प्रतिनिधी
नवी दिल्ली – बाकी दुसरे तिसरे कोणते नसून देशातल्या सहकारी बँकांवरील रिझर्व्ह बँकेने लादलेल्या नवीन नियमांचे नियंत्रण कमी करावे, अशी मागणी घेऊन राज्यसभेचे खासदार शरद पवार हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आज भेटल्याचे स्पष्ट झाले आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि प्रवक्ते नबाब मलिक यांनी ही माहिती दिलीच. पण आता खासदार शरद पवारांनी पंतप्रधान मोदींना सोपविलेले पत्रच समोर आले आहे. sharad pawar met PM modi for co oprative bank issues
रिझर्व्ह बँकेने दोन महिन्यांपूर्वीच नवी नियमावली जाहीर करून सहकारी बँकांवर नियंत्रण आणले आहे. महाराष्ट्रातल्या आणि इतर काही राज्यांमधल्या सहकारी बँकांना हे नियंत्रण जाचक वाटत आहे. कारण या बँकांवर राजकीय नेत्यांचे वर्चस्व आहे. या बँकांच्या आर्थिक ताकदीच्या बळावर या नेत्यांचा राजकीय जोर चालतो. महाराष्ट्रात राष्ट्रवादीचे सहकारी बँकांवर राजकीय वर्चस्व आहे.
त्यामुळे या सहकारी बँकांना रिझर्व्ह बँकेचे नियंत्रण नको आहे. सहकारी बँकांची ही कैफियक घेऊन त्यांची तरफदारी करण्यासाठी पवारांनी चार पानी पत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आजच्या भेटीमध्ये सोपविले आहे.
जयंत पाटील यांनी या भेटीमागे रहस्य उलगडून दाखविले आहे. सहकार क्षेत्रातील परिस्थिती हे भेटीमागचे मुख्य कारण असल्याचे त्यांनी सांगितले. जयंत पाटील म्हणाले, की देशाच्या वेगवेगळ्या भागातल्या सहकारी बँकिंग क्षेत्रातल्या लोकांनी गेल्या महिन्या-दीड महिन्यात पवारांना अनेक पत्रे पाठवलीत. त्या सगळ्यांचा विचार करून केंद्र सरकारने यात लक्ष घातले पाहिजे आणि रिझर्व्ह बँकेला योग्य त्या सूचना दिल्या पाहिजेत, यासाठी शरद पवार पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटायला गेले, असे जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.
राष्ट्रवादीचे प्रवक्ते नबाब मलिक यांनीही या भेटीच्या कारणाला दुजोरा दिला. ते म्हणाले, की पंतप्रधानांबरोबर झालेल्या या बैठकीत शरद पवारांनी विशेष करून सहकारी बँकांसदर्भात जे कायद्यामध्ये केंद्र सरकारने बदल केले आहेत, त्यावर चर्चा केली. केंद्राने कायद्यात केलेल्या बदलामुळे सहकारी बँकांचे अधिकार कुठे ना कुठे तरी मर्यादित करून रिझर्व्ह बँकेला जास्त अधिकार त्यामध्ये देण्यात आले आहेत. सहकार हा राज्याचा विषय आहे. घटनेत बदल करून त्याला स्वायत्ततेचा अधिकार दिला गेला आहे. त्यामुळे या संदर्भात शरद पवार यांनी पंतप्रधान मोदींना पत्र सादर केले आहे, अशी माहिती नबाब मलिक यांनी दिली आहे.