नाशिक : अदानी आणि मोदींचे मास्क लावून आणि त्यांची नावे टी-शर्ट वर छापून संसदेच्या अधिवेशनात पंतप्रधान नरेंद्र मोदींना घेरायला निघालेल्या राहुल गांधींपुढे आता वेगळेच आव्हान उभे राहिले आहे. त्यामुळे मोदींना घेरायचे बाजूला ठेवून आपले INDI आघाडीतले नेतृत्व सावरून धरण्यासाठी त्यांना धडपड करावी लागत आहे.
गौतम अदानी आणि मोदी या मुद्द्यावर राहुल गांधी एका बाजूला, तर ममता बॅनर्जी, शरद पवार, लालूप्रसाद यादव, अखिलेश यादव दुसऱ्या बाजूला, अशी INDI आघाडीतली राजकीय फेरमांडणी झाल्यावर लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधींची अडचण झाली. आपल्याला अधिकृतपणे लोकसभेतले विरोधी पक्षनेते पद मिळाल्याने आपण आता विरोधकांचे एकमुखी नेतृत्व बनलो, असा खुद्द राहुल गांधींचा आणि काँग्रेस पक्षाचा समज झाला. त्यामुळे काँग्रेसच्या अजेंड्यावर बाकीचे विरोधी पक्ष चालतील, असे त्यांना वाटायला लागले, पण तेवढ्यात हरियाणा आणि महाराष्ट्र विधानसभांच्या निवडणुकांची माशी अशी काही शिंकली की त्या शिंकेच्या जोराने राहुल गांधींच्या INDI आघाडीतल्या नेतृत्वाच्या खुर्चीलाच हादरा बसला.
सुरुवातीला ममता बॅनर्जी यांनी राहुल गांधींनी विरुद्ध बंड पुकारले. त्या पाठोपाठ शरद पवार, लालूप्रसाद यादव, अखिलेश यादव यांच्या पक्षांनी ममतांच्या पाठीशी आपले बळ उभे केले. त्यामुळे काँग्रेसने राहुल गांधींच्या विरोधी पक्षनेते म्हणून उभ्या केलेल्या प्रतिमेचा सगळा डोलाराच कोसळला.
राहुल गांधींनी आज काँग्रेसच्या 99 खासदारांची बैठक घेतली. लोकसभेत सरकारविरुद्ध लढायची स्ट्रॅटेजी ठरवली, पण हे सगळे होत असताना लालूप्रसादांनी पाटण्यातून त्यांच्यावर राजकीय बॉम्ब टाकला. INDI आघाडीचे नेतृत्व काँग्रेसने ममता बॅनर्जींकडे व्हावे सोपवावे, असे आवाहन लालूंनी काँग्रेस पक्षाला केले. त्याचे संसदेत पडसाद उमटले. काँग्रेसनिष्ठ पक्षांची प्रतिक्रिया व्यक्त करताना भंबेरी उडाली. अजून आमच्या पक्षाची अधिकृत भूमिका ठरायची आहे, असे झारखंड मुक्ती मोर्चाच्या खासदार महुआ मांझी म्हणाल्या. काँग्रेस खासदारांनी तर यावर पूर्णपणे चुप्पी साधली.
पण दुसरीकडे ममता बॅनर्जींनी अत्यंत चलाखीने दोन आघाड्यांवर काम सुरू ठेवले. एकीकडे बांगलादेशातील हिंदूंवरच्या अत्याचारांबद्दल पश्चिम बंगाल विधानसभेत आवाज उठवला. केंद्रातल्या मोदी सरकारशी सुसंवादी भूमिका घेतली. अदानी मुद्दा महत्त्वाचा नाही असे सांगितले, त्याच वेळी बाकीच्या मुद्द्यांवर मात्र मोदी सरकारला ठोकून काढले. त्यामुळे आंतरराष्ट्रीय प्रश्नांवर केंद्र सरकारच्या बाजूने राहण्याचे धोरण, तर अंतर्गत बाबींमध्ये विरोध करण्याचे धोरण अशी तारेवरची कसरत ममता बॅनर्जींनी साधली. त्यामुळे त्यांचे INDI आघाडीतले रेटिंग वाढले. या वाढलेल्या रेटिंग मुळेच राहुल गांधींच्या उभरत्या विरोधी पक्ष नेतृत्वावर ठळक प्रश्नचिन्ह लागले.
आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताची प्रतिमा टिकवण्यासाठी सरकारच्या बाजूने भूमिका घेणे आणि अंतर्गत धोरणांबद्दल सरकारला घेरत राहाणे, ही राजकीय कसरत राहुल गांधींना कधी जमली नाही. त्यात ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वापुढे राहुल गांधींचे नेतृत्व फारच फिके पडले. त्यामुळेINDI आघाडीतले नेतृत्व आपल्या हातातून निसटले तर पुढे काय करायचे??, या प्रश्नाचे उत्तर राहुल गांधी आणि काँग्रेसला शोधावे लागत आहे.
Rahul Gandhi fight to sustain his leadership of INDI alliance
महत्वाच्या बातम्या
- Bharat Todo : भारत तोडो’च्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीयत्व बळकट करण्याची गरज; अविनाश धर्माधिकारी यांचे प्रतिपादन
- मुंबईतील कुर्ला येथे भीषण अपघात, बेस्ट बसने 30 जणांना चिरडले, 4 जणांचा मृत्यू
- Eknath Shinde तुफान टोलेबाजी अन् एकनाथ शिंदे यांनी यासाठी मानले नाना पटोले यांचे आभार
- ED विकणार ६००० कोटींची जप्त मालमत्ता