• Download App
    पवार घराण्यातले बंड - सीझन टू Rebellion in the Pawar Family - Season Two

    पवार घराण्यातले बंड – सीझन टू

     

    बईतल्या राजभवनावर अजित पवार आणि ‘राष्ट्रवादी’च्या अन्य ज्येष्ठ नेत्यांनी रविवारी (2 जुलै) मंत्रिपदाची शपथ घेतली. त्याच दिवशी दुपारी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेतली. या परिषदेत पवार यांची देहबोली अत्यंत सहज, ताणरहित होती. अजित पवार यांच्याबद्दल ही त्यांचा स्वर नरमाईचा होता. त्याच रात्री सुप्रिया सुळे देखील ‘दादा’बद्दल आदराने व्यक्त झाल्या. काय असावं त्यांच कारण? शरद पवारांना स्वतःला तरुणपणातला ‘बंडखोर शरद’ आठवत होता का? ब्याऐंशी वर्षांच्या पवारांना त्यांच्या आईचे शब्द आठवत होते का? Rebellion in the Pawar Family – Season Two

    1960 : बारामती लोकसभा मतदारसंघातून 1957 ला निवडून आलेले काँग्रेस खासदार केशवराव जेधे यांचे 1960 मध्ये निधन झाले. पोटनिवडणूक जाहीर झाली. काँग्रेसने केशवरावांचे पुत्र गुलाबराव जेधे यांना उमेदवारी दिली. संयुक्त महाराष्ट्र समितीच्या वतीने शरद पवार यांचे थोरले बंधू ॲड. वसंतराव पवार यांना उमेदवारी जाहीर झाली. साहजिकच संपूर्ण पवार कुटुंबीय वसंतरावांचे म्हणजेच संयुक्त महाराष्ट्र समितीचे काम करत होते.
    अपवाद होता फक्त घरातल्या तरुण शरदचा.

    शरद पवार हे त्यावेळी काँग्रेसचे सक्रिय-पदाधिकारी कार्यकर्ता होते.

    त्या पोटनिवणुकीबद्दलची आठवण शरद पवार सांगतात – “माझ्या बंधूंना मी काँग्रेसचं काम करणार असल्याचं प्रामाणिकपणानं आणि स्पष्टपणानं सांगितलं. वास्तविक वसंतराव हे आम्हा भावंडांचे आधारस्तंभ होते. आम्हा साऱ्यांचे शिक्षण पूर्ण होण्यासाठी त्यांनी अपार मेहनत घेतली होती. आमच्या कुटुंबातले ते पहिलेच कायद्याचे पदवीधर त्यामुळे आम्हाला त्यांच्या प्रति खूप आदर आणि अभिमानही होता. त्यामुळे त्यांच्या विरोधात काम कसं करायचं, याचं भावनिक दडपण माझ्यावर होतच; पण माझं म्हणणं ऐकल्यावर त्यांनी नुसतं ते मान्यच केलं असं नव्हे तर त्या ऊपर म्हणाले देखील, “तू काँग्रेसचे विचारसरणी स्वीकारली आहेस तर काम त्याच पक्षाचं आणि त्याच्याच उमेदवाराचं केलं पाहिजेस.” माझ्या आईने तर आणखी बळ दिलं. ती म्हणाली, “तुझ्या विचारात स्पष्टता आहे, याचा मला आनंद आहे. त्यामुळे तू प्रामाणिकपणानं ‘काँग्रेस’चंच काम केलं पाहिजे. कुटुंब का पक्ष यासाठी मनात कोणतीही घालमेल न होता मला निर्णय घेता आला. माझी जराशीही मानसिक कोंडी झाली नाही. याचे कारण माझे हे आप्तस्वकीय. या निवडणुकीत मी मनापासून काँग्रेसचं काम केल्यामुळे पक्षातल्या नेत्यांच्या मनातही एक कौतुकाची भावना तयार झाली. एका परीने सख्ख्या मोठ्या भावाच्या विरोधात उभा राहिल्यानं ‘पोरगा विचारानं पक्का’ असल्याची त्यांची खात्री पटली.”

    पवार पुढं सांगतात – ”माझ्या विचारांतली स्पष्टता, काम करण्याचा झपाटा पाहून प्रदेशाध्यक्ष विनायकराव पाटील यांनी मला मुंबईत बोलावून नव्या जबाबदारीचं सुतोवाच केलं. ‘काँग्रेस’च्या प्रदेश कार्यालयातल्या टिळक भवनात मला निवासासाठी एक खोलीही देण्यात आली. माझ्या राजकीय जीवनातला तो एक महत्त्वपूर्ण आणि ठळक टप्पा होता.”

    1960 च्या निवडणुकीत शरद पवार यांनी सख्खे थोरले बंधू वसंतराव यांच्या पराभवासाठी अपार कष्ट घेतले आणि त्यांचा पराभवही केला. होय. त्या पोटनिवडणुकीत संयुक्त महाराष्ट्र समितीचे बारामती लोकसभा मतदारसंघातील उमेदवार ॲड. वसंतराव पवार यांचा पराभव करून काँग्रेसचे गुलाबराव जेधे विजयी झाले. थोरल्या भावाचा पराभव करण्यात महत्त्वाची भूमिका बजावूनच तरुण शरद पवारांनी त्याकाळी यशवंतराव चव्हाण, किसन वीर यांचा विश्वास संपादन केला होता.

    2023 : संपूर्ण परिवार एका बाजूला असताना त्याच्या विरोधात जात पवार घराण्यातली पहिली राजकीय बंडखोरी यशस्वी करणारे शरद पवार यांचे पुतणे अजित पवार यांनी बंडखोरी केली.

    याही वेळी संपूर्ण पवार कुटुंब प्रामुख्यानं शरद, सुप्रिया, रोहित हे सर्वजण एका बाजूला आणि अजित पवार दुसऱ्या बाजूला असे चित्र आहे. अजित पवार यांनी स्पष्टता दाखवत प्रामाणिकपणाने आपले बंड पुढे नेण्याची तयारी चालवली आहे. त्यामुळे ‘पवार विरुद्ध पवार’ असे चित्र निर्माण झाले आहे; अर्थातच ते पवार घराण्यातील पहिलेच बंड नाही आणि व्यक्तिगत पातळीवरचे तर नाहीच नाही.

    विशेष हेच की पवार घराण्यात पहिल्यांदा बंडाचा झेंडा फडकविणाऱ्या शरद पवार यांनाच पवार घराण्यातला या दुसऱ्या बंडाचा सामना करावा लागतो आहे. अजित पवार यांचे बंड पवार ‘एन्जॉय’ करत आहेत, असं भासलं ते कदाचित यामुळेच. अजित पवार यांचा हा पवित्रा किती काळ टिकतो ते भविष्यात समजेल.

    बाकी आव्हाड-अमोल कोल्हे आदींनी चालवलेली ‘आमचा बाप’ वगैरे उथळ पोपटपंची ही केवळ आणि केवळ त्यांच्या अस्तित्वासाठीची आहे. त्यात काका-पुतण्यांमध्ये असणारी परिपक्वता तीळभरही नाही. शिंदे-फडणवीस सरकार बरोबर अजित दादा चोरून आलेले नाहीत. शरद पवार-सुप्रिया सुळे यांना पूर्ण कल्पना देऊनच त्यांनी शपथविधीसाठी राजभवनाकडे प्रस्थान ठेवले. 2024 च्या लोकसभा निवडणुकीनंतर आणि विधानसभा निवडणुकीपर्यंत काका-पुतणे पुन्हा एक झाले तर आश्चर्य वाटणार नाही. कारण राजकीय भूमिका आणि कुटुंब यात गल्लत न करण्याची पवार घराण्याची आजवरची रीत आहे.

    @सुकृत करंदीकर,
    ४ जुलै, २०२४,
    मंगळवार, पुणे.

    Rebellion in the Pawar Family – Season Two

    महत्वाच्या बातम्या

     

    Related posts

    Thackeray -Pawar : ऐक्य + बैठकांच्या कोरड्या बातम्या; प्रत्यक्षात भाजप प्रणित सरकारला धक्का लावता येत नसल्याच्या निराशा!!

    Gold : सोन्याने नवा विक्रम केला प्रस्थापित, पहिल्यांदाच किंमत ९७ हजारांच्या जवळ पोहोचली

    अविश्वास ठरावाला तोंड देण्यापूर्वीच कर्जत जामखेड मध्ये रोहित पवार समर्थक नगराध्यक्षांचा राजीनामा; रोहित पवारांनी नगरपंचायतीची गमावली सत्ता!!