विशेष प्रतिनिधी
मुंबई : नगरपंचायतीच्या निवडणुकीत अनेक दिग्गजांना मतदारांनी धक्के दिले असून यामध्ये केंद्रीय मंत्री नारायण राणे, डॉ. भारती पवार, राज्यातले मंत्री विश्वजीत कदम, धनंजय मुंडे आदींचा समावेश आहे. Narayan Rane, Dr. Bharti Pawar, Vishwajeet Kadam, Dhananjay Munde !!
कुडाळ नगरपंचायतीत भाजपने 8 जागा जिंकल्या असून शिवसेनेने 9, तर काँग्रेसने 2 जागा जिंकल्या आहेत. त्यामुळे सत्तेची चावी आता काँग्रेसच्या हाती आली आहे. परंतु, नारायण राणे यांना मात्र हा धक्काच मानला जात आहे. दिंडोरी मध्ये भाजपला 4 जागांवर समाधान मानावे लागले आहे. तेथे शिवसेनेने 6 जागा जिंकून आघाडी घेतली आहे. राष्ट्रवादीला 2 जागा मिळाल्या आहेत.
सगळ्यात मोठा धक्कादायक निकाल कडेगाव मध्ये लागला असून मंत्री विश्वजित कदम यांच्या नेतृत्वाखाली कॉंग्रेसचा सुपडा साफ झाला आहे. तेथे भाजपने 11 जागा जिंकल्या असून काँग्रेस 5 आणि राष्ट्रवादी 1 असे बलाबल आहे. बऱ्याच वर्षांनी कदम घराण्याच्या आपल्याच गावातील राजकीय वर्चस्वाला धक्का बसला आहे.
बीड जिल्ह्यात आष्टी, पाटोदा, शिरूर या नगरपंचायती भाजपने जिंकल्या असून धनंजय मुंडे यांनी या पंचायतींमध्ये प्रतिष्ठा पणाला लावली होती. परंतु त्यांना पराभव पत्करावा लागला आहे. वडवणी मध्ये मात्र पंकजा मुंडे यांना धक्का बसला आहे. परंतु एकूणच बीड जिल्ह्यात भाजपने राष्ट्रवादीवर निर्णायक मात केली असून भाजप एकसंध राहून लढणारा पक्ष आहे. आपापल्या जहागिऱ्या सांभाळणारा पक्ष नाही, असा टोला पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडे आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांना लगावला आहे.