• Download App
    महायुतीच्या जागावाटपाच्या बातम्या आणि किस्से; सैरभैर "माध्यमवीरांनी" परस्पर पिसले आकड्यांचे पत्ते!!|Marathi mediocres throwing their own numbers of mahayuti seats sharing without true sources

    महायुतीच्या जागावाटपाच्या बातम्या आणि किस्से; सैरभैर “माध्यमवीरांनी” परस्पर पिसले आकड्यांचे पत्ते!!

    नाशिक : भाजप + शिवसेना + राष्ट्रवादी काँग्रेस आणि अन्य पक्ष यांच्या महायुतीच्या जागावाटपाच्या बातम्या आणि किस्से एवढे माध्यमांमध्ये फिरत आहेत की, त्यातले आकडे “माध्यमवीरांनाच” समजेनासे झाले आहेत. भाजपमध्ये बातम्यांसाठीची खरी सूत्रेच मिळत नाहीत म्हणून सैरभैर झालेले “माध्यमवीर” त्यांच्या मनाला येईल त्या आकड्यांचे परस्पर पत्ते पिसत आहेत!!Marathi mediocres throwing their own numbers of mahayuti seats sharing without true sources

    तसाही महाराष्ट्रातल्या फक्त 48 याच आकड्याचा हिशेब जमवायचा आहे. त्यामुळे 48 पैकी 30, 48 पैकी 32, 48 पैकी 36 अशा जागा “माध्यमवीरांनी” परस्पर भाजपला देऊन टाकल्या आहेत. त्यामुळे उरलेल्या 10 – 15 जागांवर शिंदे आणि अजितदादांना खेळावे लागेल, असे “माध्यमवीरांनीच” परस्पर ठरविले आहे. प्रत्येक “माध्यमवीराचा” आकडा वेगवेगळा आहे. त्याचा एकमेकांशी मेळ बिलकुलच बसायला तयार नाही, पण तरीही बातम्या चालवायच्याच म्हणून आपापल्या तथाकथित सूत्रांना गाठून “माध्यमवीर” आपला “खात्रीलायक” आकडा ते लोकांसमोर फेकत आहेत.



    “माध्यमवीरांच्या” या सगळ्या रिपोर्टिंगचे वैशिष्ट्य असे की ते भाजप आणि महायुतीच्या जागावाटपांच्या बैठकीचे रिपोर्टिंग काँग्रेसच्याच स्टाईलने करून वेगवेगळे किस्से रंगवून सांगत आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह दोन दिवस महाराष्ट्राच्या दौऱ्यावर होते, पण त्यांनी घेतलेल्या बैठकांमध्ये नेमके काय झाले??, त्यांनी कोणाला नेमके काय सांगितले??, याची खात्रीलायक माहिती आणि बातमी कुठल्याही माध्यमवीराकडे उपलब्ध नाही. ज्या बातम्या येतात, त्या केवळ वरवरच्या आणि अतिशय निम्नस्तराच्या सूत्रांच्या हवाल्याने येत आहेत.

    प्रत्यक्षात भाजप आणि महायुतीचे जागावाटप हे भाजपच्या 5 अतिवरिष्ठ नेत्यांच्या हातात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृह आणि सहकारमंत्री अमित शाह, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आणि भाजपचे संघटन सचिव बी. एल. संतोष यांनाच भाजपचा निवडणूक लढवण्याचा नेमका आकडा माहिती आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाजपच्या सर्वोच्च निवडणूक समितीत जरूर सदस्य म्हणून आहेत, पण भाजपच्या अतिसर्वोच्च समितीत वर उल्लेख केलेले फक्त पाचच नेते आहेत की ज्यांच्याकडे कुठल्याही “माध्यमवीरांचा” बिलकुलच संपर्क नाही किंवा ते कुठल्याच माध्यमवीरांचे “बातम्यांचे खरे सोर्सेस” नाहीत. कारण ते कुठल्याच माध्यमवीरांना दारातही उभे करत नाहीत.

    त्यामुळे मराठी “माध्यमवीर” आपल्या मनाला येईल तो आणि आपल्या हिशेबात बसेल तो महायुतीचा जागा वाटपाचा आकडा लोकांसमोर फेकत आहेत. त्याची बेरीज 48 होते आहे यात शंका नाही, पण म्हणून “माध्यमवीर” जो आडाखा बांधून त्यांचा आकडा त्यांच्या मतानुसार फेकत आहेत, त्याबरहुकूमच भाजपचे अतिवरिष्ठ नेते विचार करून तसाच्या तसा आकडा जागावाटपात पुढे आणतील ही शक्यताच फार दुरापास्त आहे.

     पक्के होमवर्क

    भाजपच्या वरिष्ठ आणि अतिवरिष्ठ नेत्यांचे होमवर्क पक्के झाले आहे. ते ऐन परीक्षेच्या वेळी घाईवर आलेल्या अभ्यासासारखे नाही, गेल्या दोन-तीन महिन्यांपासूनही सुरू नाही, तर ते गेल्या दोन-तीन वर्षांपासून सुरू आहे, म्हणूनच भाजपला सतत “निवडणूक मोडमध्ये” असलेला पक्ष, असे म्हणावे लागते. हा “निवडणूक मोड” सहज कुठे कुठल्या पदयात्रेत किंवा बाजारात मिळत नाही, तो “निवडणूक मोड” प्रत्यक्ष नियोजनबद्ध कामातून आणावा लागतो आणि तो भाजपचे वरिष्ठ आणि अतिवरिष्ठ नेते होमवर्क करून कायम टिकतात. हे केवळ भाजपची आरती ओवाळायची म्हणून लिहिण्याचे कारण नाही. पण खरंच ते सातत्याने दोन-तीन वर्ष होमवर्क करत असतील आणि निवडणुकीचे नियोजन जमिनी स्तरावरून वरच्या स्तरापर्यंत आखून काढत असतील, तर त्याचा परिणाम देखील नाकारायचे कारण नाही.

    माध्यमवीरांना अशा प्रकारच्या होमवर्कची अजिबात सवय नाही. भाजपच्या वरिष्ठ आणि अतिवरिष्ठ नेत्यांकडे कुठल्याच “माध्यमवीरांचे” बातम्यांसाठीचे “सोर्सेस” उपलब्ध नाहीत. त्यामुळे “माध्यमवीरांचा” आकडा आणि त्याचा ताळमेळ गेल्या 10 वर्षात सतत चुकत आला आहे. भाजप वेगवेगळ्या राज्यांमध्ये विधानसभेच्या निवडणूक जिंकल्यानंतर कोणाला मुख्यमंत्री करणार??, याची साधी भनकही या “माध्यमवीरांना” लागली नव्हती. मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड ही याची ताजी उदाहरणे आहेत. तिथल्या विद्यमान मुख्यमंत्र्यांची नावे देखील हे “तज्ञ माध्यमवीर” त्यांची मुख्यमंत्रीपदी निवड होईपर्यंत सांगू शकले नव्हते. दोनच वर्षांपूर्वी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होतील हे प्रत्यक्ष पत्रकार परिषद सुरू होईपर्यंत कुठल्याही “माध्यमवीराला” समजलेले नव्हते. सगळे देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री होतील, या अटकळी बांधून होते.

    त्यामुळे ज्या भाजपच्या वरिष्ठ आणि अतिवरिष्ठ नेत्यांमध्ये “माध्यमवीरांची” मुळात उठबसच नाही किंवा “सोर्सेसच” उपलब्ध नाहीत, तिथून त्यांना खरी बातमी मिळणे किंवा जागावाटपाचा खरा आकडा मिळणे याची सुतराम शक्यता नाही. त्यामुळे सध्या मराठी माध्यमांचे आकड्यांचे वेगवेगळे पतंग उडत आहेत आणि “माध्यमवीर” महायुतीच्या जागावाटपाच्या आकड्याचे परस्पर पत्ते पिसत आहेत, या पलीकडे काही नाही!!

    Marathi mediocres throwing their own numbers of mahayuti seats sharing without true sources

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस

    Thackeray brothers : म्हणे, ठाकरे बंधू एकत्र, अफाट ताकदीच्या वल्गनांना फुटले पंख!!