विशेष प्रतिनिधी
मुंबई – निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझेंनी लेटरबाँम्बमध्ये राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर केलेल्या आरोपांना उत्तर देण्याऐवजी राष्ट्रवादीचे मंत्री आणि नेते कोरोना लसपुरवठ्यावरून केंद्र सरकारवर टीकेची झोड उठविण्यासाठी एकवटले आहेत. NCP leaders unite against central govt over corona vaccine issue
काँग्रेसच्या राजवटीच्या काळात केंद्रावर महाराष्ट्रातून होणारा राजकीय आकसाचा आरोप राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केला आहे. तसेच राज्याचे माजी आरोग्य संचालक डॉ. सुभाष साळुंके यांनीही केंद्रावरच निशाणा साधला आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी काल प्रसारित केलेल्या पत्रकातून फक्त महाराष्ट्राविषयीचा द्वेष प्रतीत होत आहे. केवळ महाराष्ट्रात विरोधी विचारांचे सरकार असल्याने महाराष्ट्राला सहकार्य न करण्याची दिल्लीची भूमिका दिसत आहे, असा आरोप जयंत पाटील यांनी केला आहे.
कदाचित केंद्रीय आरोग्यमंत्र्यांना महाराष्ट्राची पूर्ण माहिती नाही किंवा त्यांना अपूर्ण माहिती दिली गेली. महाराष्ट्राची लोकसंख्या, रुग्ण संख्या, किती लसी उपलब्ध झाल्या या प्रश्नांची शहानिशा करण्याआधी परिपत्रक काढून राज्याला बदनाम करण्याचे प्रयत्न केले जात आहेत का?” अशी शंका जयंत पाटील यांनी व्यक्त केली आहे.
महाराष्ट्रात सध्या अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ४.५ लाख आहे. मृतांची संख्या ५७ हजार, एकूण बाधितांची संख्या ३० लाख आहे. अशी परिस्थिती असताना आम्हाला फक्त ७.५ लाख लसी का?” असा सवाल राजेश टोपे यांनी केला आहे. सर्व पद्धतीने केंद्राशी समन्वय ठेवला जात आहे. ७ दिवसाला ४० लाख लसीचे डोस लागतातच. त्यामुळे आठवड्याला ४० लाख आणि महिन्याला १ कोटी ६० लाख डोस मिळायला हवेत. तरच राज्यातली लसीकरण मोहीम व्यवस्थित सुरू राहू शकेल, असे टोपे यांनी सांगितले.
-बंगाल, उत्तर प्रदेशात कोरोना पेटेल
महाराष्ट्रात करोना पेटला म्हणून आज काही लोक टाळ्या पिटत आहेत. पण एप्रिलनंतर राज्यातील करोना कमी होईल आणि पश्चिम बंगालसह निवडणुका असलेली पाच राज्य तसेच उत्तर प्रदेशमध्ये करोना पेट घेईल तेव्हा आज महाराष्ट्रावर टीका करणारी मंडळी काय करतील? असा सवाल राज्याचे माजी आरोग्य महासंचालक व राज्याचे प्रमुख कोरोना सल्लागार डॉ. सुभाष साळुंखे यांनी केला आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांना मी १९९५ पासून ओळखतो, सांगून डॉ साळुंखे म्हणाले, की तेव्हा पोलिओ निर्मूलनासाठी त्यांनी चांगले काम केले होते. जागतिक आरोग्य संघटनेतही त्यांनी माझ्याबरोबर काम केले आहे. त्यांना देशातील आरोग्य व्यवस्थेची पूर्ण जाण असतानाही त्यांनी काल जी महाराष्ट्राच्या आरोग्य सेवेवर टीका केली ती दुर्दैवी असून निव्वळ राजकीय हेतूने केली आहे हे मी जबाबदारीने सांगतो.