विशेष प्रतिनिधी
नागपूर : Vikas Lawande राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रवक्ते विकास लवांडे यांनी राज्य सरकारवर गंभीर आरोप करत आपल्या जीवाला आणि कुटुंबाला धोका असल्याचा दावा केला आहे. मुख्यमंत्री आणि पोलिस प्रशासनाकडे वारंवार संरक्षणाची मागणी करूनही कोणतीही कारवाई होत नसल्याने, “सरकार माझ्या हत्येची वाट पाहत आहे का?” असा खळबळजनक सवाल त्यांनी उपस्थित केला.Vikas Lawande
नागपुरात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना लवांडे यांनी विविध मुद्द्यांवर सरकार आणि काही हिंदुत्ववादी संघटनांवर टीका केली. त्यांनी सांगितले की, गेल्या काही महिन्यांपासून आपल्याला सातत्याने धमक्या मिळत आहेत आणि त्यामुळे स्वतःसह कुटुंबीयांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.Vikas Lawande
‘वाघोली पोलिसांनी बेकायदेशीर अटक केली’
विकास लवांडे यांनी आपल्या अटकेचाही उल्लेख केला. शरद पवार यांच्या विचारांचे समर्थन केल्यामुळे वाघोली पोलिसांनी कोणतीही पूर्वसूचना न देता न्यायालयाच्या आवारातून आपल्याला अटक केली होती, असा आरोप त्यांनी केला.
“न्यायालयाने तत्काळ माझी सुटका केली. जामीन मंजूर करताना पोलिस आणि सरकारी वकिलांनीही चूक झाल्याचे मान्य केले. या संपूर्ण प्रकरणाविरोधात मी न्यायालयात याचिका दाखल केली आहे,” असे लवांडे म्हणाले.
‘महागाई-बेरोजगारीवरून लक्ष हटवण्याचा प्रयत्न’
राज्यातील वाढती महागाई, बेरोजगारी आणि गुन्हेगारी यांसारख्या प्रश्नांवरून जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी समाजात जाणीवपूर्वक वाद निर्माण केले जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.
“तरुणांची विशिष्ट संघटनांमध्ये भरती करून त्यांचे विचारपूर्वक ब्रेनवॉश केले जात आहे. समाजात धार्मिक ध्रुवीकरण निर्माण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत,” असा दावा त्यांनी केला.
‘वारकरी संप्रदाय हायजॅक करण्याचा प्रयत्न’
लवांडे यांनी वारकरी संप्रदायाबाबतही गंभीर आरोप केले. “मूळ वारकरी परंपरा आणि विचारधारा बाजूला सारून काहीजण वारकरी संप्रदाय ताब्यात घेण्याचा प्रयत्न करत आहेत,” असे ते म्हणाले.
यावेळी त्यांनी संग्राम भंडारे यांच्यावरही टीका केली. “वारकऱ्यांच्या वेशात काही गुंड प्रवृत्तीचे लोक काम करत आहेत. याच लोकांकडून मला धक्काबुक्की आणि शिवीगाळ करण्यात आली,” असा आरोप त्यांनी केला.
‘भिडे आणि विहिंपशी संबंधित लोकांकडून धमक्या’
लवांडे यांनी दावा केला की, संभाजी भिडे आणि विश्व हिंदू परिषदेशी संबंधित काही व्यक्तींकडून आपल्याला सातत्याने धमक्या दिल्या जात आहेत. त्यामुळे स्वतःच्या आणि कुटुंबाच्या सुरक्षेबाबत गंभीर चिंता निर्माण झाली आहे.
‘मुख्यमंत्र्यांना दोनदा निवेदन दिले’
“मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दोन वेळा लेखी निवेदन देऊन संरक्षणाची मागणी केली. मात्र अद्याप कोणतीही सुरक्षा देण्यात आलेली नाही,” असा आरोप त्यांनी केला.
तथापि, न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास असल्याचे सांगत लवांडे म्हणाले, “माझ्या जीवाला काही झाले तरी महापुरुषांचे विचार, संविधान आणि सहिष्णुतेच्या मूल्यांसाठीचा लढा मी शेवटपर्यंत सुरू ठेवणार आहे.”
दरम्यान, विकास लवांडे यांच्या या आरोपांवर सरकार किंवा संबंधित व्यक्तींकडून अद्याप अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. मात्र त्यांच्या वक्तव्यामुळे राज्याच्या राजकारणात नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.
Is the Government Waiting for My Murder?: NCP Leader Vikas Lawande’s Serious Allegation
महत्वाच्या बातम्या
- एकनाथ शिंदे राष्ट्रवादीला कोकणात दणका द्यायच्या तयारीत; अनिकेत सुनील तटकरेंना निवडणूक अवघड!
- शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये; 10 जून पर्यंत मान्सूनच्या पावसाच्या आगमनाची शक्यता धूसर; IMD चा इशारा
- Malappuram : केरळ, कर्नाटक आणि तामिळनाडूत एनआयएचे १९ ठिकाणी छापे; मलप्पुरम स्फोटकसाठा प्रकरणात मोठी कारवाई
- Pune-Pimpri : पुणे-पिंपरी दारूकांडाचे धक्कादायक सत्य समोर; एकूण मृतांची संख्या 22 वर पोहोचली