मुख्यमंत्री उध्दव ठाकरे गुरूवारी कोयना विद्युत प्रकल्पाच्या चौथ्या टप्याच्या पाहणीसाठी ते आले होते.
विशेष प्रतिनिधी
पुणे : मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी वैयक्तिक पातळीवर कोरोनाविरुध्दची लढाईमध्ये आदर्श निर्माण केला आहे. गेल्या नऊ महिन्यांत ठाकरे क्वचितच घराबाहेर पडले. गुरूवारी कोयना विद्युत प्रकल्पाच्या चौथ्या टप्याच्या पाहणीसाठी ते आले होते. मात्र, त्यांनी निग्रह ठेऊन स्थानिक नागरिक किंवा पदाधिकारीच काय शिवसेनेच्या आमदारालाही भेटले नाहीत. uddhav thackeray koyna visit news
राज्यात कोरोनाचा कहर सुरू झाल्यापासून उध्दव ठाकरे यांनी स्वत:ला क्वारंटाईन करून ठेवले होते. या काळात त्यांनी हाताच्या बोटावर मोजण्याइतकेच दौरे केले. मंत्रालयात जाण्याचेही त्यांनी टाळले होते. यामुळे त्यांच्यावर टीकाही झाली होती. परंतु, कोरोनाविरुध्दच्या लढाईत दोन गज की दुरीच नव्हे एकमेंकांना भेटणेही त्यांनी टाळले. त्यामुळेच लोरे येथे शिवसेनेचे पदाधिकारी आणि स्थानिक लोकप्रतिनिधींना प्रकल्पाच्या ठिकाणी प्रवेश देऊ नये अशी सक्त सूचना मुख्यमंत्री ठाकरे यांच्याकडून पोलिसांना देण्यात आली होती.
पोफळी—आलोरे—कुंभार्ली—कोळकेवाडी या गावांच्या सीमांवर पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले होते. पोफळीतील विश्रामगृह, वीज निर्मिती कार्यालय आणि आणि अन्य महत्त्वाच्या ठिकाणीही पोलिसांचा ताफा तैनात करण्यात आला होता. मुख्यमंत्री ठाकरे पोफळीतील महानिर्मिती कंपनीच्या विश्रामगृहावर आले तर त्यांच्या जेवणाची गैरसोय होऊ नये म्हणून जय्यत तयारी करण्यात आली होती. विश्रामगृहातील दोन कक्ष मुख्यमंत्र्यांसाठी राखीव ठेवण्यात आले होते. मोदक, पुरणपोळी आणि कोकणी पद्धतीचे जेवण तयार करण्यात आले होते.
uddhav thackeray koyna visit news
गुहागरचे आमदार भास्कर जाधव आणि चिपळूणचे आमदार शेखर निकम यांना वीजनिर्मिती प्रकल्पात सकाळी साडेदहा वाजता प्रवेश देण्यात आला. त्या पाठोपाठ राजापूरचे आमदार राजन साळवी आणि चिपळूणचे माजी आमदार सदानंद चव्हाण एकत्र आले होते. आमदार साळवी यांना पोलिसांनी प्रवेश दिला. परंतु चव्हाण यांना प्रवेश नाकारण्यात आला. त्यामुळे साळवी यांनी गोंधळ घातला. पण मुख्यमंत्र्यांच्या सक्त सूचना असल्याचे सांगितल्यानंतर ते शांत झाले आणि सदानंद चव्हाण माघारी परतले. शिवसेनेचे तालुकाप्रमुख संदीप सावंत, ग्राहक संघटनेचे जिल्हाध्यक्ष संतोष सुर्वे, सभापती धनश्री शिंदे यांच्यासह शिवसेनेचे काही पदाधिकारी पोफळीतील विश्रामगृहावर मुख्यमंत्र्यांची वाट पाहत थांबले होते. त्यांच्यासह शासनाच्या विविध खात्यांचे वरिष्ठ अधिकारीही तेथे होते. तसेच अलोरे येथे शिवसेनेचे काही पदाधिकारी त्यांच्या स्वागतासाठी थांबले होते. पण मुख्यमंत्री ठाकरे कोयनेतून आतील रस्त्याने चौथ्या टप्प्याच्या ठिकाणी आले आणि पाहणी करून पुन्हा त्याच मार्गे माघारी परतले.