विशेष प्रतिनिधी
मुंबई : Bhushan Gawai सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावरील हल्ला देशासाठी धोक्याची घंटा असल्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिला आहे. सरन्यायाधीशांवर अशा प्रकारे हल्ल्याचा प्रयत्न होणे हा केवळ न्यायवस्थेचाच नव्हे तर लोकशाही, संविधान व संपूर्ण देशाचा घोर अवमान आहे, असे ते म्हणालेत. राज्यातील इतरही अनेक नेते तथा प्रतिष्ठित व्यक्तींनी गवईंवर त्यांच्या न्यायदालनात झालेल्या कथित हल्ल्याचा जोरकस शब्दांत निषेध केला आहे.Bhushan Gawai
सरन्यायाधीश भूषण गवई आज सकाळी आपल्या न्यायदालनात न्यायदानाचे काम करत होते. त्यावेळी एका वकिलाने आपला बूट काढून त्यांच्या दिशेने फेकण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर तिथे उपस्थित सुरक्षा रक्षकांनी तत्काळ त्या व्यक्तीच्या मुसक्या आवळल्या. प्रत्यक्षदर्शींच्या मते, सनातन का अपमान, नहीं सहेगा हिंदुस्तान, अशी नारेबाजी हल्लेखोराने यावेळी केली. या अनपेक्षित घटनेमुळे देशाच्या न्यायव्यवस्थेत एकच खळबळ माजली आहे. शरद पवारांनी या घटनेवर तीव्र संताप व्यक्त केला आहे.Bhushan Gawai
लोकशाही, संविधान अन् देशाचा घोर अवमान – शरद पवार
शरद पवार याविषयी म्हणाले, लोकशाही आणि संविधानाच्या मूल्यांना आधार मानून वाद-प्रतिवादातून न्याय्य भूमिकेकडे जाण्यासाठी न्यायव्यवस्था असते. त्याच न्यायव्यवस्थेच्या सर्वोच्च संस्थेत मुख्य न्यायमूर्तींवरच अशा प्रकारे हल्ल्याचा प्रयत्न होणं हा केवळ न्यायव्यवस्थेचाच नव्हे तर लोकशाहीचा, संविधानाचा आणि देशाचा घोर अवमान आहे. आपल्या देशात पेरलं जाणारं विष आता संविधानाच्या सर्वोच्च संस्थांनाही जुमानत नाही, ही देशासाठी धोक्याची घंटा आहे. ह्या घटनेचा मी निषेध करतो व कोणत्याही परिस्थितीत भारतीय लोकशाहीचे स्तंभ कमकुवत होणार नाहीत, ह्यासाठी कायम प्रयत्नशील राहण्याची ग्वाही देतो.
हा हल्ला मनुवादी विचारसरणीचा द्योतक – वडेट्टीवार
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी हा हल्ला काही लोकांच्या डोक्यात खोलवर रुजलेल्या मनुवादी विचारधारेचे प्रतिक असल्याचा आरोप केला आहे. सर्वोच्च न्यायालयात आज सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर एक वकिलाने वस्तू फेकून हल्ला करण्याचा प्रयत्न केला याचा आम्ही निषेध करतो. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दाखविलेल्या मार्गावर चालून संघर्ष करून देशातील सर्वोच्च न्यायालयात सर्वोच्च स्थानावर पोहचलेल्या भूषण गवई यांच्यासारख्या ज्येष्ठ न्यायमूर्तीवर केलेला हल्ला हा न्यायालयावर केलेला भ्याड हल्ला आहे.
आपल्या देशातील काही लोकांच्या डोक्यातून मनुवादी विचारधारा किती खोलवर रुजली आहे हे यातून स्पष्ट होते. या विकृत वृत्तीवर कठोर कारवाई केली नाही तर तो न्यायालय आणि पदावर बसून न्यायदान करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा अपमान असेल. थेट न्यायालयात सरन्यायाधीशांवर हल्ला होणे हे निषेधार्ह आहे, असे वडेट्टीवार म्हणालेत.
भाजपच्या प्रशिक्षण केंद्राची ही निर्मिती – संजय राऊत
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनीही या हल्ल्याचा निषेध केला आहे. सुप्रीम कोर्टाचे मुख्य न्यायाधीश भुषण गवई यांच्यावरील हल्ल्याचा प्रयत्न हा डॉ आंबेडकर आणि संविधानावरील थेट हल्ला आहे. हल्लेखोर बेगडी हिंदुत्ववादी आहेत. भाजपच्या प्रशिक्षण केंद्राची ही निर्मिती आहे, असे राऊत म्हणालेत.
सरन्यायाधीशांवरील हल्ला चिंतेची बाब – सुप्रिया सुळे
शरद पवारांच्या कन्या तथा खासदार सुप्रिया सुळे यांनीही या घटनेचा निषेध केला. देशाच्या सरन्यायाधीशांवर कोर्टातच हल्ला करण्याचा प्रयत्न झाला ही निश्चितच अतिशय धक्कादायक आणि तेवढीच चिंतेची बाब आहे. न्यायासनावर येनकेनप्रकारे दबाव आणण्याचा हा प्रयत्न आहे. हे सुदृढ लोकशाहीच्या दृष्टीने निश्चितच हितावह नाही. माझी केंद्र शासनाला विनंती आहे, की न्यायमूर्तींचा अशा पद्धतीने अवमान करणाऱ्या व्यक्तीवर कठोरात कठोर कारवाई करावी, तसेच न्यायासनाचा योग्य सन्मान राहील याबाबत केंद्र सरकारने योग्य ती पावले उचलावी, असे त्या म्हणाल्या.
अत्यंत गंभीर व निषेधार्ह घटना – रोहित पवार
आमदार रोहित पवार यांनीही ही अत्यंत गंभीर व निषेधार्ह घटना असल्याचा संताप व्यक्त केला आहे. कायद्याच्या राज्यातील कायद्याच्या मंदिरात सर्वोच्च न्यायासनावर बसलेल्या न्यायदेवतेवर बूट फेकून कायदाच हातात घेण्याचा प्रकार हा अत्यंत गंभीर आणि निषेधार्ह आहे. अशा विकृत कृत्यांमुळे विचलित होणारी आपली न्यायालयीन यंत्रणा इतकीही लेचीपेची नाही. असं कृत्य करणाऱ्या विकृतावर पोलिसांनी कठोर कारवाई करावी, असे ते म्हणाले.
जितेंद्र आव्हाड यांनीही व्यक्त केला संताप
आमदार जितेंद्र आव्हाड यांनीही या प्रकरणी आपली उद्विग्नता व्यक्त केली. सनातन का अपमान नहीं सहेंगे… एक सडक्या मनोप्रवृत्तीचा सुप्रीम कोर्टातला वकील जोरजोरात ओरडतो आणि थेट सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या दिशेने चप्पल फेकतो…. जेव्हा शपथ घेतल्यानंतर पहिल्यांदा महाराष्ट्रात सरन्यायाधीश आले होते, तेव्हा तर थेट राज्य सरकारने प्रोटोकॉल दिला नाही…. ह्या घटना कसल्या द्योतक आहेत… ढासळणाऱ्या मानसिकतेच्या आणि एक सनकीं डोक्याने भरलेल्या ज्वराचा, असे आव्हाड यांनी म्हटले आहे.
Attack on Chief Justice Bhushan Gawai ‘A Grave Insult to Democracy and Nation’: Sharad Pawar
महत्वाच्या बातम्या
- Nepal : नेपाळमध्ये भूस्खलनामुळे दोन दिवसांत 51 जणांचा मृत्यू; 9 जण बेपत्ता; लष्कराच्या हेलिकॉप्टरने बचावकार्य सुरू
- Diwali : दिवाळी-छठदरम्यान विमान भाडे वाढवणाऱ्यांवर कडक कारवाई; 1700 अतिरिक्त उड्डाणे असतील
- सनातनचा अपमान; सरन्यायाधीश भूषण गवईंवर वयोवृद्ध वकिलाचा हल्ल्याचा प्रयत्न; शरद पवारांकडून पहिला निषेध
- US Government : अमेरिकेच्या अण्वस्त्रांवरही शटडाऊनचा परिणाम; ऊर्जा सचिव म्हणतात- सुरक्षा निधी 8 दिवसांपासून प्रलंबित