- बोठेंच्या घरांची पोलिसांकडून झडती; बोठे फरार
विशेष प्रतिनिधी
अहमदनगर : राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्या रेखा जरे हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधारापर्यंत पोहचण्यात पोलिसांना यश आले आहे. सकाळच्या नगर आवृत्तीचे संपादक बाळ ज. बोठे हे या सूत्रधाराचे नाव आहे. यातील आणखी एका आरोपीच्या मदतीने सुपारी देऊन बोठे यांनीच ही हत्या घडवून आणल्याचे तपासात निष्पन्न झाल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. पाच आरोपींना यापूर्वीच अटक केली असून सात डिसेंबर पर्यत पोलिस कोठडी सुनावली आहे.
दरम्यान बाळ बोठे हे फरारी असून त्यांच्या अटकेसाठी पोलिस पथके रवाना झाली आहे. त्यांच्या घराची झडती घेतली असून काही वस्तू जप्त करण्यात आल्याचेही पाटील यांनी सांगितले. या प्रकरणात पोलिसांनी बुधवारी तीन आरोपींना अटक केली होती. या आरोपींकडे चौकशी केली असता सागर भिंगारदिवे व ऋषिकेश पवार यांची नावे समोर आली. या दोघांनाही पोलिसांनी आज सकाळी अटक केली.
आणि बोठेचे नाव पुढे आले….
हत्येप्रकरणी पाच जणांकडे चौकशी केल्यानंतर पत्रकार बोठे यांनी जरे यांच्या हत्येची सुपारी दिल्याचे समोर आले असून तसे पुरावेही पोलिसांना मिळाले आहेत. त्यानंतर पोलिसांनी तातडीने बोठे यांना पकडण्यासाठी पथके रवाना केली. बाळ ज. बोठे हे नगरमधील पत्रकारितेतील मोठे नाव असून ते सकाळच्या नगरआवृत्तीचे निवासी संपादक म्हणून सध्या जबाबदारी सांभाळत होते. त्यांच्या सहभागाचे वृत्त समजताच सर्वत्र मोठी खळबळ उडाली.
हत्या कोणत्या कारणांसाठी हे नंतरच स्पष्ट
जरे यांची हत्या नेमकी कोणत्या कारणासाठी केली आहे, हे मुख्य सूत्रधाराला पकडल्यानंतरच स्पष्ट होईल, असेही पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. पोलिसांनी आरोपींकडून सुपारीची रक्कम ६ लाख २० हजार रूपये जप्त केली आहे. ही सुपारीची रक्कम बोठे व भिंगारदिवे यांनी मिळून दिली होती, असेही पाटील यांनी सांगितले. आज न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या रिमांड रिपोर्टमध्ये या सर्व आरोपींची नावे समाविष्ट करण्यात आली आहेत. खुनाचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसल्याचे पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले आहे .