• Download App
    CM Fadnavis महाराष्ट्रात पावसाचे थैमान; हवामान तीव्रता 3 दिवसांपर्यंत कायम राहण्याचा अंदाज; नाशिकमध्ये उद्या ढगफुटीची शक्यता, CM फडणवीसांनी घेतला आढावा

    CM Fadnavis : महाराष्ट्रात पावसाचे थैमान; हवामान तीव्रता 3 दिवसांपर्यंत कायम राहण्याचा अंदाज; नाशिकमध्ये उद्या ढगफुटीची शक्यता, CM फडणवीसांनी घेतला आढावा

    CM Fadnavis

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : CM Fadnavis मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर आज विधानसभेचे कामकाज तातडीने स्थगित करण्यात आले आहे. हवामानाच्या अत्यंत गंभीर आणि रौद्र परिस्थितीची दखल घेत हा निर्णय घेण्यात आला. सभागृहाचे कामकाज सुरू झाल्यानंतर मुंबईतील विविध दुर्घटनांवरून विरोधक आक्रमक झाले होते. विरोधकांच्या भूमिकेवर बोलताना राजकीय आकडेवारीपेक्षा संवेदनशीलता महत्त्वाची असल्याचे उद्या पूर्ण निवेदन देणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.CM Fadnavis

    याचबरोबर “आज दुपारनंतर वाऱ्याचा वेग प्रचंड वाढणार असून ताशी ७० ते ९० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये,” असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी सभागृहात केले आहे. दुसरीकडे हवामानाची तीव्रता येत्या 3 दिवसांपर्यंत कायम राहण्याचा अंदाज आहे, तर नाशिकमध्ये उद्या ढगफुटीची शक्यता वर्तवण्यात आलीय.CM Fadnavis



    समुद्राला भरती येण्याची शक्यता

    राज्यातील पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा आढावा मुख्यमंत्री फडणवीस यांनी राज्य आपत्ती नियंत्रण कक्षामध्ये आयोजित बैठकीत घेतला. यावेळी आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन उपस्थित होते. मुंबईसह किनारी भागातील जिल्ह्यात वाऱ्याचा ताशी वेग ५० ते ७० किलोमीटर प्रति तास असण्याची शक्यता आहे. यासोबतच आज दुपारी ३ ते ४.३० वाजेदरम्यान समुद्राला भरती येण्याची शक्यताही आहे. या पार्श्वभूमीवर सर्व संबंधित यंत्रणांनी २४ बाय ७ अलर्ट मोडवर राहून आपत्कालीन परिस्थिती आल्यास तातडीने मदत कार्य करावे, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे.

    नागरिकांना तातडीने मदत मिळेल

    राज्यभरात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असल्याने आज आणि उद्या अत्यावश्यक काम असल्याशिवाय नागरिकांनी घराबाहेर पडू नये, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले. हवामान विभागाच्या अंदाजानुसार मुंबई आणि किनारी भागात सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस अपेक्षित आहेत. अपेक्षित उच्च भरतीच्या पार्श्वभूमीवर राज्य आपत्ती प्रतिसाद दल व राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल यांना ‘अलर्ट मोड’वर ठेवण्यात आले आहेत. पुराची परिस्थिती निर्माण झाल्यास तातडीने ‘एसडीआरएफ’ आणि ‘एनडीआरएफ’ ची पथके रवाना करण्यात यावी. आपत्कालीन परिस्थितीमध्ये नागरिकांना तातडीने मदत मिळेल, याची काळजी घ्यावी, असे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिले.

    हवामान तीव्रता 8 जुलैपर्यंत कायम

    येत्या तीन दिवसांत, म्हणजे ८ जुलैच्या रात्रीपर्यंत, हवामानाची तीव्रता कायम राहण्याचा अंदाज आहे. सर्व जिल्हा प्रशासनाने सतर्क रहावे. दरम्यान, भूस्खलनाच्या घटनाही समोर आल्या आहेत. मुंबई–पुणे द्रुतगती मार्गावरही मोठ्या प्रमाणावर भूस्खलन होऊन मोठ्या प्रमाणात माती व दगड रस्त्यावर आले आहेत. संबंधित यंत्रणा मार्ग मोकळा करून वाहतूक पूर्ववत करण्यासाठी युद्ध पातळीवर काम करावे, अशा सूचनाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिल्या. अशा परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून नागरिकांनी ‘वर्क फ्रॉम होम’चा अवलंब करावा. खाजगी आस्थापनांनी मानवतेच्या दृष्टिकोनातून कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम जे सवलत द्यावी. असे न करणाऱ्या आस्थापनांवर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिला.

    शासकीय कार्यालयांना अर्ध्या दिवसाची सुटी, खाजगी कंपन्यांना ‘वर्क फ्रॉम होम’चे आदेश

    भारतीय हवामान विभागाने (IMD) मुंबई महानगर क्षेत्रासाठी अतिवृष्टीचा इशारा (Red Alert) जारी केला आहे. मुंबईत ताशी 80 ते 90 किलोमीटर वेगाने वादळी वारे वाहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर, राज्यातील बदलती परिस्थिती आणि हवामानाचा अंदाज लक्षात घेऊन मुख्यमंत्री आणि राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष यांनी शासकीय व खाजगी कार्यालयांबाबत अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

    महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने आज, 06 जुलै 2026 रोजी या संदर्भातील अधिकृत परिपत्रक जारी केले आहे.

    मुख्य निर्णय आणि अटी

    मंत्रालय आणि बृहन्मुंबईतील सर्व शासकीय कार्यालयांमधील अधिकारी व कर्मचाऱ्यांना आज (सोमवार, 6 जुलै) अर्ध्या दिवसानंतर कार्यालय सोडण्याची परवानगी देण्यात आली आहे. शासनाच्या अत्यावश्यक सेवांशी संबंधित विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांबाबत संबंधित विभाग प्रमुख किंवा कार्यालय प्रमुख अंतिम निर्णय घेतील. ज्या कार्यालयांमध्ये अत्यंत तातडीची किंवा कालमर्यादित कामे सुरू आहेत, ती पूर्ण करण्यासाठी जबाबदार अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीबाबतचे निर्णय त्यांचे विभाग प्रमुख घेतील.

    खाजगी कार्यालयांना ‘वर्क फ्रॉम होम’

    मुंबईतील वाढते वादळ आणि पाऊस लक्षात घेता, सर्व खाजगी कार्यालयांनी आपल्या कर्मचाऱ्यांना ‘वर्क फ्रॉम होम’ (घरून काम) करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मुंबई आणि आसपासच्या परिसरातील नागरिकांनी हवामानाचा अंदाज घेऊनच बाहेर पडावे आणि प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे. हे परिपत्रक महाराष्ट्र शासनाचे प्रधान सचिव (डॉ. अतुल पाटणे) यांच्या डिजिटल स्वाक्षरीने प्रसिद्ध करण्यात आले आहे.

    मुंबई-पुणे एक्सप्रेसवे आणि राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक विस्कळीत

    मुंबई आणि पुणे या दोन्ही महत्त्वाच्या शहरांना जोडणाऱ्या मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्ग तसेच यशवंतराव चव्हाण मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील (Expressway) वाहतूक सध्या विस्कळीत झाली आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून वाहनचालक आणि प्रवाशांसाठी अत्यंत महत्त्वाची सूचना जारी करण्यात आली आहे. प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्ग आणि द्रुतगती मार्ग पूर्ववत सुरू करण्यासाठी सध्या युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. हा मार्ग वाहतुकीसाठी पूर्णपणे सुरक्षित आणि सुरळीत होताच, तसेच वाहतुकीबाबत कोणताही नवीन निर्णय झाल्यास त्याची माहिती तात्काळ नागरिकांना अधिकृत माध्यमांतून कळविण्यात येईल, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

    नागरिकांना महत्वाच्या सूचना

    पुढील सूचना मिळेपर्यंत नागरिकांनी पुणे-मुंबई किंवा मुंबई-पुणे असा प्रवास करणे पूर्णपणे टाळावे. जर प्रवास करणे अत्यंत आवश्यक असेल, तर प्रशासनाकडून वेळोवेळी जारी करण्यात येणाऱ्या वाहतूकविषयक सूचना आणि अद्ययावत (Latest) माहितीची खात्री करूनच घराबाहेर पडावे. संभाव्य धोका किंवा वाहतूक कोंडी टाळण्यासाठी नागरिकांनी प्रशासनाला पूर्ण सहकार्य करावे, अशी विनंती करण्यात आली आहे. “सुरक्षित प्रवास करा | नियमांचे पालन करा.” प्रवाशांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता केवळ अधिकृत माहितीचा आधार घ्यावा, असे आवाहनही करण्यात आले आहे.

    उद्या नाशिकला इशारा

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यभरातल्या पावसाचा आढावा घेतला. त्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. फडणवीस यांनी उद्या नाशिकमध्ये जोरदार पाऊस होण्याची शक्यता वर्तवली. नाशिक-त्र्यंबकेश्वर भागात ढगफुटी होण्याची भीती आहे. या ठिकाणी 300 मिमी पाऊस होऊ शकतो. नाशिक परिसरातही जोरदार पावसाची शक्यता आहे. यावर प्रशासनाची करडी नजर असेल. तसेच जिल्हा प्रशासनाने सर्व तयारी केल्याचेही त्यांनी सांगितले.

    मुंबईत दोन दिवसांत १२ बळी; विरोधक आक्रमक

    सभागृहाचे कामकाज सुरू होताच काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी मुंबईतील गंभीर पूरपरिस्थिती आणि अपघातांवरून सरकारला घेरले. “मुंबईत मॅनहोलमध्ये पडून, झाडे कोसळून तसेच मानखुर्द येथील इमारत कोसळून गेल्या दोन दिवसांत १२ निष्पाप नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे,” असे वडेट्टीवार म्हणाले. सरकारने या संपूर्ण परिस्थितीवर तातडीने अधिकृत निवेदन द्यावे, तसेच या सर्व दुर्घटनांची उच्चस्तरीय चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी लावून धरली.

    मुंबईत दरवर्षी ८०० झाडे पडतात, काल एकाच दिवसात ३५० पडली

    विरोधकांच्या मागण्यांना उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परिस्थितीचे गांभीर्य स्पष्ट केले. ते म्हणाले, “सध्या निसर्गाच्या माध्यमातून अत्यंत अभूतपूर्व अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. काल ताशी ५० किमी वेगाने वारे वाहत होते. मुंबईत संपूर्ण पावसाळ्यात सरासरी ८०० झाडे पडतात, पण काल एकाच दिवसात ३५० झाडे कोसळली. आजचा दिवस त्याहूनही गंभीर आहे. दुपारनंतर वाऱ्याचा वेग ७० ते ९० किलोमीटर प्रतितास होणार असल्याने आम्ही सर्वांना ‘वर्क फ्रॉम होम’ करण्याची विनंती केली आहे.”

    मानखुर्द दुर्घटनेबाबत बोलताना ते म्हणाले की, “ती इमारत पूर्णपणे बेकायदेशीर होती. ती शेजारील झोपडीवर कोसळल्याने लोक दगावले. आमचे मंत्री गिरीश महाजन रात्री १ वाजता स्वतः घटनास्थळी उपस्थित होते. दुर्घटना टाळण्यासाठी आम्ही पूर्ण खबरदारी घेत आहोत.”

    मुंबई-पुणे मार्ग आणि ‘मिसिंग लिंक’वरील परिस्थिती

    मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील दरडींबाबत बोलताना मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, “आपली आपत्ती व्यवस्थापनाची संपूर्ण यंत्रणा रस्त्यावर उतरून काम करत आहे. मिसिंग लिंकवर दरड कोसळताच आम्ही तात्काळ वाहतूक बंद करून ती सुरक्षित मार्गावर वळवली आहे. दोन्ही बाजूंच्या प्रवाशांना आधीच सूचना दिल्या गेल्याने तिथे लोक अडकल्याची परिस्थिती नाही. ररस्त्यावरील पाणी आणि अडकलेल्या छोट्या गाड्या बाहेर काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.”

    ते पुढे म्हणाले, “या मुद्द्यावर आज अर्धवट माहिती देण्याऐवजी, उद्या (मंगळवारी) मी सभागृहात या संपूर्ण परिस्थितीवर सविस्तर आणि अधिकृत निवेदन सादर करेन.”

    युवकांना पर्यटनाला न जाण्याचे आवाहन

    मुख्यमंत्र्यांनी नागरिकांना आवाहन केले की, अतिवृष्टीच्या काळात पत्रे उडून जाण्याचा किंवा झाडे पडण्याचा मोठा धोका असतो. त्यामुळे अत्यंत आवश्यक काम असल्याशिवाय प्रवास टाळावा. विशेषतः तरुण वर्गाने अशा वादळी वातावरणात पर्यटन स्थळांवर जाणे टाळावे.

    Assembly Suspended Amid Maharashtra Rain Fury; CM Fadnavis Takes Stock

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Satara : साताऱ्यात पूल कोसळला, क्रेनने गाड्या बाहेर काढल्या:मुंबईत रेल्वे ट्रॅक, एक्सप्रेस-वे बंद; घरात राहण्याचा सल्ला; जम्मू-काश्मीरमध्ये भूस्खलन

    नाशिक जिल्ह्यात उद्या ढगफुटीचा इशारा; शाळा, महाविद्यालये आणि ग्रामीण आठवडे बाजार बंद!!; प्रशासन हाय अलर्ट मोडवर!!

    Lohagad Murder Case : सियाने केतनचा खून करण्यासाठी केली राजा रघुवंशी प्रकरणाची स्टडी; सर्च हिस्ट्रीतून रहस्य उघड; हेही विचारले- पोलिस कोठडीत महिलेला मारहाण होते का?