जून महिन्यातच महाराष्ट्रातील दोन प्रभावी प्रादेशिक पक्षांचा वर्धापन दिन येतो. 10 जूनला राष्ट्रवादी काँग्रेसचा वर्धापन दिन झाला आणि आज 19 जून रोजी शिवसेनेचा वर्धापन दिन आहे. दोन्ही पक्षांच्या राजकारण शैलीची आणि वर्धापन दिनाची वेगवेगळी वैशिष्ट्ये असली तरी त्यात काही कॉमन फॅक्टर देखील आहेत आणि ते एकमेकांना आधारभूत ठरणारे असले तरी दोन्ही प्रादेशिक पक्षांचा महाराष्ट्रातला प्रभाव घटला आहे, असेच दाखविणारे आहेत.Shivsena – NCP : reducing clout of regional parties in maharashtra
राष्ट्रवादीचा घटला प्रभाव
राष्ट्रवादीने 2023 मध्ये पंचविशीत प्रवेश केला आहे. म्हणजे पक्ष स्थापनेचे हे रौप्य महोत्सवी वर्ष आहे. या रौप्य महोत्सवाची सुरुवात किती भव्य दिव्य व्हायला हवी होती, रौप्य महोत्सवी वर्षात राष्ट्रवादी काँग्रेसने राष्ट्रीय पातळीवर केवढी मोठी झेप घ्यायला हवी होती, पण तसे घडले नाही. शरद पवारांनी आपल्या विस्तारित आत्मचरित्राच्या प्रकाशन समारंभात निवृत्ती नाट्य घडविले. त्यावेळीच खासदार सुप्रिया सुळे यांना पक्षाच्या अध्यक्षपदी अथवा कार्याध्यक्षपदी नेमायचा त्यांचा मनसूबा होता. पण तो तडीस जाऊ शकला नाही. महाराष्ट्रातील स्थानिक नेते आणि कार्यकर्त्यांनी त्यांना तसे करण्यापासून रोखले म्हणून अखेरीस राष्ट्रवादीच्या रौप्य महोत्सवाची सुरुवात दिल्लीतल्या कार्यक्रमाने पवारांना करावी लागली. दिल्लीच्या पक्ष कार्यालयात तो कार्यक्रम झाला आणि त्या कार्यक्रमात पवारांनी एकाच वेळी दोन कार्यकारी अध्यक्ष नेमले. प्रफुल्ल पटेल आणि सुप्रिया सुळे यांच्याकडे जबाबदारी सोपवली. तुलनेने हा कार्यक्रम लहानच झाला.
रौप्य महोत्सवी वर्षाची सुरुवात शिवतीर्थ किंवा कराडच्या यशवंतराव चव्हाण समाधीच्या साक्षीने झाली असतील तर त्याला वेगळा भव्य अर्थ प्राप्त होऊ शकला असता, पण तसेही घडले नाही. पवारांना आपला वारस जाहीर करताना दोन अध्यक्ष कार्यकारी अध्यक्ष नेमावे लागले, हे राष्ट्रवादीच्या घटलेल्या प्रभावाचे निदर्शक आहे.
बाकी अंतर्गत राजकारणातून त्यांनी अजित पवारांना डावलले वगैरे गोष्टी होत राहतात आणि होत राहतील. पण राष्ट्रवादीच्या घटता प्रभाव राष्ट्रवादीच्याच रौप्य महोत्सवाच्या सुरुवातीच्या कार्यक्रमात दिसला ही मात्र वस्तुस्थिती नाकारता येणार नाही.
दोन्ही शिवसेनांची ताकद मर्यादित
जे राष्ट्रवादीचे तेच शिवसेनेचे. राष्ट्रवादीला काँग्रेसच्या वळचणीला राहून सत्ता मिळवावी लागली. तसेच शिवसेना अखंड होती तेव्हा देखील स्वतंत्रपणे नव्हे, तर भाजप अथवा राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्याच वळचणीला राहून त्यांना सत्ता मिळाली आणि आज जेव्हा शिवसेनेचा वर्धापन दिन साजरा होत आहे, तेव्हा तो दोन शिवसेनांचा वर्धापन दिन साजरा होताना दिसत आहे. षण्मुखानंद हॉलमध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा, तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने नेस्को सेंटर मध्ये कार्यक्रम आयोजित केले आहे. दोन्ही शिवसेनेच्या स्वतंत्र ताकदी मर्यादितच आहेत. ठाकरे यांच्या शिवसेनेला पवारांच्या राष्ट्रवादीचा आधार आहे तर शिंदे यांची शिवसेना भाजपच्या आधारे सत्तेवर आहे.
“स्वयंभू” नेतृत्व, मर्यादित कर्तृत्व
दोन्ही पक्षांचे नेते कितीही “स्वयंभू” मानले गेले, तरी त्यांच्या “स्वयंभू” नेतृत्वाला केवळ प्रादेशिक मर्यादा नाही, तर राजकीय कर्तृत्वाचीच मर्यादा आहे. त्यामुळेच ठाकरे – पवारांचे पक्ष त्यांच्याच मर्यादित स्वकर्तृत्वाने महाराष्ट्र लिमिटेड राहिले नाहीत, तर ते अधिक आकुंचित पावले आणि शिवसेना तर विभाजितही झाली. आज ठाकरेंच्या शिवसेनेकडे 15 आमदार आणि 3 खासदार एवढीच शिदोरी शिल्लक आहे, तर राष्ट्रवादीची मुळातच शिदोरी सिंगल डिजिट खासदारांची आणि 60 च्या आसपास आमदारांची राहिली आहे. जून महिन्यात वर्धापन दिन साजरा करणारा या दोन प्रादेशिक पक्षांच्या नेतृत्वाची अंगभूत मर्यादा सांगणारी ही कहाणी आहे!
Shivsena – NCP : reducing clout of regional parties in maharashtra
महत्वाच्या बातम्या
- जम्मू-काश्मीरमध्ये मोठा घातपात टळला! लष्कराने ११ जिवंत बॉम्बसह ६१ स्फोटके केली नष्ट
- आधी पक्षातून हकालपट्टी नंतर अटकही, ‘द्रमुक’च्या प्रवक्त्याला भाजपा नेत्या खुशबू सुंदरवर केलेली वादग्रस्त टिप्पणी भोवली!
- घरात बसणार्यांना मोदी-शाह काय कळणार? अकोल्यात फडणवीसांची बोचरी टीका
- ‘’अरे, ये मुंगेरीलाल के हसीन सपने कितने दिन देखोगे?’’ भाजपाचा उद्धव ठाकरेंना सवाल!