नाशिक : माळेगाव साखर कारखान्याच्या निवडणुकीत काकांनी साधला डाव, मुलगी ठेवून safe अजितदादांच्याच पुतण्याला धोबीपछाड!! असे राजकारण शरद पवारांनी खेळले.
माळेगाव साखर कारखान्याच्या निवडणुकीत खरी लढत अजित पवारांचे निळकंठेश्वर पॅनल आणि चंद्रराव तावरे यांचे सहकार बचाव पॅनल यांच्यातच झाली. त्यामध्ये अजित पवारांच्या निळकंठेश्वर पॅनलने बाजी मारली. चंद्रराव तावरे यांचे सहकार पॅनलचे उमेदवार दुसऱ्या नंबर वर राहिले, पण यात सगळ्यात मोठा दारुण पराभव मात्र खासदार शरद पवार यांचा झाला. कारण त्यांनी बळीराजा पॅनेल उभे करून अजित पवार आणि चंद्रराव तावरे यांना आव्हान द्यायचा प्रयत्न केला होता. अर्थात हा प्रयत्न करताना देखील शरद पवारांनी तो सरळ पद्धतीने केला नाही तर तिथेही एक वेगळाच डाव खेळला.
बळीराजा पॅनेलचे नेतृत्व त्यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडे सोपविले नाही, तर ते बारामती विधानसभा निवडणुकीत पडलेले उमेदवार युगेंद्र पवार यांच्याकडे दिले. त्यामुळे पवारांनी उडाला तर कावळा, बुडाला, तर बेडूक हेच राजकारण साध्य केले. आपली कन्या सुप्रिया सुळे हिच्यावर कुठल्याही निवडणुकीतल्या पराभवाचा ठपका बसू नये यासाठी पवारांनी अजित पवारांच्या सख्या पुतण्याला म्हणजेच श्रीनिवास पवार यांचा मुलगा युगेंद्र पवार याला बळीराजा पॅनलचे प्रमुख केले. त्यामुळे अजित पवारांचा विजय झाला तरी त्यांच्याविरुद्ध आपली मुलगी पराभूत झाली नाही, तर त्यांचाच पुतण्या पराभूत झाला, हे पवारांनी सिद्ध केले.
वास्तविक दोन राष्ट्रवादी काँग्रेस एकमेकांपासून अलग झाल्यानंतर शरद पवारांनी सुप्रिया सुळे यांना स्थानिक राजकारणात लक्ष घालायची सूचना केली होती. याचा अर्थ साखर कारखाने आणि अन्य सहकारी संस्थांच्या निवडणुकांमध्ये सुप्रिया सुळे स्वतः लक्ष घालणार असे त्यावेळी पवारांनी सूचित केले होते. परंतु पवार जे बोलतात, ते करत नाहीत. जे बोलत नाहीत तेच करतात, हे इथे देखील स्पष्ट झाले. त्यांनी माळेगावच्या निवडणुकीच्या थेट जबाबदारीतून सुप्रिया सुळे यांना अलगद बाजूला ठेवले. अजित पवारांच्या विरोधात स्थानिक निवडणुकीत पराभव होऊ शकतो याचा अंदाज येताच सुप्रिया सुळे देखील अलगदपणे बाजूला गेल्या आणि बळीराजा पॅनेलचे नेतृत्व युगेंद्र पवार यांना करायला लागले. त्यामुळे विधानसभेपाठोपाठ साखर कारखान्याच्या निवडणुकीत देखील युगेंद्र पवारांवर पराभवाचा ठपका बसला.
या आधीच्या निवडणुकांमध्ये जे कोणी पवार पराभूत झाले, ते सगळे शरद पवारांचे सख्खे नातेवाईक नाहीत, तर अजित पवारांचे सख्खे नातेवाईक आहेत. अजित पवारांचा मुलगा पार्थ पवारचा मावळ लोकसभा मतदारसंघात पराभव झाला होता. सुनेत्रा पवार बारामतीतून हरल्या. त्या पाठोपाठ विधानसभेत युगेंद्र पवार हरला आणि आता माळेगावच्या निवडणुकीतही त्याचाच पराभव झाला. काकांनी डाव साधून मुलगी safe ठेवली आणि अजितदादांच्या करवी त्यांच्याच पुतण्याला धोबीपछाड दिला.
Sharad Pawar kept his daughter safe from defeat in Malegaon sugar factory election
महत्वाच्या बातम्या