• Download App
    मुख्यमंत्र्यांचे "माझे कुटुंब, माझी जबाबदारी"; ७० हजार आशा वर्कर सोडल्या "वाऱ्यावरी" | The Focus India

    मुख्यमंत्र्यांचे “माझे कुटुंब, माझी जबाबदारी”; ७० हजार आशा वर्कर सोडल्या “वाऱ्यावरी”

    मोबदल्यापासून ७० हजार ‘आशा’ अद्यापि वंचित; जुलैपासून २ हजार रुपये मानधनाच्या निर्णयाचीही अमलबजावणी नाही


    वृत्तसंस्था

    मुंबई : मुख्यमंत्र्यांचे “माझे कुटुंब, माझी जबाबदारी” आणि ७० हजार आशा वर्कर सोडल्या “वाऱ्यावरी”, अशी महाराष्ट्रातली अवस्था आहे. मुख्यमंत्र्यांनी कोरोना महामारीला आळा घालण्यासाठी महत्त्वाकांक्षी “माझे कुटुंब, माझी जबाबदारी” ही योजना जाहीर केली. ती अमलात आणण्यासाठी जनजागृती करण्याची जबाबदारी राज्यातील आशा वर्करवर सोपविण्यात आली. uddhav thackeray news

    आशा वर्करनी जिवापाड मेहनत घेऊन आणि कोरोना महामारीच्या काळात जीवावर उदार होऊन या मोहिमेची जनजागृती केली. परंतु ७0000 आशा वर्कर्सना ठाकरे – पवार सरकारने मोबदल्यात पासून वंचित ठेवले. त्यांचे मानधन दोन हजार रुपये करण्याचे आश्वासन देण्यात आले होते, परंतु तेही अजून हवेतच आहे.

    आपला जीव धोक्यात घालून घरोघरी जाऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतील ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ योजना यशस्वीपणे राबवत कोरोना रुग्ण शोध तसेच ज्येष्ठ नागरिक, मधुमेही व उच्चरक्तदाबासह जोखमीचे रुग्ण शोधणाऱ्या राज्यातील आशा वर्करना त्यांच्या कामाचा मोबदला आजपर्यंत सरकारने दिलेला नाही. एवढेच नव्हे तर जुलैपासून या आशांना २ हजार रुपये मानधन देण्याचे जाहीर करूनही ते दिले नाही. ठाकरे – पवार सरकारने हजारो ‘आशा’ ची फसवणूक केली आहे. या विरोधात आता मोठा लढा उभारण्याची तयारी त्यांनी सुरू केली आहे.

    कोरोना रुग्ण आढळल्यास रुग्णालयात दाखल करण्याचे काम प्रामुख्याने आशा वर्कर आणि साडेतीन हजार गटप्रवर्तकांनी केले. स्वत: चा जीव धोक्यात घालून या आशा घरोघरी जाऊन पाहाणी व नोंदणी करत होत्या. या काळात त्यांना पुरेसे मास्क, हातमोजे व सॅनिटाइजर ही देण्यात आले नसल्याचे आशांच्या संघटनेच्या नेत्यांचे म्हणणे आहे. एका आशा कार्यकर्तीने रोज ५० घरांचे सर्वेक्षण करावे असा फतवा सरकारने जारी केला होता. याशिवाय त्यांनी त्यांची अन्य कामेही केली पाहिजे असे सांगण्यात आले होते. ‘माझे कुटुंब माझे आरोग्य’च्या कामासाठी प्रतिदिन १५० रुपये देण्याचे निश्चित करण्यात आले होते. साधारणपणे एक महिन्याहून अधिक काळ ही योजना सुरु होती. या योजनेच्या यशाचा सरकारने बराच उदोउदो केला असला तरी १५० रुपये प्रतिदिन प्रमाणे महिनाभराचे पैसे आजपर्यंत आशांना देण्यात आले नसल्याचे ‘ राज्य आशा वर्कर, गटप्रवर्तक व आरोग्य कर्मचारी संघटने’चे अध्यक्ष शंकर पुजारी आणि राजू देसले यांनी सांगितले.

    आपला जीव धोक्यात घालून कोरोना रुग्ण घरोघरी जाऊन शोधणाऱ्या आशांना फुटकी कवडी ही आजपर्यंत सरकारने दिली नसून आता सरकारमधील काही अधिकारी ४० रुपये दिवसा प्रमाणे मानधन घ्या असा आग्रह धरत आहेत. मुख्यमंत्र्यांनी ही योजना जाहीर केली तेव्हा योजना राबविण्यासाठी माणस मिळत नव्हती. ‘आशां’मुळे आज मुख्यमंत्र्यांची योजना यशस्वी झाली असताना आशांना त्यांच्या कामाचा मोबदला देण्यास सरकारने टाळाटाळ चालविल्याचे शंकर पुजारी यांनी सांगितले.

    राज्यात एकूण ७० हजार आशा स्वयंसेविका व ३५०० गटप्रवर्तक आहेत. यांच्या जोरावर ग्रामीण आरोग्याच्या बहुतेक योजना राबविल्या जातात. आशांना एकूण ७४ प्रकारची आरोग्याची कामे करावी लागतात. यात मलेरियासह साथीच्या आजाराचे रुग्ण शोधण्यापासून मानसिक आरोग्याचे रुग्ण शोधणे, गर्भवती महिलेला बाळंतपणासाठी रुग्णालयात नेणे आदी विविध कामे करावी लागतात. ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ योजना राबविताना करोनाचा धोका असूनही १५० रुपये रोज मिळणाऱ्या मोबदल्यावर आशांनी काम केले.

    uddhav thackeray news

    सरकारने १ जुलै रोजी आशांना दोन हजार रुपये व गटप्रवर्तकांना तीन हजार रुपये मानधन देण्याचे जाहीर केले मात्र तेही आजपर्यंत देण्यात आलेले नाही. ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ योजना नीट पार पाडावी यासाठी दिवाळीपूर्वी आशांना मानधन दिले जाईल असे मुख्यमंत्र्यांनीच जाहीर केले होते. मात्र दिवाळी झाली तरी मानधनाचा पत्ता नाही आणि आता १०० रुपये रोजावर कुष्ठरुग्ण व क्षयरुग्ण शोधण्याची सक्ती केली जात आहे. या कामासाठी किमान २०० रुपये रोज द्यावे अशी आमची मागणी आहे मात्र यासाठी आम्ही काम थांबवलेले नाही, असे सांगून शंकर पुजारी म्हणाले की, माझे कुटुंबच्या कामाचा मोबदला तसेच दोन हजार रुपये मानधन सरकारने ताबडतोब न दिल्यास १५ डिसेंबरपासून राज्यव्यापी आंदोलन केले जाईल. मागच्या युती सरकारनेही आशांची फसवणूक केली होती आणि हे सरकारही आश्वासन देऊन त्याची अंमलबजावणी करण्यास टाळाटाळ करत आहे.

    Related posts

    अबकारी धोरण प्रकरणः न्यायालयाने अरविंद केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत केली वाढ.

    पंतप्रधान मोदींनी राष्ट्राला समर्पित केल्या ७ नवीन संरक्षण कंपन्या, म्हणाले- ‘१५ -२० वर्षांपासून प्रलंबित होते हे काम!’

    महाराष्ट्र बंद : सोलापुरात युवासेना आक्रमक ; रस्त्यावर टायर जाळून केली बंदची सुरुवात , पहा व्हिडिओ