कुठल्या राजकीय वारशावर अवलंबून राहण्याचा प्रश्नच उद्भवला नाही. तरीसुद्धा त्याने एवढे मोठे यश मिळविले हेच आश्चर्यकारक घटीत घडून आले. त्यामुळेच अनेकांना आपल्याच पठडीत राहून विजयच्या यशाचे विश्लेषण करता आले नाही.
– महिला आणि युवकांच्या मनामध्ये शिरकाव
थलपती विजय याने म्हणे, महिला आणि युवकांच्या मनामध्ये शिरकाव केला. ज्यांनी करुणानिधी किंवा जयललिता यांचे राजकारण पाहिले नाही, किंवा त्यांच्या सुपरस्टार व्यक्तिमत्त्वाचा ज्यांना स्पर्श सुद्धा झाला नाही, अशा युवकांना विजयने आकर्षित केले. तो त्या युवकांच्या म्हणजेच सध्याच्या पिढीच्या युवकांची भाषा बोलला. या युवकांना द्रविडी राजकारणाची चौकट मानवणारी नाही. त्यांना द्रविडी राजकारण करायचे सुद्धा नाही. त्यामुळेच म्हणे, थलपती विजयचे जाहीर सभांमध्ये डायलॉग या युवकांच्या मनात घुसले. विजयने कुठली राजकीय आणि सामाजिक समीकरणे त्यांना सांगितली नाहीत. तो फक्त युवकांच्या भाषेत त्यांच्याशी बोलला म्हणून त्याला एवढे यश मिळाले, असे आत्ता तामिळनाडूतल्या काही लोकांचे म्हणणे आहे.
– द्रविडी राजकारण मोडले
याचा अर्थ विजय हा तामिळ राजकारणाचा द्विपक्षीय बाज मोडून पुढे आल्याचे स्पष्ट झाले. तमिळ राजकारणातील राजकीय टेनिस मॅच त्याने संपविली. त्यासाठी त्याला तमिळ महिला आणि युवकांची मदत झाली. त्यांनी एकगठ्ठा मतदान केल्यामुळे विजयला एवढे मोठे यश मिळाले, हे सगळे त्याच्या मोठ्या यशानंतर बोलले गेले. निवडणुकीच्या दरम्यान याची साधी भनक सुद्धा कुणाला लागली नाही. विजयच्या झंझावाताचा कुणालाही अंदाज आला नाही.
– नव्या प्रादेशिक नेत्याचा उदय
थलपती विजय याला नेमके यश कसे मिळाले??, ते कुणी दिले??, याचे आज अचूक विश्लेषण करता आले नाही, तरी एक मात्र निश्चित विजय याच्या रूपाने एक नवा प्रादेशिक नेता देशाच्या राजकारणामध्ये दमदारपणे उदयाला आला आहे. त्याने तामिळनाडूच्या राजकारणाची द्रविडी चौकट मोडून टाकली आहे. भाजपने त्या राज्यात सक्षम पर्याय उभा न केल्याने विजयच्या यशाला हातभार लावलाय. आता तो पुढे कसा वागेल??, तो तमिळनाडूत राज्य कसा करेल??, त्याचे केंद्र सरकारशी म्हणजेच मोदींशी संबंध कसे राहतील??, याचा आत्ता तरी कुणाला अंदाज आलेला नाही. त्याची राजकीय टीम सुद्धा कुणाला माहिती नाही. त्यामुळे त्याच्याविषयी सध्या बोलले जात असलेले सगळेच अधांतरी आहे. तामिळनाडूच्या जनतेने मोदी + शाहांना आणि सगळ्या निवडणूक पंडितांना चकवणारा निकाल देऊन टाकलाय!!
Thalapathi Vijay breaks Dravidian political bracket
महत्वाच्या बातम्या
- Israeli : इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; कॅथोलिक कॉन्व्हेंट उद्ध्वस्त, 7 जणांचा मृत्यू.
- नसरापूर अत्याचार प्रकरणाचा तपास स्पेशल इन्वेस्टीगेशन टीम कडे; फडणवीस सरकारचा निर्णय
- Iran war : इराण युद्धाला 2 महिने, जगात महागाई वाढली; ₹94.91 लाख कोटी खर्च; ट्रम्प यांची लोकप्रियता घटली
- नसरापूर अत्याचार प्रकरणाला काही लोकांकडून वेगळे वळण; देवेंद्र फडणवीसांनी ठेवले वर्मावर बोट!!