वृत्तसंस्था
नागपूर : देशाचा फाळणीचा इतिहास हा कटू इतिहास आहे. तो विसरता येणार नाही. उलट देशाची एकात्मता आणि अखंडता पुन्हा मिळवण्यासाठी तो इतिहास तरुणांनी आणि नव्या पिढीने वाचला पाहिजे. आत्मसात करून पुढे गेले पाहिजे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी आज केले. Partition of the country is a sad history, the truth of this history should be faced, to bring back the lost integrity and unity, the new generation should know that history: RSS chief Mohan Bhagwat in Nagpur, Maharashtra
विजयादशमीच्या मुहूर्तावर संघाचे पारंपरिक शास्त्र पूजन सरसंघचालकांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते. डॉ. मोहन भागवत यांनी स्वतंत्र अखंड भारताची विस्तृत संकल्पना मांडली. आपला प्रवास स्वाधीनतेपर्यंत झाला आहे. पण स्वाधीनता ते स्वतंत्रता असा मोठा पल्ला अद्याप आपल्याला गाठायचा आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले. या देशाची संस्कृती, परंपरा, इतिहास यांच्या बदनामीचे अखंड प्रयत्न सुरू आहे. या परंपरा आणि इतिहासातून प्रेरणादायी घटना प्रसंग पुसण्याचा वर्षानुवर्षांचा प्रयत्न आहे. तरी देखील सत्य पुन्हा पुन्हा उद्भवत राहते आणि इतिहासातून आपल्याला प्रेरणा मिळत राहतात, असे सांगून डॉ. मोहन भागवत म्हणाले, की देशाचा फाळणीचा इतिहास हा कटू आहे. परंतु तरुणांनी तो वाचला पाहिजे.
आत्मसात केला पाहिजे. नेमक्या कोणत्या चुका झाल्या याचे परिशीलन केले पाहिजे. त्यातून धडा घेऊन आपल्या देशाची एकात्मता आणि अखंडता पुन्हा प्राप्त करण्यासाठी अखंड लढा दिला पाहिजे. आपल्या संस्कृती, परंपरा आणि इतिहासातून मिळणारा ठेवा जपून तो वर्धिष्णू केला पाहिजे.
ओटीटी प्लॅटफॉर्मवर काय दाखवले जाते, त्यावर कोणाचेही नियंत्रण नाही. देशातली संस्कारक्षम पिढी संपवण्याचा हा प्रकार आहे. ड्रग्सचे व्यसन समाजाच्या सर्व स्तरांमध्ये वाढते आहे. त्यावर नियंत्रण नाही. बिटकॉइन सारख्या कोणत्या देशाचे नियंत्रण आहे हे माहिती नाही. ड्रग्सच्या व्यापारातून येणारा पैसा हा राष्ट्रविरोधी शक्तींच्या हातात जातो. त्याचा देशाच्या विरोधात वापर केला जातो या सर्व गोष्टी सरकारने नियंत्रणात आणल्या पाहिजेत. सरकार आपले काम करते आहे. पण त्यापूर्वी समाजाने आपले मन तयार करून त्याला ब्रेक लावला पाहिजे, अशी अपेक्षा डॉ. मोहन भागवत यांनी व्यक्त केली.