• Download App
    Rashtra Sevika Samiti विजयघोष २०२६ : घोषवादन हा सज्जनशक्तीच्या आत्मविश्वासाचा हुंकार; राष्ट्रसेविका समितीच्या ९० व्या वर्षानिमित्त पश्चिम महाराष्ट्र प्रांतात सोहळा

    विजयघोष २०२६ : घोषवादन हा सज्जनशक्तीच्या आत्मविश्वासाचा हुंकार; राष्ट्रसेविका समितीच्या ९० व्या वर्षानिमित्त पश्चिम महाराष्ट्र प्रांतात सोहळा

    विशेष प्रतिनिधी

    पुणे : नियम पाळले नाहीत तर स्वर कर्कश होतात, तसेच जीवनात शिस्त आणि समन्वय नसेल तर विसंवाद निर्माण होतो. घोषवादन आपल्याला निरीक्षण, समन्वय, त्याग आणि सामूहिकता शिकवणारे एक प्रभावी साधन आहे. आजच्या या सम्यक वादनातून सेविकांनी पूर्णत्वाचा ध्यास प्रकट केला. हे घोषवादन सज्जनशक्तीच्या आत्मविश्वासाचा हुंकार आहे, असे प्रतिपादन राष्ट्रसेविका समितीच्या प्रमुख संचालिका शांताक्काजी यांनी केले. Rashtra Sevika Samiti

    राष्ट्रसेविका समितीच्या स्थापनेला ९० वर्षे पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने पश्चिम महाराष्ट्र प्रांतात आयोजित ‘विजयघोष २०२६’ या विशेष घोषवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. विमाननगर येथील सिम्बॉयसिस महाविद्यालयाच्या मैदानावर झालेल्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या. १ मे २०२६ रोजी पुणे येथे 2 तर अहिल्यानगर आणि कोल्हापूर येथे प्रत्येकी एक अशा चार ठिकाणी एकाच वेळी, एकाच क्रमाने हे शिस्तबद्ध सादरीकरण झाले.

    आपल्या मनोगतात शांताक्का यांनी बुद्ध पौर्णिमेचा संदर्भ देत पूर्णत्वाचा संदेश दिला. त्या म्हणाल्या की, भगवा ध्वज आणि भारत माता यांच्या चरणी समर्पण केल्यावरच राष्ट्राचा विकास योग्य दिशेने होतो. व्यक्तिगत स्वार्थ बाजूला ठेवून आपल्यातील गुण आणि क्षमता राष्ट्रार्पण करण्याची वृत्ती सेविकांनी जोपासावी. समितीच्या ९० वर्षांच्या आणि संघाच्या शताब्दी वर्षाच्या निमित्ताने प्रत्येक शाखेने किमान ९० घरांमध्ये सकारात्मक परिवर्तन घडवण्याचा संकल्प करावा. ‘संकल्पित कुटुंब’ ‘सज्जन व्यक्तिमत्त्व’ आणि ‘जागृत राष्ट्रभक्त नागरिक’ हेच समर्थ भारताचे आधारस्तंभ आहेत.

    यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय कार्यकारिणी सदस्य सुहासराव हिरेमठ यांनी घोषाच्या शक्तीवर प्रकाश टाकला. ते म्हणाले, घोषामुळे केवळ शरीरात नव्हे तर मनातही जोश निर्माण होतो. संचलन हे मनं आणि पावलं एकत्र आणणारं माध्यम आहे. रामसेतू बांधताना खारीने जसा छोटासा वाटा उचलला, तसंच प्रत्येकाने आपल्या क्षमतेनुसार समाजासाठी योगदान द्यावे. समाज आणि राष्ट्रासाठी सक्रिय नागरिक म्हणून काम करणं हीच खरी देशभक्ती आहे. समाजात आज मुलींवरील अत्याचाराच्या घटना चिंताजनक आहेत. अशा वेळी आपण केवळ प्रेक्षक न राहता संघटित होऊन सुरक्षा आणि जागरूकतेचे वातावरण निर्माण केले पाहिजे. प्रत्येकाने वर्षाकाठी किमान १०० महिलांपर्यंत पोहोचून जागृतीचा संकल्प करावा.

    ‘विजयघोष’ उपक्रमांतर्गत पश्चिम महाराष्ट्र प्रांतातील २१ जिल्ह्यांमधील सेविकांनी एकाच वेळी घोषवादन सादर केले. पुण्यात सिंहगड, कात्रज, कसबा, पर्वती, येरवडा, विद्यापीठ, लष्कर, संभाजी या भागांतील सेविकांनी उत्कृष्ट सादरीकरण केले.

    – अहिल्यानगर मध्ये कार्यक्रम

    अहिल्यानगर येथे पार पडलेल्या सोहळ्यात प्रसिद्ध गायिका अपूर्वा निषाद आणि अखिल भारतीय सहघोष प्रमुख प्राची पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. प्राची पाटील यांनी ‘स्वार्थरहित आणि ज्ञानसहित’ कार्यकर्ता कसा घडतो, यावर मार्गदर्शन केले. त्या म्हणाल्या की, घोषवादनातील प्रत्येक लय आणि ताल हा जीवनातील अनुशासनाचे प्रतीक आहे. कंठस्थ झालेले राष्ट्रवादाचे विचार हृदयस्थ करण्याची हीच वेळ आहे.
    या सोहळ्याचे मुख्य आकर्षण म्हणजे सर्व शाखांचे ‘एकत्रित स्थिर वादन’. घोषदंडाच्या इशाऱ्यावर शेकडो सेविकांनी एकाच तालात केलेल्या हालचालींनी उपस्थितांची मने जिंकली. अहिल्यानगर येथे झालेल्या स्पर्धेत दक्षिण नगर जिल्ह्याने प्रथम, तर नाशिकने द्वितीय क्रमांक मिळविला.



    गीता परिवाराच्या अंजलीताई तापडिया यांनी ‘संघटित मातृशक्तीच देशाचा विकास करू शकते’ असा विश्वास यावेळी व्यक्त केला. पुण्यात न्यू इंग्लिश स्कूलच्या मैदानावर झालेल्या कार्यक्रमात समितीच्या अखिल भारतीय सहकार्यवाहिका अलका इनामदार यांनी समितीची भूमिका अत्यंत प्रभावीपणे मांडली. त्या म्हणाल्या की, विजयघोष हा ‘सेविका ते कार्यकर्ती’ या प्रवासाची खऱ्या अर्थाने सुरुवात आहे. घोषवादनासारख्या उपक्रमातून सेविकांमध्ये उपजत असलेल्या कौशल्यांचा विकास होतोच, पण त्यासोबतच शिस्त, एकाग्रता आणि संघभावना वृद्धिंगत होण्यास मदत होते, तर सुयोग कुंडलकर यांनी संगीतातील संवेदनशीलता आणि लयबद्धता जीवनात उतरवण्याचे आवाहन केले.

    – कोल्हापूरात कार्यक्रम

    कोल्हापूर विभागाचा ‘विजयघोष’ प्रायव्हेट हायस्कूलच्या मैदानावर अत्यंत दिमाखात पार पडला. या कार्यक्रमात सांगली, सातारा, कराड, सोलापूर, तसेच उत्तर व दक्षिण कोल्हापूर अशा ६ जिल्ह्यांतील घोषपथके सहभागी झाली होती. पांढऱ्या शुभ्र गणवेशातील सेविकांचे संचालन, त्यांचे नियोजन आणि वेळेचे तंतोतंत पालन यामुळे मैदानावर समितीच्या शिस्तीचे दर्शन घडले. प्रमुख पाहुणे ज्येष्ठ तबलावादक राजप्रसाद धर्माधिकारी यांनी सेविकांच्या मेहनतीचे कौतुक करताना, “घोष सादरीकरणातील लय आणि स्पष्टता उत्कृष्ट होती,” असे नमूद केले.

    प्रमुख वक्त्या राष्ट्र सेविका समितीच्या केंद्रीय कार्यकारिणी सदस्य भाग्यश्री साठ्ये यांनी घोष हे संघटनात्मक बांधणीचे एक प्रभावी माध्यम आहे. संगीताप्रमाणेच राष्ट्रकार्यातही ‘साधना’ महत्त्वाची असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या सोहळ्यासाठी उत्तर आणि दक्षिण कोल्हापूरच्या कार्यवाहिका गौरी मुजुमदार, अनघा नाईक आणि प्रज्ञा परांजपे यांच्यासह अनेक सेविकांनी अथक परिश्रम घेतले. गायत्री सुमंत यांनी प्रास्ताविक केले, तर ऐश्वर्या बेहेरे यांनी सूत्रसंचालन केले.अनघा नाईक यांनी आभार मानले

    १९३६ मध्ये वंदनीय मावशी केळकर यांनी लावलेल्या या रोपट्याचा आज वटवृक्ष झाला आहे. ‘विजयघोष २०२६’ च्या माध्यमातून समितीने आपल्या संघटनात्मक बळकटीचे दर्शन घडविले. “घोषनाद की मंगल ध्वनी से जननी का जयकार करे” या भावनेने आणि संपूर्ण ‘वंदे मातरम’च्या सुरावटीने या ऐतिहासिक सोहळ्याची सांगता झाली. या कार्यक्रमाला सर्व ठिकाणी नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

    Celebration in the Western Maharashtra Province Marking the 90th Anniversary of the Rashtra Sevika Samiti

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    ‘मिसिंग लिंक’ आता ‘कनेक्टिंग लिंक’ : मुंबई–पुणे प्रवासातील ऐतिहासिक टप्पा!!

    Kondhwa : कोंढव्यात हिंदूंना शोधण्यासाठी आता दुर्बिण लावावी लागेल; 2047 पर्यंत देश इस्लाम राष्ट्र बनवण्याचे षड्यंत्र, नीतेश राणे आक्रमक

    Chhagan Bhujbal : ज्या राज्यात राहतो ती भाषा आलीच पाहिजे; मंत्री छगन भुजबळ यांची मराठी सक्तीवर भूमिका