प्रतिनिधि :
भारताची फंडासाठी १ कोटी डॉलर देण्याची तयारी, सार्क देशांचा सकारात्मक प्रसिसाद
कोरोना व्हायरसचं संक्रमण दिवसेंदिवस वाढत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सार्क देशांपुढे कोरोना इमर्जन्सी फंड उभारण्याची संकल्पना मांडली आहे. जगभरात १.५ लाखांहून अधिक लोक करोना व्हायरसनं संक्रमित झाले आहेत. भारतातही करोनाबाधित रुग्णांच्या आकड्याने शंभरी ओलांडली आहे. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारे ‘सार्क’ देशातील नेत्यांशी चर्चा केली. या दरम्यान पंतप्रधान मोदी यांनी कोविड-१९ साठी एका एमर्जन्सी फंडचा प्रस्ताव सार्क देशांच्या प्रमुखांसमोर ठेवला. एवढेच नाही तर भारताकडून या फंडसाठी १ कोटी डॉलर देण्याचीही घोषणाही पंतप्रधान मोदी यांनी यावेळी केली. भारतानं उचललेल्या या पावलाबद्दल सार्क नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानले.
तयार राहा, घाबरू नका, हाच आमचा मार्गदर्शक मंत्र : मोदी
एवढ्या कमी वेळेत या चर्चेमध्ये सहभागी होण्यासाठी मी सर्वांचे आभार मानतो. खास करून नेपाळचे पंतप्रधान के पी शर्मा ओली यांचे मी आभार मानू इच्छितो, जे शस्त्रक्रियेनंतर लगेचच या चर्चेत सहभागी झालेत, असे मोदी यांनी सांगितले.
ते म्हणाले की, आपल्याला सगळ्यांनाच माहीत आहे की जागतिक आरोग्य संघटनेनं कोविड-१९ ला महामारी म्हणून घोषित केले आहे. आत्तापर्यंत आपल्या क्षेत्रातही जवळपास १५० रुग्ण समोर आलेत. आपल्यालाही सतर्क राहण्याची गरज आहे.
पाकिस्तानने या महत्त्वाच्या चर्चेतही काश्मीरचा मुद्दा उकरून काढला. त्या राज्यातील सर्व प्रतिबंध दूर करण्यात आले पाहिजेत, असे पाकिस्तानी आरोग्यमंत्री जफर मिर्झा यांनी सांगितले. याला सार्क देशांचा प्रतिसाद मिळाला नाही. सार्क देशांच्या अर्थव्यवस्थांना बसणाऱ्या फटक्याचे परिणाम कमीत कमी व्हावेत, यासाठी प्रयत्न करण्याची सूचना श्रीलंकेच्या राष्ट्राध्यक्ष गोट्याबा राजपक्षे यांनी केली. पंतप्रधान मोदीं यांच्या सूचनेला सार्क देशांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.