विशेष प्रतिनिधी
जळगाव : ज्या उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीस यांना मी राहतो की तू राहतो असं म्हटलं होतं ते आज त्यांची पप्पी घेत आहेत. स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी आता उद्धव ठाकरे वाटेल त्या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करत आहेत, अशी जहरी टीका पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी केली आहे.
महाविकास आघाडी वादाच्या पार्श्वभूमीवर पाटील यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. ते म्हणाले, महाविकास आघाडीमध्ये झालेल्या युती या न टिकणाऱ्या युत्या आहेत हे यापूर्वीच आम्ही स्पष्ट केले होते. उद्धव ठाकरे कोणत्या विचाराचे होते आणि कोणामुळे तिकडे गेले? उद्धव ठाकरेंना आमच्यासारख्या कार्यकर्त्यांनी सांगितलं होतं की विचारधारा सोडू नका. त्यावेळेस त्यांनी हे ऐकलं असतं तर त्यांना आज हे दिवस आले नसते .कदाचित उद्धव ठाकरेंच्या आता हे लक्षात आलं असेल. म्हणून ते काँग्रेसची व राष्ट्रवादी शरद पवारांशी फारकत घेण्याचा प्रयत्न करत आहेत .
शरद पवार ,अजित पवार हे एकाच विचारांचे होते मात्र काही कारणास्तव ते वेगळे झाले. काँग्रेसचा तर कुठेच ठिकाणा राहिलेला नाही. विधानसभेच्या निकालामुळे महाविकास आघाडीत एकमेकांच्या कुरघोड्या सुरू झालेल्या आहेत. काही दिवसानंतर हे पक्ष शिल्लक राहतील किंवा नाही अशी परिस्थिती होणार आहे, असेही ते म्हणाले.
एका राष्ट्रवादीत काही लोक नाराज होऊन नेतृत्व बदलण्याचा प्रयत्न करत आहेत. महाविकास आघाडीचे चित्र हे ठिकाणावर नसून पुढच्या काळात यांचा डबड वाजणार आहे, असा टोला त्यांनी लगावला.
राजकारणात कोणीही आमचे शत्रू नाही असे वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. यावर पाटील म्हणाले, जे लोक विचारधारा सोडून लांब जात होते त्यावेळी भगवा झेंड्यासाठी आम्ही देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर आलेलो आहे. काही लोक विचारधारा सोडून पुन्हा येण्याचा प्रयत्न करत असतील तर थोडा विचार देवेंद्र फडणवीस यांनी देखील करावा. देवेंद्र फडणवीस यांना सल्ला देण्याएवढा मी मोठा माणूस नाही. मात्र ज्यावेळी आपली गरज होती आणि त्यावेळी आपला पक्ष अडचणीत होता त्यावेळी हे लोक कोणाबरोबर होते ? त्यांच्याकडे आता काहीही राहिलेलं नाही त्यामुळे ते गोड बोलून तुमच्याकडे येण्याचा प्रयत्न करत आहेत
– मात्र हे लोक कोणाचेच नाही याबाबत निश्चितपणाने देवेंद्र फडणवीस यांनी विचार करावा. उद्धव ठाकरेंच्या आता हे लक्षात आलं की आपण मूळ विचारधारा सोडली “जो बुंदो से गई व होदोंसे नही आने वाली है” ज्यांनी आधी भगवा सोडला त्यांनी आता भगवा पकडला तर त्यांचे हात थरथरतात हे त्यांच्या लक्षात आलंय