वृत्तसंस्था
कोलकाता – पश्चिम बंगालमध्ये नारदा घोटाळा प्रकरणात ममता बॅनर्जी सरकारमधील ४ मंत्र्यांना सीबीआयने अटक केल्यानंतर तृणमूळ काँग्रेसच्या हजारो समर्थकांनी कोलकात्यातील सीबीआय ऑफिससमोर राडा घातला आहे. अनेकांनी दगडफेक केली आहे. राज्यपालांनी आता या प्रकरणात हस्तक्षेप करून ममता बॅनर्जींचे कायदा आणि सुव्यवस्थेकडे लक्ष वेधले आहे. West Bengal: A large number of TMC supporters staged a protest outside the CBI office after four party leaders were arrested by the agency.
सीबीआयने ममता बॅनर्जी सरकारमधील मंत्री फिरहाद हकीम यांच्या घरावर आधी छापे घातले. त्यांना ताब्यात घेतले. फिरहाद हकीम यांच्याशिवाय सीबीआयने सुब्रत मुखर्जी, तृणमूल कॉंग्रेसचे आमदार मदन मित्रा आणि माजी महापौर सोव्हान चटर्जी यांनाही अटक केली. यानंतर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी स्वतः सीबीआय ऑफीस गाठून स्वतःलाच अटक करण्याची मागणी केली.
ममता बॅनर्जी यांनी सीबीआय अधिकाऱ्यांशी जोरदार वाद घातला. राज्य सरकारच्या परवानगीशिवाय मंत्र्यांना अटक करताच कशी, अशी विचारणा ममता बॅनर्जी यांनी केली. परंतु, सीबीआयकडे नारदा घोटाळा प्रकरणात कारवाईची खुद्द राज्यपालांची परवानगी आहे. तसेच ममतांच्या चौघां मंत्र्यांविरोधात कारवाई करण्याचे कोलकाता हायकोर्टाचेही आदेश आहेत. ही माहिती सीबीआयचे प्रवक्ते आर. सी. जोशी यांनी दिली आहे.
या प्रकरणात आता राज्यपाल जगदीप धनकर यांनी हस्तक्षेप करून मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे कायदा आणि सुव्यवस्थेकडे लक्ष वेधले आहे. सीबीआय ऑफीससमोर दगडफेक झाली आहे. कोलकाता आणि पश्चिम बंगालच्या पोलीसांनी नुसती बघ्याची भूमिका घेतली आहे. कायदा आणि सुव्यवस्था प्रस्थापित करण्याची जबाबदारी राज्य सरकारची आहे, असे जगदीप धनकर यांनी स्पष्ट केले आहे.