पंतप्रधान नरेंद्र मोदींनी टीव्ही 9 ला दिलेल्या मुलाखतीत महाराष्ट्रातले दोन बडे नेते ठाकरे आणि पवार यांच्या विषयीची जी विशिष्ट मते व्यक्त केली, त्याचे आता महाराष्ट्राच्या राजकारणात वेगवेगळे अन्वयार्थ लावले जात आहेत. “मोदींनी ठाकरेंसाठी दारे खुली केली”, “मोदींनी एकनाथ शिंदे आणि अजितदादांना इशारा दिला” वगैरे मखलाशी काही माध्यमांनी चालवली आहे, पण त्या पलीकडे जाऊन मोदींच्या वक्तव्याच्या खरा अर्थ महाराष्ट्राच्या राजकारणात दडला आहे, तो म्हणजे शरद पवार आपल्या पक्षातल्या फुटीचा बदला, जर महाराष्ट्रात जातीय धुव्रीकरण करून घेणार असतील, तर त्याला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गुणाकाराचे राजकारण करून उत्तर देण्याची तयारी चालविली आहे, हा त्याचा खरा अर्थ आहे!!Modi multiplying anti casteist forces in maharashtra against pawar and Congress
पंतप्रधान मोदींनी शरद पवारांबरोबरची आधीची आपली “पॉलिटिकल केमिस्ट्री” विसरून पुण्यात “भटकती आत्मा” म्हणून प्रखर टीका केली होती. खरं म्हणजे पवारांच्या अतिराजकारणाचा तो परिणाम होता. महाराष्ट्राच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी मी नसेन, तर बाकी कोणीच असता कामा नये हा पवारांचा नेहमीचा अट्टाहास असतो. त्यावरच मोदींनी थेट प्रहार केला होता. टीव्ही 9 च्या मुलाखतीत त्यापलीकडे जाऊन मोदींनी ज्या शरद पवारांना आपली कौटुंबिक समस्या सोडवता येत नाही, ते शरद पवार महाराष्ट्राच्या काय समस्या सोडवणार??, असा परखड सवाल करून पवारांचे प्रतिमाभंजन केले.
मराठी माध्यमांनी कायमच पवारांचे प्रेझेंटेशन “महाराष्ट्राचे चाणक्य”, “मराठा स्ट्रॉंगमॅन” वगैरे शब्दांमध्ये केले. पण पवार आपल्या कुटुंबातला सत्तावाटपाचा प्रश्न साधा सोडवू शकले नाहीत, असे शरसंध्यान साधून मोदींनी पवारांच्या “चाणक्य” प्रतिमेला तडा दिला. पण हा केवळ पवारांच्या प्रतिमाभंजनाचा विषय नाही, तर त्यापलीकडच्या पवारांच्या राजकारणाला मूळापासून सुरुंग लावण्याचा विषय आहे.
पवारांचा पक्ष फुटला. अजित पवार त्यांची सगळी “निवडणूकक्षम” माणसे घेऊन बाहेर पडले. त्यामुळे पवारांना उरलेल्या पक्षाचे राजकीय भांडवल करणे भाग होते, म्हणूनच त्यांनी धूर्तपणाने मनोज जरांगे नावाच्या मराठा नेत्याला समोर केले. मनोज जरांगेंच्या अनुयायांच्या रूपाने आपल्याला उरलेल्या राष्ट्रवादीचे भांडवलीकरण करता येईल, हा त्यांचा होरा होता. प्रत्यक्षात तो होरा लोकसभा निवडणुकीपुरता तरी साध्य झाला नाही. पवारांना त्यांच्या वाट्याला आलेले 10 उमेदवार देखील एका झटक्यात जाहीर करता आले नाहीत. पण हा झाला लोकसभा निवडणुकीपुरता विषय.
पण त्या पलीकडे जाऊन पवारांना मनोज जरांगेंच्या रूपाने जातीय ध्रुवीकरण साधण्याचा डाव खेळायचा आहे आणि विधानसभा निवडणुकीत आपल्या राष्ट्रवादीचे राजकीय भरणपोषण करायचे आहे. पवार महाराष्ट्रात असे जातीय ध्रुवीकरण करून स्वतःचे राजकारण तरंगत ठेवणार असतील, तर त्यांना तितक्याच प्रखरपणे प्रत्युत्तर देण्याची गरज नेमकेपणाने लक्षात घेऊन मोदींनी पूर्णपणे बेरजेच्या किंबहुना गुणाकाराच्या राजकारणासाठी डाव टाकला आहे. राजकारण आपल्या ठिकाणी, पण व्यक्तिगत संबंधांमध्ये आपण उद्धव ठाकरेंना मदत करणारी पहिली व्यक्ती असून असे सांगून त्यांनी उद्धव ठाकरेंना काही विशिष्ट प्रकरणांमध्ये मदत करण्याचे मधाचे बोट लावले आहे आणि इथे महाराष्ट्राचे राजकारण निर्णय पातळीवर फिरण्याची खरी मेख आहे.
पवारांनी उद्धव ठाकरेंना फितवून आणि काँग्रेसला पटवून महाराष्ट्रात मोट बांधण्याचा प्रयत्न केला होता. तो फक्त अडीच वर्षे टिकला. पण त्यातून पवारांना स्वतःच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे पुरेसे राजकीय भांडवलीकरण करता आले नाही. उलट त्यांचीच राष्ट्रवादी फुटली, तरी देखील मनोज जरांगेंच्या रूपाने मराठा आंदोलन उभे करून त्याचा राजकीय लाभ उठवण्याचा पवारांचा प्रयत्न मागे पडला नाही. तो तसाच सुरू राहिला.
या पार्श्वभूमीवर एकीकडे एकनाथ शिंदे, दुसरीकडे अजित पवार, तिसरीकडे राज ठाकरे आणि आता शक्य झाले तर उद्धव ठाकरे हा महाराष्ट्राच्या राजकारणाचा गुणाकार मोदींनी करायचा ठरवले असेल, तर त्यात मोदींची भविष्यवेधी राजकारणाची दृष्टी मान्य करावी लागेल. महाराष्ट्रात बाळासाहेब ठाकरेंनी खऱ्या अर्थाने जात-पात विरहित शिवसेना रुजवली. महाराष्ट्रातला काँग्रेसनिष्ठ राजकारणातला “मराठा डॉमिनन्स” मोडून काढला. त्याचे श्रेय बाळासाहेबांना जातेच जाते. याविषयी कोणतीही शंका नाही, पण त्या पलीकडे जाऊन बाळासाहेबांचा तो वारसा चालवण्याची आज जेव्हा खरी गरज उत्पन्न झाली असताना, तो वारसा सहजपणे मोदींनी आपल्या हातात घेतला आहे. मोदींनी महाराष्ट्रात चालविलेल्या गुणाकाराच्या राजकारणाचा हा खरा अर्थ आहे.
जातीय व्हायरस दूर करण्याचा प्रयत्न
महाराष्ट्रातला पवार नावाचा जातीय व्हायरस जोपर्यंत दूर होत नाही, तोपर्यंत महाराष्ट्राचे राजकारण खऱ्या अर्थाने जात-पात विरहित प्रवाही होणार नाही हे लक्षात घेऊन मोदींनी महाराष्ट्राच्या राजकारणाचा गुणाकार चालविला आहे. संकटात उद्धव ठाकरे यांना वैयक्तिक संकटात मदत करणारी पहिला व्यक्ती असेन, या वक्तव्यात महाराष्ट्राचे गुणाकाराचे राजकारण दडले आहे, जे महाराष्ट्रात काँग्रेसी संस्कृतीने रुजवलेल्या मराठा वर्चस्वाच्या राजकारणाला खऱ्या अर्थाने काटशह देणारे असेल!!
Modi multiplying anti casteist forces in maharashtra against pawar and Congress
महत्वाच्या बातम्या
- उद्धव ठाकरेंनी कोल्हापूरच्या मातीत हाणली पवारांची कॉपी!!; कोण कुणाच्या हातात काय देणार??, विचारणा केली!!
- Salman Khan Firing: सलमान खानच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपीने केली आत्महत्या!
- मोदींच्या महाराष्ट्र मोहिमेनंतर योगींची दक्षिण महाराष्ट्रावर स्वारी!!; सोलापूर, कोल्हापूर, हातकणंगलेत तुफानी सभा!!
- सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार निवडणूक आयोगाने EVM-VVPAT शी संबंधित प्रोटोकॉल बदलला!