Lavasa Case : लवासाप्रकरणी पवार कुटुंबीयांना दिलासा मिळण्याची शक्यता:चौकशीची मागणी करणाऱ्या याचिकेवर निकाल राखीव
पुण्याच्या लवासा सिटी प्रकल्पाला दिलेल्या कथित अवैध परवानग्यांबाबत राष्ट्रवादी (श.प) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार कुटुंबीयांविरोधात सीबीआय चौकशीची मागणी करणाऱ्या जनहित याचिकेवरील निकाल मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवारी राखून ठेवला. त्याच वेळी, ही याचिका फेटाळली जाण्याची शक्यताही न्यायालयाने व्यक्त केली आहे. मुख्य न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर आणि न्यायमूर्ती गौतम अनखाड यांच्या खंडपीठासमोर याचिकेवर सुनावणी झाली. दिवाणी अधिकार क्षेत्राचा वापर करताना न्यायालय पोलिसांना एफआयआर नोंदवण्याचे निर्देश देऊ शकते, अशी कोणतीही कायदेशीर तरतूद याचिकाकर्ते वकील नानासाहेब जाधव यांना दाखवता आलेली नाही, अशी स्पष्टोक्ती या वेळी खंडपीठाने दिली.