प्रतिनिधी
मुंबई : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची कृष्णकुंज या निवासस्थानी जाऊन बहुचर्चित भेट घेतली. त्यानंतर त्यांनी भाजप आणि मनसे यांच्यात मुंबई महापालिका निवडणुकीसाठी युती करण्याचा कोणताही प्रस्ताव नसल्याचा खुलासा केला. ही एक सदिच्छा भेट होती त्यावर माध्यमांनीच भाजप – मनसे युतीच्या चर्चा घडवल्या, असे मत चंद्रकांतदादा पाटील यांनी व्यक्त केले.Maharashtra BJP President Chandrakant Patil met Maharashtra Navnirman Sena Chief Raj Thackeray today
मुंबई महापालिकेच्या निवडणुका अजून सहा-आठ महिने लांब आहेत. त्यावेळी काय असेल तो निर्णय घेऊ, अशी पुस्तीही त्यांनी जोडली. शिवसेना -/राष्ट्रवादी एकत्र येऊन मुंबई महापालिकेची निवडणूक लढवतील. काँग्रेस स्वतंत्रपणे निवडणूक लढवणार आहे, असे त्या पक्षाने आधीच जाहीर केले आहे.
या पार्श्वभूमीवर भाजप आणि मनसे यांची युती होण्याच्या बातम्या मराठी माध्यमांनी दिल्या होत्या. त्यावर चंद्रकांतदादा पाटील यांनी आज पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्यांच्या कृष्णकुंजवर जाऊन राज ठाकरे यांची भेट घेणे यामुळे दोन्ही पक्षांच्या युतीच्या चर्चेला माध्यमांनी अधिकच हवा दिली. परंतु तसे काहीही नसल्याचा खुलासा चंद्रकांत पाटील यांनी या भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना केला.
चंद्रकांतदादांना भेटण्यापूर्वी राज ठाकरे यांनी मनसेच्या काही निवडक नेत्यांची बैठक घेतली होती. त्यामध्ये त्यांनी निवडणुकीबाबत चर्चा केली. परंतु त्याची अधिकृत माहिती कोणत्याही नेत्याने दिलेली नाही. त्यामुळे भाजप व मनसे युती चा युतीच्या चर्चेचा आणि राजकीय अटकळींचा बाजार गरम राहिला आहे.