विशेष प्रतिनिधी
मुंबई : Devendra Fadnavis राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 56 व्या वाढदिवसानिमित्त त्यांच्यावर विविध स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. मात्र, या सर्व शुभेच्छांमध्ये सर्वाधिक लक्ष वेधून घेतले ते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या कौतुकाने. देवेंद्र फडणवीस हे अतिशय हुशार राजकारणी असून भविष्यात त्यांना केंद्रात मोठी जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे, असे उद्धव ठाकरे म्हणालेत. देवेंद्र फडणवीसांची प्रतिमा ही एक गतिमान, अभ्यासू आणि पक्षनिष्ठ राजकारणी अशा शब्दांत ठाकरेंनी स्तुती केली.Devendra Fadnavis
गिरीश महाजन यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या ‘महाराष्ट्र नायक’ या विशेष कॉफी टेबल बुकमध्ये शरद पवार, नितीन गडकरी, उद्धव ठाकरे यांसह अनेकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजकीय प्रवासाचे आणि कामगिरीचे कौतुक केले आहे.Devendra Fadnavis
शरद पवारांकडूनही मुक्तकंठाने स्तुती
ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी देखील या निमित्ताने फडणवीस यांची मुक्तकंठाने स्तुती केली आहे. देवेंद्र फडणवीसांच्या कार्याची गती अफाट आहे. त्यांना पाहून मला माझा मुख्यमंत्रीपदाचा पहिला कार्यकाळ आठवतो, अशा शब्दांत शरद पवारांनी देवेंद्र फडणवीसांचे कौतुक केले आहे.
नेमके काय म्हणाले उद्धव ठाकरे?
महाराष्ट्राच्या राजकारणात गंगाधरराव फडणवीस यांनी एक आदर्श राजकारणी म्हणून आपली प्रतिमा निर्माण केली होती. हा वारसा अतिशय मेहनतीने आणि समर्थपणे चालवण्याचे कार्य देवेंद्र गंगाधरराव फडणवीस करत आहेत. देवेंद्र आज महाराष्ट्राचे तिसऱ्यांदा मुख्यमंत्री झाले आहेत. त्यांच्या पहिल्या कार्यकाळात म्हणजे 2014 ते 2019 दरम्यान आम्ही त्यांच्या सोबत होतो. त्यामुळे त्यांची विषय समजून घेण्याची जिद्द, प्रश्न सोडवण्याची तळमळ आणि राज्याला न्याय देण्याचा प्रयत्न जवळून पाहता आला. नंतरच्या काळात त्यांची विरोधी पक्षनेता म्हणून काम करण्याची धडपडही जवळून पाहता आली. देवेंद्रजी एक हुशार आणि प्रामाणिक राजकारणी आहेत, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.
ते पुढे म्हणाले, फडणवीस यांनी वयाच्या अवघ्या 22 व्या वर्षी नागपूर महानगरपालिकेत नगरसेवक म्हणून प्रवेश केला आणि वयाच्या 27 व्या वर्षी ते नागपूरचे सर्वात तरुण महापौर बनले. ही उपलब्धी त्यांच्याप्रारंभिक काळातील धडाडी आणि नेतृत्वक्षमतेची साक्ष देते. त्यांचा अभ्यासू स्वभाव आणि कायदेशीर, आर्थिक तसेच प्रशासकीय विषयांवरील सखोल ज्ञान त्यांना भाजपातील इतर सदस्यांपासून वेगळे ठरवते. त्यांनी कायद्याची पदवी, व्यवसाय व्यवस्थापनात पदव्युत्तर पदवी आणि बर्लिनमधून प्रकल्प व्यवस्थापनात डिप्लोमा मिळवला आहे.
फडणवीसांकडून राजकीय कारकीर्दीला सांस्कृतिक-सामाजिक जोड
उद्धव ठाकरे म्हणाले की, त्यांचे पुस्तक ‘अर्थसंकल्प सोप्या भाषेत’ हे त्यांच्या जटिल विषयांना साध्या भाषेत मांडण्याच्या क्षमतेचे द्योतक आहे. फडणवीस यांनी नेहमीच सर्वसामान्य नागरिकांना केंद्रस्थानी ठेवून काम केले. नझूल जमिनीच्या नूतनीकरणासारख्या प्रश्नांवर त्यांनी तीव्र लढा दिला आणि कामगार, झोपडपट्टीवासीय यांच्या हक्कांसाठी आवाज उठवला. 2014 मध्ये वयाच्या 44 व्या वर्षी ते महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री बनले. फडणवीस यांनी राजकीय कारकीर्दीला सांस्कृतिक आणि सामाजिक जोड दिली.
स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण केली
ठाकरे म्हणाले, देवेंद्र फडणवीसांनी मराठी पुस्तके लिहिली, ज्यामध्ये सामाजिक आणि आर्थिक विषयांचा समावेश आहे. त्यांच्या वडिलांना आणीबाणीच्या काळात तुरुंगवास भोगावा लागला होता, ज्यामुळे त्यांच्यावर राजकीय संस्कार खोलवर झाले. या पार्श्वभूमीवरही त्यांनी स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण केली. फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारशाला चालना देण्यासाठी विविध उपक्रमांना पाठिंबा दिला. त्यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना भाजपा युती सरकारने मराठी चित्रपट, नाट्य आणि लोककलांना प्रोत्साहन देण्यासाठी धोरणे राबवली.
अभ्यासू आणि मुत्सद्दी स्वभावाने आव्हानांचा सामना
देवेंद्र फडणवीस यांना राजकीय कारकीर्दीत अनेकदा विविध विषयांमुळे अडचणींचा सामना करावा लागला. तरीही, त्यांनी आपल्या अभ्यासू आणि मुत्सद्दी स्वभावाने या आव्हानांचा सामना केला आहे. फडणवीस यांच्या 2014-2019 च्या कार्यकाळात महाराष्ट्राने औद्योगिक आणि आर्थिक प्रगती केली. ‘मेक इन महाराष्ट्र’ आणि ‘मॅग्नेटिक महाराष्ट्र’ सारख्या योजना त्यांच्या नेतृत्वाखाली राबवल्या गेल्या, ज्यामुळे त्यांच्या पक्षात त्यांची विश्वासार्हता वाढली.
भविष्यात केंद्रात मोठी संधी मिळणार
फडणवीस यांना भविष्यात राष्ट्रीय पातळीवर महत्त्वाची जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे, कारण त्यांचा अभ्यासू स्वभाव आणि प्रशासकीय कौशल्य पक्षाला उपयुक्त ठरेल. देवेंद्र फडणवीस यांची भाजपमधील प्रतिमा ही एक गतिमान, अभ्यासू, आणि पक्षनिष्ठ नेते अशी आहे. महाराष्ट्रात पक्षाला मजबूत करण्यात त्यांना यश मिळाले आहे. त्यांचे आर्थिक आणि सामाजिक धोरणांचे यश, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी असलेली जवळीक आणि केंद्रीय नेतृत्वाचा पाठिंबा यामुळे त्यांचे स्थान दृढ आहे. भविष्यात त्यांना देशाच्या राजकारणात आणि त्यांच्या मनातील योजनांत यश मिळो, ही मनःपूर्वक शुभेच्छा!
Devendra Fadnavis Thackeray Praise Sharad Pawar Work Speed
महत्वाच्या बातम्या
- Sharad Pawar शरद पवारांकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बुद्धीचातुर्याचे आणि कार्यक्षमतेचे कौतुक
- जगदीप धनखड यांच्या राजीनाम्यानंतर अनेकांना सत्यपाल मलिकांची झाली आठवण; पण कुणालाही नाही आठवले मधू लिमये!!
- CoinDCX : CoinDCX वर सायबर हल्ला: 380 कोटींची चोरी, क्रिप्टो गुंतवणुकीतील धोक्यांवर पुन्हा प्रश्नचिन्ह
- ED Summons : सिद्धरामय्यांच्या पत्नीच्या खटल्यात ईडीचे अपील फेटाळले; सुप्रीम कोर्टाचा सवाल- राजकीय लढायांसाठी ईडीचा वापर का केला जातोय?