- West Bengal Violence: पश्चिम बंगालमधील राजकीय हिंसाचाराचे थेट पुणे कनेक्शन ; CBI कडून एकाला अटक
वृत्तसंस्था
पुणे : पश्चिम बंगालमध्ये (West Bengal) विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर मोठ्या प्रमाणावर हिंसाचार (Post-poll Violence) घडवण्यात आला होता. या राजकीय हिंसाचारात भाजपच्या अनेक कार्यकर्त्यांची हत्या झाली.तसेच घरं, दुकानं, सरकारी मालमत्तांची जाळपोळ,बलात्कार, मारहाणीच्या घटना देखील घडल्या . सीबीआय (CBI) कडून याचा तपास केला जात असून त्यात नवनवीन खुलासे होत आहेत. आता या हिंसाचारचं थेट पुणे कनेक्शन समोर आलं आहे.West Bengal Violence: Direct Pune Connection of Political Violence in West Bengal; One arrested by CBI
विधानसभा निवडणुकीचा निकाल दोन मे रोजी जाहीर झाल्यानंतर बंगालमधील अनेक भागात हिंसाचार सुरू झाला. तृणमूल काँग्रेसने जाणीवपूर्वक हा हिंसाचार घडवत भाजपच्या कार्यकर्त्यांची हत्या, त्यांच्या कुटूंबियांचा छळ केला.
हिंसाचाराबाबत आलेल्या अनेक तक्रारींची दखल घेत कोलकता उच्च न्यायालयाने मागील महिन्यात या हिंसाचाराची चौकशी करण्याचे आदेश सीबीआयला दिले. यामध्ये प्रामुख्याने बलात्कार व खूनाच्या आरोपांची चौकशी सीबीआयकडून केली जात आहे. आतापर्यंत या प्रकरणांमध्ये सीबीआयकडून 35 हून अधिक गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तर अनेकांना अटकही केली आहे.
यातीलच एका प्रकरणात सीबीआयकडून सोमवारी पुण्यात एकाला अटक करण्यात आली आहे. बंगालमधील हिंसाचाराच्या प्रकरणातील हा फरार आरोपी आहे. त्याला न्यायालयात हजर करण्यात आल्यानंतर चार दिवसांच्या ट्रान्झिट रिमांड देण्यात आला आहे. सीबीआयकडून या आरोपीला बंगालमध्ये नेले जाईल. हा आरोपी हिंसाचारानंतर पुण्यात पळून आल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, बंगालमध्ये 30 तारखेला तीन विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक होत आहे. याच्या प्रचारासाठी भाजपचे उपाध्यक्ष दिलीप घोष हे सोमवारी दुपारी भवानीपूर मतदारसंघात दाखल झाले होते. पण त्यांच्याविरोधात घोषणाबाजी करत तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी त्यांना रोखलं. जमाव आक्रमक झाल्यानंतर सुरक्षारक्षकांना त्यांच्यावर पिस्तूल रोखावे लागले. या घटनेनंतर भाजपने आक्रमक पवित्रा घेतला आहे.