विशेष प्रतिनिधी
पुणे : Wet Drought : यंदाचा पावसाळा शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावून घेणारा ठरला आहे. महाराष्ट्रात यंदा पावसाने थैमान घातले आहे. सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाल्याचे दिसत आहे. नेहमीच दुष्काळाची झळ सोसणारा मराठवाडा यंदाही दुष्काळाच्या सावटाखाली आहे. मात्र, यंदाचा दुष्काळ हा नेहमीसारखा नसून वेगळा आहे. मागील काही दिवसांपासून मराठवाड्यात पावसाने हाहाकार माजवला आहे. मराठवाड्यात पावसाचे प्रमाण कमी असते, परंतु यंदा सरासरीपेक्षा कितीतरी पटींनी जास्त पाऊस पडला आहे. या पावसामुळे नद्या-नाल्यांना पूर आले, शेतीचे नुकसान झाले, पिके पाण्याखाली गेली, गुरे-ढोरे वाहून गेली, गावे पाण्याखाली बुडाली, आणि जनतेच्या मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. काही जणांना आपले प्राणही गमवावे लागले. गावांचा संपर्क तुटला आणि रस्ते वाहून गेले. या सर्व नैसर्गिक आपत्तीमुळे मालमत्तेचे प्रचंड नुकसान झाल्याचे दिसून येत आहे.
मराठवाड्यावर आलेल्या या नैसर्गिक आपत्तीवर मात करण्यासाठी आणि शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरकारने ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी जोर धरत आहे. ओला दुष्काळ म्हणजे काय? तो कधी जाहीर केला जातो? ओला दुष्काळ जाहीर झाल्यास कोणते फायदे मिळतात? ओला दुष्काळ जाहीर करण्याबाबत काही सरकारी नियमावली आहे का? याबद्दल थोडक्यात माहिती घेऊया.
ओला दुष्काळ म्हणजे काय?
ओल्या दुष्काळाची स्पष्ट व्याख्या करणे कठीण आहे, परंतु ढोबळमानाने असे मानले जाते की, एखाद्या भागात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडल्यास त्याला अतिवृष्टी म्हणतात. परंतु, जर ही अतिवृष्टी इतकी तीव्र असेल की त्यामुळे 65 मिलिमीटरपेक्षा जास्त पाऊस पडला आणि 30 टक्क्यांपेक्षा जास्त पिकांचे नुकसान झाले, तर ती परिस्थिती ओला दुष्काळ म्हणून ओळखली जाते. एखाद्या विशिष्ट क्षेत्रात सतत किंवा नेहमीपेक्षा जास्त पाऊस पडल्यामुळे पिकांचे नुकसान, पूर, जीवित आणि वित्तहानी, तसेच पाण्याचा सुकाळ अशी परिस्थिती निर्माण झाल्यास त्याला ओला दुष्काळ म्हणतात.
ओला दुष्काळ जाहीर करण्याचे निकष:
ओला दुष्काळ जाहीर करण्यासाठी स्पष्ट लिखित निकष नाहीत. शासकीय नियमावलीत ‘ओला दुष्काळ’ ही अधिकृत संज्ञा नाही. तरीही, अतिवृष्टीमुळे होणाऱ्या नुकसानीसाठी काही निकष निश्चित केले गेले आहेत. शासकीय नियमानुसार, 65 मिलिमीटरपेक्षा जास्त पाऊस, 36 टक्क्यांपेक्षा जास्त पिकांचे नुकसान, शेती पाण्याखाली जाणे, पिकांची मुळे कुजणे, तसेच सलग दहा ते पंधरा दिवसांची अतिवृष्टी यासारख्या निकषांचा वापर केला जातो. याशिवाय, हवामान विभागाचा डेटा आणि कृषी विभागाच्या पंचनाम्यांचा डेटा हे देखील ओला दुष्काळ जाहीर करण्यासाठी निकष म्हणून वापरले जातात.
ओला दुष्काळ जाहीर केल्याने कोणते फायदे मिळतात?
ओला दुष्काळ जाहीर केल्यास शेतकऱ्यांना काही प्रमाणात आर्थिक दिलासा मिळतो. या नैसर्गिक आपत्तीमुळे झालेली जीवित हानी भरून काढता येत नाही, परंतु आर्थिक नुकसान काही प्रमाणात भरून काढले जाते.
- 2015 च्या नियमावलीनुसार, कोरडवाहू शेतीसाठी प्रति हेक्टर 13,000 रुपये आणि बागायती शेतीसाठी प्रति हेक्टर 18,000 रुपये याप्रमाणे नुकसानभरपाई दिली जाते. काही वेळा ही मदत 50,000 रुपये प्रति हेक्टरपर्यंत वाढवली जाऊ शकते.
- ओला दुष्काळ जाहीर झाल्यास कर्जवसुली थांबवली जाते, कर्जावरील व्याज माफ केले जाते आणि शेतकऱ्यांना नवीन कर्ज मिळण्याची प्रक्रिया सुलभ केली जाते. काही प्रसंगी कर्जमाफीही मिळू शकते.
- शेतकऱ्यांची घरे वाहून गेल्यास, पशुखाद्य नष्ट झाल्यास किंवा गुरे-ढोरे वाहून गेल्यास त्यासाठी नुकसानभरपाई दिली जाते.
- ओला दुष्काळ जाहीर झाल्यास चारा छावण्या उघडल्या जातात आणि इतर सुविधा पुरवल्या जातात.
What is a wet drought? And what happens if it is declared?
महत्वाच्या बातम्या
- सुप्रीम कोर्टात जॅकलिनला मोठा झटका! 200 कोटींच्या मनी लॉन्डरिंग प्रकरणात दिलासा नाही; ईडीची कारवाई सुरूच
- Manoj Jarange : “रोजगार हमी योजनेच्या कामावर जा, खांदा टाक आणि काम कर.” मनोज जरांगे हल्लाबोल
- मुंबई – ठाणे जोडणारी मेट्रो; मेट्रो मार्ग 4 आणि 4 अ… वेळ आणि ऊर्जा वाचवणारा विकासमार्ग
- Nilesh Lanka : सांगलीत ‘संस्कृती रक्षण मोर्चा’ : निलेश लंके, रोहित पवार यांचा गोपीचंद पडळकर आणि भाजपवर हल्लाबोल