निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर येत्या २९ एप्रिलला काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहे. प्रशांत किशोर यांच्या काँग्रेस प्रवेशाचा हा मुहूर्त नेमका कोणी निवडला आहे हे माहिती नाही, पण नेमका त्याच दिवशी शनिपालट आहे… शनि मकर राशीतून कुंभ राशीत प्रवेश करीत आहे. म्हणजे ज्योतिषशास्त्रानुसार शनि पृथ्वीतत्त्वाच्या राशीतून आकाश तत्त्वाच्या राशीत प्रवेश करीत आहे…!! prashant kishor – will he be able to revive congress for 2024 with his magic of 600 slides?
-पाय जमिनीवर की आकाशात…
प्रशांत किशोर जोपर्यंत ममता बॅनर्जी, अरविंद केजरीवाल, जगनमोहन रेड्डी यांच्यासारख्या प्रादेशिक नेत्यांबरोबर काम करीत होते, तेव्हा ते बरेच जमीनीवर पाय ठेवून उभे होते. पण आता ते अधिकृतरित्या काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत, म्हणजे शनि जेव्हा आकाश तत्त्वाच्या राशीत असणार आहे, तेव्हा प्रशांत किशोर काँग्रेसचे काम करायला लागणार आहेत… याचा अर्थ प्रशांत किशोर यांचे पाय जमिनीवर राहणार नाहीत, असा कोणी काढणार आहे का…?? माहिती नाही…!!
-प्रस्क्रिप्शन योग्य पण…
पण प्रशांत किशोर यांनी आपल्या ६०० स्लाइड्सच्या माध्यमांतून काँग्रेसच्या सध्याची राजकीय तब्येत तपासून जे प्रिस्क्रिप्शन लिहिले आहे… ते म्हणे काँग्रेस नेत्यांनी नीट पाहिले देखील नाही… अर्थात अशी सूत्रांची बातमी आहे. त्यामुळे त्या बातमीवर आधारून बोलण्यात काही मतलब नाही. पण त्या प्रिस्क्रिप्शनमध्ये जे मुद्दे मांडले आहेत ना…, त्यामुळे प्रशांत किशोर यांच्या भूमिकेविषयी संशय वाढतो…!!
-६०० स्लाइड्स
आता प्रशांत किशोर यांनी काँग्रेसला पूर्णवेळ अध्यक्ष हवा, काँग्रेसने आपल्या मूळ सिध्दांतावर परत चालायला सुरूवात करावी, काँग्रेसने आपल्या नेत्यांची आणि कार्यकर्त्यांची फळी जिल्हा – तालुका पातळीपर्यंत तयार करावी, वगैरे सूचना केल्या आहेत. या सूचनांचे संपूर्ण पालन केल्यावर काँग्रेसने ३७० ते ४०० जागांवर लक्ष केंद्रीत करावे, असे प्रशांत किशोर यांनी ६०० स्लाइड्समध्ये नमूद केले आहे.
-प्रशांत किशोर यांच्या भूमिकेविषयी संशय
पण प्रशांत किशोर यांच्या सूचनेतली खरी “राजकीय मेख” त्यापुढे दडलेली आहे आणि त्यामुळेच प्रशांत किशोर यांच्या भूमिकेविषयी संशय वाढतो, ती म्हणजे प्रशांत किशोर यांनी काँग्रेसला बंगाल आणि महाराष्ट्रात प्रादेशिक पक्षांशी जुळवून घ्यायला सांगितले आहे…!! तसेच उत्तर प्रदेश, बिहार, झारखंडमध्ये स्वतंत्रपणे निवडणूक लढवायला सांगितले आहे. ज्या राज्यांमधल्या प्रादेशिक पक्षांना अर्थात तृणमूळ काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादीला काँग्रेस पक्ष आपल्या राजकीय यशातला अडथळा वाटतो, काँग्रेसला तृणमूळ, शिवसेना आणि राष्ट्रवादी हे तीनही पक्ष नुसते वापरू अथवा झटकू इच्छितात, त्या राज्यांमध्ये याच पक्षांबरोबर आघाडी करण्याची सूचना प्रशांत किशोर करतात. आणि उत्तर प्रदेश, बिहार आणि झारखंडमध्ये आधीच तिथल्या समाजवादी, बसप, राजद आदी पक्षांनी काँग्रेसला झटकूनच टाकले आहे, तिथे प्रशांत किशोर काँग्रेसला स्वतंत्रपणे निवडणूक लढवायला सांगतात…!! ही प्रशांत किशोर यांची खरी “राजकीय चलाखी” आहे आणि काँग्रेसपेक्षा प्रादेशिक पक्षांच्या बाजूने झुकल्याचे निदर्शक आहे…!!
-काँग्रेसच्या हातात की प्रादेशिक पक्षांच्या…
शिवाय काँग्रेसने प्रादेशिक पक्षांशी जुळवून घेण्याची सूचना प्रशांत किशोर यांनी केली आहे. पण प्रश्न हा आहे, की प्रादेशिक पक्ष काँग्रेसच्या अटीशर्तींवर काँग्रेसशी युती अथवा आघाडी करायला तयार होतील का…?? हा आहे. आणि तिथेच खरी राजकीय मेख दडली आहे.
-ममता – पवार काँग्रेसचे काय करतील…
तृणमूळ आणि राष्ट्रवादी या दोन्ही काँग्रेस तर सरळसरळ मूळ काँग्रेस पक्षाचा राजकीय रस शोषूनच वाढल्या आहेत. ग्रामीण भाषेत याला “बांडगुळे” म्हणतात असे हे दोन प्रादेशिक पक्ष आहेत. समाजवादी, बसप, राजद यांचे मूळ ढांचे जरी वेगळे असले, तरी काँग्रेसजनांच्या सत्तेच्या वळचणीला बसण्याच्या मूळ सवयीनुसार या तीनही पक्षांना नेत्यांचा आणि कार्यकर्त्यांचा काही प्रमाणात का होईना पण “राजकीय पुरवठा” मूळ काँग्रेसनेच केला आहे. २०१९ नंतरच्या बंगालच्या निवडणूकीत तर याचा सर्वाधिक प्रत्यय आला आहे. ममता बॅनर्जी यांनी तोंडी तोफा भाजपवर डागल्या, पण प्रत्येक वेळी त्यांनी काँग्रेस फोडली आहे. आज बंगाल विधानसभेत काँग्रेसचे ० आमदार आहेत. अशी स्थिती ममतांनी काँग्रेस पोखरून निर्माण केली आहे. मग त्याच ममता बॅनर्जी बंगालमध्ये काँग्रेसशी २०२४ मध्ये युती किंवा आघाडी करून त्या पक्षाला कशासाठी संजीवनी देतील…??
-शिवसेना की काँग्रेस…
जे बंगालचे तेच थोड्या फार फरकाने महाराष्ट्राचे. इथे शरद पवार काँग्रेसबरोब सत्तेसाठी जरूर आघाडी करतात पण ते काँग्रेस उमेदवार निवडणूक आणण्यापेक्षा पाडण्याचे प्रयत्न अधिक करतात, हे काय लपून राहिले आहे…?? शिवाय महाराष्ट्रातल्या राजकीय परिस्थितीनुसार शरद पवार शिवसेने बरोबर युती करून काँग्रेसला एकटे पाडून तिची मते आपल्या राष्ट्रवादीकडे ओढायचा प्रयत्न करतील की काँग्रेसला संजीवनीसाठी मदत करतील…?? हा प्रश्न कळीचा नाही का…??
शिवाय वर उल्लेख केलेल्या बसप सोडला, तर बाकी कोणत्याही पक्षाचे काँग्रेसच्या मूळ सिध्दांताशी वैर नाही. उलट मैत्रीच आहे. अशा स्थितीत संघटनात्मक पातळीवर घसलेली काँग्रेस मूळ सिध्दांतावर परतून असे काय दिवे लावणार आहे, हा खरा प्रश्नच आहे आणि त्याचे उत्तर प्रशांत किशोर यांनी आपल्या ६०० स्लाइड्समधून दिले आहे की नाही याची कोणालाच माहिती नाही.
अशा स्थितीत प्रशांत किशोर यांच्या ६०० स्लाइड्स कितीही भारी असल्या… काँग्रेसच्या मूळ राजकीय दुखण्याचे प्रिस्क्रिप्शन कितीही बरोबर असले, तरी उपाययोजना फक्त प्रशांत किशोर किंवा काँग्रेस यांच्या हातात उरलेली नाही…!!
-व्हेंटिलेटर फक्त सपोर्ट… औषध नाही
मध्यंतरी सोनिया गांधींचे जावई रॉबर्ट वड्रा हे थेट राजकारणात प्रवेश करून काँग्रेस पुनरूज्जीवन देणार अशा बातम्या आल्या होत्या. त्यावेळी “जावई डॉक्टर” असे मी लिहिले होते… प्रशांत किशोर हे कदाचित त्या पलिकडचे सर्जन असतीलही… पण या निमित्ताने एका मराठी सिनेमातला बोमन इराणीने म्हटलेला डायलॉग आठवला… आशुतोष गोवारीकरच्या “व्हेटिंलेटर” सिनेमात बोमन इराणी हा डॉक्टर म्हणतो… व्हेटिंलेटर हा सपोर्ट आहे… औषध नाही… हे पेशंटच्या नातेवाईकांनी समजावून घ्यावे…
प्रशांत किशोर हा सर्जन असेल. आपल्या ६०० स्लाइड्सच्या माध्यमातून तो काँग्रेसला व्हेंटिलेटर लावेल… पण शेवटी व्हेंटिलेटर हा सपोर्ट आहे, औषध नाही…!!, हीच वस्तुस्थिती आहे आणि काँग्रेससाठी हाच सर्वाधिक कळीचा मुद्दा आहे…!!