नाशिक : यशवंत शिष्याची काय ही अवस्था??, सुनेच्या पक्षात सुद्धा विलीन होत येईना!!, अशी राजकीय स्थिती महाराष्ट्रात येऊन ठेपली आहे. यशवंतराव चव्हाण यांनी आपल्या पडत्या काळात इंदिरा गांधींची मनधरणी करून काँग्रेसमध्ये प्रवेश मिळवला होता, पण यशवंतरावांच्या शिष्यांना आपल्या सुनेच्या पक्षात सुद्धा नीटपणे विलीन होता येत नाहीये. त्यांना विलीनीकरणासाठी मोठा राजकीय धडपडाट करावा लागतोय. पण विलीनीकरण काही जमून येत नाही. Sharad Pawar
अजित पवारांच्या अकाली एक्झिट नंतर त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची सगळी सूत्रे सुनेत्रा पवार यांच्याकडे जातील, हे लक्षात येताच शरद पवारांनी आणि त्यांच्या गोटातल्या नेत्यांनी “अजित पवारांची अखेरची इच्छा” अशा शब्दांचा वापर करत दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाचे राजकीय पिल्लू सोडले. यातून त्यांनी सुनेत्रा पवारांच्या नेतृत्वात खोडा घालायचा “डाव” खेळलाच, पण त्याचबरोबर अजित पवारांच्या राष्ट्रवादीतल्या सत्तेच्या कोट्यातला तुकडा खेचायचाही प्रयत्न केला.
– सुनेत्रा पवारांनी “डाव” ओळखला
पण सुनेत्रा पवार आणि त्यांच्या दोन्ही मुलांनी पवारांच्या गोटातला डाव नीट ओळखला. सुनेत्रा पवार तर शरद पवारांना न सांगताच मुंबईला निघून आल्या आणि त्यांनी पवारांना न सांगताच उपमुख्यमंत्री पदाची शपथ सुद्धा घेतली. त्यामुळे शरद पवारांचा पापड मोडला. सुप्रिया सुळे यांचे नेतृत्व लादायचा “डाव” उधळला गेला. त्यांच्या गोटातल्या नेत्यांचा हिरमोड झाला. “वस्ताद भाकरी फिरवायचा बेतात होते, पण चेल्यांनी पिठाचा डबा पळवला”, “पंगतीला बसले आणि बुंदी संपली”, अशा पोस्ट व्हायरल करून महाराष्ट्रातल्या जनतेने शरद पवारांची आणि त्यांच्या गोटातल्या नेत्यांची खिल्ली उडवली. पवारांनी आणि त्यांच्या गोटातल्या नेत्यांनी प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ, धनंजय मुंडे आणि नरेश अरोरा यांची बदनामी केली. पण सुनेत्रा पवार आणि त्यांची मुले बधली नाहीत. यापैकी कुणीही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीणीकरणाला मान्यताच दिली नाही. त्यामुळे शरद पवारांच्या गोटातल्या नेत्यांना आता अजित पवारांबरोबरच्या मीटिंगमध्ये काय झाले??, याचे पुरावे एक एक करून बाहेर काढायचे “राजकीय त्राटक” सुचले. रोहित पवार 9 फेब्रुवारी नंतर एक “भव्य” पत्रकार परिषद घेऊन ते पुरावे जाहीर करणार आहेत म्हणे!!
पण शरद पवारांना आणि त्यांच्या गोटातल्या नेत्यांना राष्ट्रवादींच्या विलीनीकरणाची घाई का आणि कशासाठी झाली??, आणि त्यांना अपयश कसे आले??, याच्याच कहाण्या सगळीकडे पसरल्या. शरद पवारांना आपल्या सुनेच्या पक्षात देखील शिरकाव करता आला नाही, हे सिद्ध झाले.
– यशवंतरावांचे उदाहरण
यशवंतरावांच्या चव्हाण आणि रेड्डी काँग्रेसचा (चड्डी काँग्रेस) 1980 च्या लोकसभा निवडणुकीत दणकून पराभव झाल्यानंतर यशवंतरावांनी काँग्रेसमध्ये जाण्याचा मार्ग पत्करला होता. त्यासाठी त्यांनी सुमारे दीड वर्षे इंदिरा गांधींची मनधरणी केली होती. पण इंदिरा गांधी बिल्कुल बधल्या नव्हत्या. त्यांनी यशवंतरावांची पुरती नाचक्की करूनच त्यांना काँग्रेसमध्ये प्रवेश दिला होता. पण काही झाले तरी ते यशवंतराव होते त्यांनी इंदिरा गांधी यांच्यासारख्या दिग्गज नेत्यापुढे शरणागती पत्करून काँग्रेस सारख्या प्रचंड शक्तिशाली अशा सत्ताधारी पक्षात प्रवेश केला होता. इंदिरा गांधींनी त्यांना आठव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष नेमून राजकीय दृष्ट्या पुनर्प्रस्थापित केले होते.
– यशवंत शिष्याचा धडपडाट
त्या उलट यशवंत शिष्य शरद पवार यांना आपल्या सुनेच्या पक्षात शिरकाव करण्यासाठी धडपडाट करावा लागतोय. विलीनीकरणाचे पिल्लू सोडावे लागते त्यासाठी अजित पवारांच्या शेवटच्या तथाकथित इच्छेचा हवाला द्यावा लागतोय आणि तरीसुद्धा विलीनीकरण जमत नाही आणि सुनेच्या पक्षात शिरकाव करणे जमत नाही. आपल्या मुलीचे नेतृत्व लादायचे जमत नाही. आपल्या गोटातल्या नेत्यांना सत्तेचा तुकडा मिळवून देता येणे जमत नाही, अशी स्थिती येऊन ठेपली आहे.
– पवारांचे आठवले बोल…
2024 च्या लोकसभा निवडणुकीत INDI आघाडीचा पराभव झाला. पण काँग्रेसला 99 अशा सन्मानजनक जागा मिळाल्या. शरद पवारांच्या राष्ट्रवादीला सुद्धा दहा पैकी आठ जागा मिळाल्या. त्यावेळी दिलेल्या मुलाखतीत शरद पवार म्हणाले होते, की आता काँग्रेसच्या मुख्य प्रवाहातून बाहेर पडलेल्या प्रादेशिक पक्षांना पुन्हा हळूहळू काँग्रेसमध्ये जावे लागेल अशी स्थिती निर्माण होताना दिसते आहे. भविष्यात हे प्रादेशिक पक्ष टप्प्याटप्प्याने काँग्रेसमध्ये विलीन होऊन काँग्रेसची शक्ती वाढण्याची प्रक्रिया सुरू होईल. पण पवारांचे हे बोल सुद्धा सत्यात उतरले नाहीत. इतर प्रादेशिक पक्षांचे सोडून द्या, खुद्द पवारांच्या पक्षाला सुद्धा काँग्रेसमध्ये विलीन होता आले नाही. त्यांना आणि त्यांच्या पक्षातल्या नेत्यांना त्यांच्या सुनेचा पक्ष सुद्धा आपल्यात विलीन करून घ्यायला तयार नाही.
Yashwantrao Chavan joined Congress after his defeat, but Sharad Pawar can’t enter in his daughter in law’s party
महत्वाच्या बातम्या
- दोन राष्ट्रवादींच्या विलीनीकरणाची गरजच काय??, “हा” पर्याय उपलब्ध असताना!!
- Gautam Adani : अदानींनी यूएस-कोर्टाची नोटीस 15 महिन्यांनंतर स्वीकारली; फसवणुकीच्या प्रकरणात 90 दिवसांत उत्तर द्यावे लागेल
- केंद्रीय अर्थसंकल्पातून महाराष्ट्राला काय मिळाले??, देवेंद्र फडणवीसांनी उलगडले तपशील!!
- केंद्रीय अर्थसंकल्पातून विकासित भारताकडे दमदार पाऊल, महाराष्ट्राला मिळणार सुमारे 1 लाख कोटी; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती